22 November 2019

News Flash

तुल्यबळ लढतींची परंपरा कायम?

विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत १९८७ आणि २००३चे अपवाद वगळल्यास न्यूझीलंडचे आव्हान भारतासाठी जड गेले आहे.

|| प्रशांत केणी

विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत १९८७ आणि २००३चे अपवाद वगळल्यास न्यूझीलंडचे आव्हान भारतासाठी जड गेले आहे. त्यामुळे एकदिवसीय क्रिकेटमधील आकडेवारी भारतासाठी अनुकूल असली तरी विश्वचषकात झालेल्या सात सामन्यांमध्ये न्यूझीलंड भारतापेक्षा ४-३ सरस ठरला आहे. आता १६ वर्षांनी हे दोन संघ एकमेकांशी विश्वचषकात सामना करणार आहेत. विश्वचषकामधील दोन्ही संघांच्या सामन्यांचा आढावा घेतल्यास विजयाचे दोलक कधी न्यूझीलंडकडे तर कधी भारताकडे राहिले आहे. परंतु गेल्या काही वर्षांतील न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकांमधील वर्चस्वपूर्ण कामगिरी ही भारतासाठी अनुकूल ठरते आहे.

१९७५च्या विश्वचषकात अ-गटातील लढतीत भारताने प्रथम फलंदाजी करता ६० षटकांत २३० धावा केल्या. यात सय्यद अबिद अलीचे ७० धावांचे योगदान होते. मग ग्लेन टर्नरच्या (११४*) शतकामुळे न्यूझीलंडने भारतावर चार गडी राखून विजय मिळवला. १९७९ च्या विश्वचषकात पुन्हा न्यूझीलंड आणि भारत एकाच गटात समाविष्ट करण्यात आले होते. लान्स केर्न्‍स आणि ब्रायन मॅकेशिने यांनी प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताचा डाव १८२ धावांत गुंडाळला. यात सुनील गावस्करने अर्धशतकी खेळी साकारली. मग न्यूझीलंडने दोन फलंदाजांच्या मोबदल्यात भारताचे आव्हान पार केले. ब्रूस एडगर (८४) न्यूझीलंडच्या विजयाचा शिल्पकार ठरला.

न्यूझीलंडची मक्तेदारी भारताने १९८७ च्या विश्वचषकात संपुष्टात आणली. अ-गटातील दोन्ही सामने भारताने जिंकले. एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या सामन्यात भारताने नवज्योतसिंग सिद्धू (७५) आणि कपिलदेव (७२*) यांच्या फलंदाजीच्या बळावर ७ बाद २५२ धावा केल्या आणि न्यूझीलंडला निर्धारित षटकांमध्ये ८ बाद २३६ धावांवर रोखले. मणिंदर सिंग आणि रवी शास्त्री यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले. उभय संघांमध्ये ३१ ऑक्टोबर १९८७ या दिवशी नागपूरला झालेला सामना ऐतिहासिक ठरला. कारण चेतन शर्माने विश्वचषकातील पहिलीवहिली हॅट्ट्रिक नोंदवली आणि निवृत्तीच्या उंबरठय़ावरील सुनील गावस्करने एकदिवसीय क्रिकेटमधील पहिले शतक साकारले. भारताने न्यूझीलंडला ९ बाद २२१ धावांवर रोखले. चेतनने केन रुदरफोर्ड, इयान स्मिथ आणि इवेन चॅटफिल्ड यांचे लागोपाठच्या चेंडूंवर त्रिफळे उद्ध्वस्त केले. मग ३२.१ षटकांत भारताने एक बाद २२४ धावा करताना हे लक्ष्य सहज पेलले. कृष्णम्माचारी श्रीकांत (७५) आणि गावस्कर यांनी १३६ धावांची नोंदवलेली सलामी महत्त्वपूर्ण ठरली.

१९९२ च्या विश्वचषकात राऊंड रॉबिन लीग पद्धती वापरली असताना गृहमैदानांचा फायदा उचलत न्यूझीलंडचा संघ साखळीत अव्वल ठरला होता. डय़ुनेडिन येथे झालेल्या सामन्यात न्यूझीलंडने भारतावर चार गडी राखून शानदार विजय मिळवला. सचिन तेंडुलकर (८४) आणि मोहम्मद अझरुद्दीन (५५) यांच्या अर्धशतकांच्या बळावर भारताने प्रथम फलंदाजी करताना ६ बाद २३० धावा उभारल्या. मग मार्क ग्रेटबॅच (७३) आणि अँडय़ू जोन्स (६७) यांच्या अर्धशतकांच्या बळावर न्यूझीलंडने हे लक्ष्य आरामात पार केले.

१९९९ च्या विश्वचषकामधील ‘सुपर सिक्स’ टप्प्यात न्यूझीलंडने भारताचा पाच गडी राखून पराभव केला. या सामन्यात अजय जडेजाच्या ७६ धावांच्या खेळीच्या बळावर भारताने ६ बाद २५१ ही धावसंख्या उभी केली. त्यानंतर न्यूझीलंडने ४८.२ षटकांत हे लक्ष्य साध्य केले. मॅट हॉर्नने ७४ आणि रॉजर ट्वोसने ६० धावा केल्या.

२००३ च्या विश्वचषकात पुन्हा ‘सुपर सिक्स’ टप्प्यातच भारताची न्यूझीलंडशी गाठ पडली. परंतु यावेळी न्यूझीलंडचा सात गडी राखून आरामात धुव्वा उडवला. झहीर खानच्या भेदक माऱ्याच्या बळावर किवी संघ १४६ धावांवर गारद झाला. मग मोहम्मद कैफ (६८) आणि राहुल द्रविड (५३) यांच्या फलंदाजीमुळे भारताचा विजय सुकर झाला.

याशिवाय, चालू वर्षांच्या पूर्वार्धात न्यूझीलंडमधील पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत भारताने ४-१ अशी मर्दुमकी गाजवली होती. या मालिकेत मोहम्मद शमीने मालिकावीर पुरस्कार पटकावला. २०१७ च्या उत्तरार्धात भारताने न्यूझीलंडविरुद्धची गृहमैदानांवर तीन सामन्यांची मालिका २-१ अशी जिंकली होती. या मालिकेत विराट कोहलीने मालिकावीर पुरस्कार प्राप्त केला होता. त्याआधी, २०१६च्या उत्तरार्धात झालेल्या पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतही भारतानेच अमित मिश्राच्या फिरकीच्या बळावर ३-२ अशी सरशी साधली होती. न्यूझीलंडविरुद्धच्या गेल्या अडीच वर्षांतील तीन मालिका जिंकल्यामुळे भारताचे पारडे जड असले, तरी विश्वचषकामधील आतापर्यंतच्या कामगिरीआधारे न्यूझीलंड हा भारताशी तुल्यबळ संघच आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

First Published on June 13, 2019 1:38 am

Web Title: india vs new zealand icc cricket world cup 2019 2
Just Now!
X