आज दुसरा एकदिवसीय सामना; मालिकेत बरोबरी साधण्यासाठी न्यूझीलंडचे प्रयत्न

ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील ऐतिहासिक कामगिरीनंतर न्यूझीलंड दौऱ्यावरील सलामीच्याच लढतीत भारतीय संघाने डोळे दिपवणारी कामगिरी केली. या सामन्यात प्रखर सूर्यप्रकाशामुळे सामना थांबवण्यात आल्याची क्रिकेट इतिहासातील पहिलीच घटना घडली. आता शनिवारी होणाऱ्या दुसऱ्या लढतीत फिरकी सामर्थ्यांच्या बळावर आघाडी घेण्याचा निर्धार भारतीय संघाने केला आहे.

पहिल्या एकदिवसीय सामन्यात कुलदीप यादव आणि यजुर्वेद्र चहल यांच्या मनगटी फिरकीपुढे किवी फलंदाजांनी हाराकिरी पत्करली. या दोघांनी प्रत्येकी तीन बळी मिळवले. वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीनेसुद्धा टिच्चून गोलंदाजी केली होती.

विश्वचषक क्रिकेट स्पध्रेच्या तयारीसाठीचे दिवस कमी शिल्लक असताना भारतीय संघ अद्याप मधली फळी निश्चित करू शकलेला नाही. परंतु एका सामन्यानंतर संघात मोठे बदल होण्याची शक्यता नाही. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) प्रशासकीय समितीने चौकशी होईपर्यंत हार्दिक पंडय़ा आणि लोकेश राहुल यांच्यावरील निलंबन उठवले आहे. त्यामुळे तो लवकरच भारतीय संघात सामील होऊ शकेल. परंतु तो तिसऱ्या एकदिवसीय सामन्यासाठीच उपलब्ध होण्याची शक्यता आहे.

मॅकक्लीन पार्कच्या पहिल्या सामन्यात संघ व्यवस्थापनाने वेगवान गोलंदाजी करू शकणारा अष्टपैलू खेळाडू विजय शंकरला संघात स्थान दिले होते. मात्र दुसऱ्या सामन्यात रवींद्र जडेला संधी मिळू शकते. पहिल्या सामन्यात २३ चेंडूंत नाबाद १३ धावा काढणाऱ्या अंबाती रायुडूला आणखी एक संधी मिळू शकते. ऑस्ट्रेलियामधील एकदिवसीय मालिकेत तो सातत्यपूर्ण कामगिरी दाखवण्यात अपयशी ठरला होता.

शिखर धवनला गवसलेला सूर भारतासाठी दिलासा देणारा आहे. पहिल्या सामन्यात त्याने नाबाद ७५ धावांची खेळी साकारून संघाला दमदार विजय मिळवून दिला होता. कर्णधार विराट कोहली २८ जानेवारीला होणाऱ्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यानंतर विश्रांती घेणार आहे. त्यानंतर भारताच्या अंतिम ११ खेळाडूंमध्ये अधिक बदल होऊ शकतील. त्यामुळे सलामीवीर शुभमन गिलचे पदार्पणाचे स्वप्नसुद्धा साकारू शकते.

न्यूझीलंडने मागील मालिकेत भारताला ४-० असे नमवले होते. त्याची पुनरावृत्ती करण्यासाठी शनिवारची लढत जिंकणे त्यांना आवश्यक आहे. न्यूझीलंडचा फलंदाज केन विल्यम्सनचे फलंदाजीचे सातत्य टिकून आहे. मात्र त्याला अन्य फलंदाजांकडून तोलामोलाची साथ मिळण्याची शक्यता आहे.

संघ

  • भारत : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, महेंद्रसिंह धोनी (यष्टीरक्षक), केदार जाधव, दिनेश कार्तिक, विजय शंकर, शुभमन गिल, यजुर्वेद चहल, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद सिराज, खलील अहमद, रवींद्र जडेजा, हार्दिक पंडय़ा.
  • न्यूझीलंड : केन विल्यम्सन (कर्णधार), रॉस टेलर, टॉम लॅथम, मार्टिन गप्तील, कॉलिन डी ग्रँडहोम, ट्रेंट बोल्ट, हेन्री निकोल्स, डग ब्रेसवेल, लॉकी फग्र्युसन, मॅट हेन्री, कॉलिन मुन्रो, इश सोधी, मिचेल सँटनर, टिम साऊदी.

सामन्याची वेळ : सकाळी ७.३० वा.

थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १.