14 July 2020

News Flash

आव्हान राखण्यासाठी भारताची आज कसोटी

एकदिवसीय मालिका जिंकण्याचे न्यूझीलंडचे ध्येय

एकदिवसीय मालिका जिंकण्याचे न्यूझीलंडचे ध्येय

विराट कोहली याच्या नेतृत्वाखालील भारतीय क्रिकेट संघास न्यूझीलंडविरुद्ध बुधवारी येथे होणाऱ्या एकदिवसीय दुसऱ्या आंतरराष्ट्रीय सामन्यात विजय मिळविणे अनिवार्य आहे. तीन सामन्यांच्या मालिकेत न्यूझीलंडने पहिला सामना जिंकून १-० अशी आघाडी घेतली आहे.

गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्याबाबत कमालीची उत्कंठा निर्माण झाली आहे. फलंदाजीस अनुकूल असलेल्या खेळपट्टीवर प्रेक्षकांना चौकार व षटकारांची आतषबाजी अपेक्षित असली तरीही घरच्या मैदानावर भारतानेच वर्चस्व गाजवावे अशीच या चाहत्यांची अपेक्षा आहे.

न्यूझीलंडने पहिल्या सामन्यात सहा गडी राखून विजय मिळविताना भारतीय गोलंदाजीच्या मर्यादा स्पष्ट केल्या होत्या. टॉम लाथम व रॉस टेलर यांनी संघाच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला होता. कर्णधार केन विल्यमसन, मार्टिन गप्तिल, कॉलीन मुन्रो यांच्यावरही न्यूझीलंडच्या फलंदाजीची मदार आहे. पहिल्या सामन्यात प्रभावी गोलंदाजी करणाऱ्या ट्रेन्ट बोल्ट, अ‍ॅडम मिलने, टीम साउदी यांच्याकडून पुन्हा त्याच कामगिरीची अपेक्षा आहे. मध्यमगती गोलंदाज कॉलीन डी ग्रँडहोम हा अपयशी ठरल्यामुळे त्याच्या जागी इश सोधी याला संधी मिळण्याची शक्यता आहे. मिचेल सॅन्टेर याच्या समवेत तो फिरकी गोलंदाजीची जबाबदारी सांभाळेल अशी आशा आहे.

रोहित शर्मा व शिखर धवन या सलामीच्या जोडीचे अपयश हा भारतापुढील चिंतेचा विषय आहे. त्याचप्रमाणे केदार जाधव, महेंद्रसिंग धोनी यांनी मधल्या फळीत केलेली निराशाही डोकेदुखी ठरली आहे. त्या तुलनेत संघात पुनरागमन केलेल्या दिनेश कार्तिक याने कोहलीसमवेत ७३ धावांची भागीदारी केली होती. हे लक्षात घेता त्याचे स्थान निश्चित आहे. याच मैदानावर केदार याने कोहलीसमवेत द्विशतकी भागीदारी करीत भारताला इंग्लंडविरुद्ध शानदार विजय मिळवून दिला होता.

बदली गोलंदाज म्हणूनही त्याने अनेक वेळा भारतास महत्त्वाचे बळी मिळवून दिले आहेत. त्यामुळे त्याला वगळले जाण्याची शक्यता कमी आहे. पहिल्या सामन्यात कुलदीप यादव व यजुवेंद्र चहल यांची गोलंदाजी फोडून काढण्यात आली होती. अष्टपैलू अक्षर पटेल याला संधी द्यावयाची झाल्यास या दोघांपैकी एकास विश्रांती मिळण्याची शक्यता आहे.

चाहत्यांना निराश करणार नाही – कोहली

मालिकेत आव्हान राखण्यासाठी आम्हाला येथील लढत जिंकणे अनिवार्य आहे. त्यामुळेच हा सामनाजिंकण्यासाठी आम्ही खेळणार आहोत. पहिल्या सामन्यात गोलंदाजीबाबत झालेल्या चुका पुन्हा येथे होणार नाहीत. आवश्यक वाटल्यास फलंदाजांच्या क्रमवारीत बदल केला जाईल. त्याचप्रमाणे भक्कम सलामी होईल असा आमचा प्रयत्न राहील. पहिला सामना गमावला असला तरीही आमच्यावर कोणतेही दडपण नाही असे विराट कोहली याने सांगितले.

प्रतिस्पर्धी संघ

भारत- विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, अजिंक्य रहाणे, मनीष पांडे, केदार जाधव, दिनेश कार्तिक, महेंद्रसिंग धोनी (यष्टीरक्षक), हार्दिक पंडय़ा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, यजुवेंद्र चहल, जसप्रित बुमराह, भुवनेश्वरकुमार, शार्दूल ठाकूर.

न्यूझीलंड- केन विल्यमसन (कर्णधार), ट्रेन्ट बोल्ट, कॉलीन डी ग्रँडहोम, मार्टिन गप्तिल, मॅट हेन्री, टॉम लाथम, हेन्री निकोल्स, अ‍ॅडम मिलने, कॉलीन मुन्रो, ग्लेन फिलिप्स, मिचेल सॅन्टेर, टीम साउदी, रॉस टेलर, जॉर्ज वर्कर, इश सोधी.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 25, 2017 2:09 am

Web Title: india vs new zealand 2017 2nd odi
Next Stories
1 इंग्लंडचे छावे की ब्राझीलचे बछडे
2 शैलीदार झुंज
3 IndvNz Second ODI : आव्हान कायम राखण्यासाठी भारताला या पाच गोष्टींवर भर द्यावा लागेल
Just Now!
X