न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या आणि निर्णायक एकदिवसीय सामन्यात विराट कोहलीनं कारकिर्दीतील ३२ वे शतक साजरे केले. या सामन्यात आपल्या खात्यात आणखी एका शतकाची भर घालताना विराटने सर्वात जलद ९ हजार धावांचा टप्पा पार करण्याचा पराक्रम केला. आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील १९४ व्या डावात त्याने ९ हजार धावा पूर्ण केल्या. एकदिवसीय क्रिकेटमध्ये ९ हजार धावांचा टप्पा पूर्ण करणारा विराट कोहली सहावा फलंदाज ठरला. हा धावा त्याने सर्वात कमी डावात पूर्ण केला. यापूर्वी दक्षिण आफ्रिकेचा स्फोटक फलंदाज एबी डिव्हिलियर्सने २०५ डावात ९ हजार धावांचा टप्पा पूर्ण केला होता. तर भारताकडून सौरव गांगुलीने २२८ वेळा फलंदाजी केल्यानंतर ९ हजार धावा केल्या होत्या. न्यूझीलंडविरुद्ध ८३ धावा केल्यानंतर कोहलीने हे नवे शिखर गाठले.

या विक्रमासह कोहलीने द्रविडला मागे टाकण्याचा पराक्रमही केलाय. न्यूझीलंडविरुद्धच्या शतकानंतर विराट कोहलीने माजी क्रिकेटर आणि भारतीय युवासंघाचा प्रशिक्षक राहुल द्रविड यांना मागे टाकले आहे. कसोटीतील १७ शतके आणि एकदिवसीयमधील ३२ शतकांसह कोहलीची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ४९ शतके झाली आहेत. भारताचे प्रतिनिधीत्व करताना द्रविडने एकूण ४८ शतके ठोकली होती. याशिवाय एका कॅलेंडर वर्षामध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रमही कोहलीने आपल्या नावे केलाय. यापूर्वी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार रिकी पॉन्टींगने २००७ मध्ये एका वर्षात १४२४ धावा केल्या होत्या. कोहलीने आतापर्यंतच्या सामन्यात १४६० धावा करुन पॉन्टींगला मागे टाकले.

न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात कोहलीने ९ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने १०६ चेंडूत ११३ धावांची खेळी केली. न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज साऊदीने कोहलीला कर्णधार केन विल्यमसनकरवी झेलबाद केले. मात्र बाद होण्यापूर्वी कोहलीने ग्रीन पार्कच्या मैदानावर तीन विक्रम आपल्या नावावर केले होते. रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या शतकांच्या जोरावर भारताने कानपूरच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडसमोर ३३८ धावांचे मोठे लक्ष्य ठेवले.