टी-२० विश्वचषकाच्या आधी भारतीय संघाने नवीन वर्षाची आश्वासक सुरुवात केली आहे. नवीन वर्षात आपला पहिला परदेश दौरा खेळणाऱ्या भारतीय संघाने टी-२० मालिकेत न्यूझीलंडला व्हाईटवॉश दिला आहे. अखेरच्या टी-२० सामन्यात ७ धावांनी जिंकत भारताने ५-० च्या फरकाने मालिकेत बाजी मारली आहे. या कामगिरीसह भारत आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये ५ सामन्यांची मालिका व्हाईटवॉशच्या स्वरुपात जिंकणारा पहिला देश ठरला आहे.

याचसोबत टीम इंडियाने या मालिकाविजयासोबत न्यूझीलंडसोबतचे सर्व हिशोब चुकते केले आहेत. याआधी न्यूझीलंडच्या भूमीवर भारतीय संघाची टी-२० क्रिकेटमधली कामगिरी फारशी आश्वासक नव्हती. मात्र ५-० च्या फरकाने मिळवलेल्या विजयाच्या जोरावर भारताने हा कटु इतिहास पुसून टाकला आहे.

भारताने विजयासाठी दिलेलं १६४ धावांचं आव्हान यजमान संघाला पेलवलं नाही. रॉस टेलर आणि टीम सेफर्ट यांनी अर्धशतक झळकावत चांगले प्रयत्न केले, मात्र मोक्याच्या क्षणी भारतीय गोलंदाजांनी सामन्यात पुनरागमन करत न्यूझीलंडची विजयाची संधी हिरावून घेतली. भारताकडून जसप्रीत बुमराहने ३, नवदीप सैनी-शार्दुल ठाकूरने प्रत्येकी २-२ तर वॉशिंग्टन सुंदरने एक बळी घेतला.