कर्णधार सुनील छेत्रीने केलेल्या दोन गोलमुळे भारताने आज (रविवार) केनियाला २-० ने पराभूत करून इंटरकाँटिनेंटल कप फुटबॉल टुर्नामेंटचे जेतेपद पटकावले.

छेत्री या दोन गोलबरोबरच सर्वाधिक गोल करणाऱ्या सक्रीय फुटबॉल खेळाडुंच्या यादीत अर्जेंटिनाचा महान खेळाडु लियोनेल मेस्सीबरोबर संयुक्तरित्या दुसऱ्या स्थानी पोहोचला आहे. या दोन खेळाडुंच्या नावावर आता ६४ आंतरराष्ट्रीय गोलची नोंद आहे.

छेत्रीने पहिल्यांदा आठव्या मिनिटाला भारताला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर २९ व्या मिनिटाला आणखी एक गोल करून मेस्सीची बरोबरी केली. आपल्या १०२ वा आंतरराष्ट्रीय सामना खेळत असलेल्या ३३ वर्षीय छेत्रीपेक्षा सर्वाधिक पोर्तुगालचा सुपरस्टार ख्रिस्तियानो रोनाल्डोने केले आहेत. त्याच्या नावे १५० सामन्यात ८१ गोलची नोंद आहे.

भारताने यूएईत २०१९ मध्ये होणाऱ्या आशियाई कपसाठी तयारीच्या हेतूने या टुर्नामेंटचे आयोजन केले होते. न्यूजीलंडविरूद्धच्या पहिल्या सामन्यात १-२ ने पराभूत झाल्यानंतर भारतीय टीम नंतरच्या सामन्यात लयात आली. भारताला पहिली मोठी संधी सातव्या मिनिटाला मिळाली. केनियाचा बनॉर्ड ओगिंगाच्या फाऊलमुळे यजमान टीमला फ्री किक मिळाली. अनिरूद्ध थापाची फ्री किक थेट कर्णधार सुनील छेत्रीजवळ पोहोचली. त्याने या फ्री किकचे गोलमध्ये रूपांतर केले.

ओगिंगा आणि ओवेला ओचिंगने केनियासाठी भरपूर प्रयत्न केले. परंतु, भारतीय डिफेंडर्सनी त्यांच्या योजना धुळीस मिळवल्या. छेत्रीने २९ व्या मिनिटांत आणखी एक गोल करत भारताला २-० ने आघाडी मिळवून दिली.