भारतीय महिला क्रिकेट संघ इंग्लंड दौऱ्यावर आहे. या दौऱ्यावर टीम इंडियाने ७ वर्षानंतर पहिला कसोटी सामना खेळला. हा सामना अनिर्णित ठरला होता. त्यानंतर ३ सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेला सुरुवात झाली. या मालिकेत इंग्लंडने २-० ने विजयी आघाडी मिळवली आहे. असं असलं तरी दुसऱ्या सामन्यात शेफाली वर्माने विकेट वाचवण्यासाठी केलेल्या कृतीने भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीची आठवण करून दिली. आघाडीला फलंदाजीसाठी आलेल्या शेफाली वर्माने १७ व्या षटकात पुढे येत उत्तुंग फटका मारण्याचा प्रयत्न केला. मात्र चेंडू बॅटच्या पट्ट्यात न आल्याने थेट यष्टीरक्षकाच्या हातात गेला. मग काय शेफालीने विकेट वाचवण्यासाठी महेंद्रसिंह धोनीने केलेल्या कृतीचा कित्ता गिरवला.

शेफालीने उजवा पाय स्ट्रेच करत क्रिसपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. असं करताना महेंद्रसिंह धोनीने त्याची विकेट वाचवली होती. मात्र शेफाली तसं करू शकली नाही. तिसऱ्या पंचांनी तिला बाद घोषित केलं. या विकेटनंतर आता नव्या वादाला फोडणी मिळाली आहे. महिला क्रिकेटमध्येही चमकणाऱ्या एलईडी लाईट्सच्या स्टम्पचा वापर करावा, अशी मागणी पुढे आली आहे. यामुळे तिसऱ्या पंचांना निर्णय देणं सोपं होतं. ऑस्ट्रेलियाची माजी क्रिकेटपटू लिजा स्थालेकर हिने हा व्हिडिओ शेअर केला आहे. “असं एकदिवसीय क्रिकेट सामन्यात दुसऱ्यांदा झालं आहे. आपण तिसऱ्या पंचांसमोर पेच निर्माण करत आहोत. जर चमकत्या एलईडी लाईट्सवाल्या स्टम्प असत्या तर सोपं झालं असतं”, असं तिने ट्वीट केलं आहे.

शेफाली वर्माने या सामन्यात ५५ चेंडूत ४४ धावांची खेळी केली. यात ७ चौकारांचा समावेश आहे. इंग्लंडच्या सोफी एक्सलस्टोनच्या गोलंदाजीवर फटका मारण्याच्या नादात चेंडू सुटला आणि थेट यष्टीरक्षक एमी जोन्सच्या हातात गेला. जोन्सनेही संधी न दवडता बेल्स उडवल्या.

जानेवारी २०२२ पर्यंत क्रिकेट सामन्यांची पर्वणी, टीम इंडियाचं व्यस्त वेळापत्रक

भारतीय महिला क्रिकेट संघाने ५० षटकात २२१ धावांचं लक्ष्य इंग्लंडसमोर ठेवलं होतं. हे लक्ष्य इंग्लंड संघाने ५ गडी गमवून ४७ षटकं आणि ३ चेंडूत पूर्ण केलं.