न्यूझीलंडच्या आगामी भारत दौऱ्यात तिसरा वन-डे सामना आता कानपूरच्या ग्रीनपार्क मैदानावर हलवण्यात आला आहे. सर्वात आधी लखनऊच्या एकना क्रिकेट मैदानावर हा सामना खेळवण्यात येणार होता. मात्र आंतराष्ट्रीय सामना भरवण्यासाठी लखनऊचं मैदान अजुनही तयार नसल्याचं कारण देत बीसीसीआयने तिसऱ्या सामन्याची जागा बदलली आहे. सध्या लखनऊच्या मैदानावर दुलीप करंडकाचे सामने होत आहेत. २९ ऑक्टोबर रोजी भारत आणि न्यूझीलंड यांच्यात तिसरा वन-डे सामना खेळवला जाणार आहे.

दौऱ्याचा कार्यक्रम आखताना हा सामना सर्वात प्रथम लखनऊच्या मैदानात ठेवण्यात आला होता. खेळपट्टी आणि मैदानाची चाचणी घेण्यासाठी सध्या बीसीसीआयने या मैदानावर दुलीप करंडकाचे सामनेही भरवले आहेत. मात्र आयसीसीच्या नियमांनूसार, आंतराष्ट्रीय सामन्यासाठी लखनऊचं मैदान अद्यापही तयार नसल्याचं बीसीसीआयचे विशेष कार्यकारी अधिकारी राहुल जोहरी यांनी पत्रकारांना सांगितलं आहे.

अवश्य वाचा – भारताविरुद्ध मालिकेसाठी न्यूझीलंडचा संघ जाहीर, संघात ९ खेळाडूंनाच स्थान

मैदानाच्या काही भागात अजुनही बांधकाम सुरु आहे. काही ठिकाणी सरकते जिने अजुनही बसवले गेले नाहीयेत. तर कुंपणाचं कामही अर्धवट राहील्याचं बीसीसीआयच्या तपासणीत समोर आलं. त्यामुळे बीसीसीआयने हा सामना कानपूरला हलवण्याचा निर्णय घेतला. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातली ३ सामन्यांची वन-डे मालिका ही २२ ऑक्टोबरपासून मुंबईत सुरु होणार आहे.