मनदीप सिंग व सरदार सिंग यांचे प्रत्येकी एक गोल

पराभवापेक्षा बरोबरी खूपच सुसह्य़ असते, हे तत्त्व डोळ्यांसमोर ठेवत भारताने माजी विश्वविजेत्या जर्मनीला २-२ असे बरोबरीत रोखले आणि तीन देशांच्या आंतरराष्ट्रीय हॉकी स्पर्धेत आव्हान राखले. भारताला याआधीच्या लढतीत बेल्जियमविरुद्ध १-२ असा पराभव स्वीकारावा लागला होता.

निकोलस वेलेनने १३व्या मिनिटाला जर्मनीचे खाते उघडले. त्यानंतर बराच वेळ त्यांच्याकडे १-० अशी आघाडी होती. सामन्याच्या ४५व्या मिनिटाला भारताच्या मनदीप सिंगने गोल करीत १-१ अशी बरोबरी केली. पाठोपाठ सरदार सिंगने आणखी एक गोल करीत भारतास २-१ अशी आघाडी मिळवून दिली. मात्र भारताला या आघाडीचा जास्त वेळ आनंद घेता आला नाही. सामन्याच्या ५२व्या मिनिटाला टोबियस हौकेने गोल केला व २-२ अशी बरोबरी साधली. याच बरोबरीत सामना संपला. जर्मनीला पहिल्या सामन्यात बेल्जियमविरुद्ध हार मानावी लागली होती.

भारताचा गोलरक्षक विकास दहियाने चांगले गोलरक्षण केले. विशेषत: पहिल्या १५ मिनिटांत जर्मन खेळाडूंनी सातत्याने चाली केल्या, मात्र केवळ एकच गोल त्यांना करता आला. दहियाने अनेक चाली रोखल्या. भारताचा बेल्जियमशी आणखी एक सामना होणार असून हा सामना सोमवारी भारतीय वेळेनुसार सायंकाळी ६.३० वाजता होईल.