ट्वेन्टी-२० प्रकारात न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या विजयासाठी आज भारत उत्सुक
ट्वेन्टी-२० विश्वचषकाच्या सलामीच्या सामन्याचा थरार नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या जामठा स्टेडियमवर मंगळवारी रंगणार आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात आतापर्यंत ट्वेन्टी-२० क्रिकेटचे चार सामने खेळले गेले असून, ते सर्व सामने न्यूझीलंडने जिंकले आहेत. त्यामुळेच न्यूझीलंडची विजयी परंपरा रोखण्याचे आव्हान भारतासमोर असेल.
न्यूझीलंडविरुद्ध भारत का हरतो, याबाबत भारतीय संघाला गांभीर्याने विचार करण्याची आवश्यकता आहे. मात्र धोनी ब्रिगेडने वर्षांरंभी झालेल्या मालिकेत ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच भूमीत ३-० अशा फरकाने पराभूत केले. त्यानंतर श्रीलंकेचा २-१ने पराभव केला. बांगलादेशात नुकत्याच पार पडलेल्या आशिया चषकाचे जेतेपद भारताने पटकावले. त्यामुळे भारतीय संघाकडून विश्वचषकाच्या पहिल्या सामन्यात विजयाच्या आशा चाहत्यांनी बाळगल्या आहेत. या सर्व स्पर्धा-मालिकांवर नजर टाकली तर भारतीय संघ चांगल्या फॉर्मात दिसतो.
न्यूझीलंडचे पारडे जड
भारत आणि न्यूझीलंड संघांत पहिला ट्वेन्टी-२० सामना दक्षिण आफ्रिकेत २००७मध्ये झालेल्या विश्वचषकात जोहान्सबर्ग येथील वाँडर्स मदानावर झाला. हा सामना न्यूझीलंडने १० धावांनी जिंकला होता. न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करत २० षटकांत सर्व बाद १९० धावांचे डोंगर भारतासमोर उभे ठाकले होते. मात्र २० षटकांत ९ बाद १८० धावांवर डाव संपुष्टात आल्यामुळे भारताचा पराभव झाला. २७ फेब्रुवारी २००९ रोजी वेिलग्टन येथे झालेल्या सामन्यात न्यूझीलंडने ५ विकेट्स राखून विजय मिळविला. यानंतर ८ सप्टेंबर २०१२ रोजी विशाखापट्टणम् येथील सामना पावसामुळे रद्द झाला, तर ११ सप्टेंबर २०१२ रोजी चेन्नई येथील सामन्यात न्यूझीलंडने एका धावाने भारतावर विजय मिळवला. आतापर्यंत भारत न्यूझीलंड संघादरम्यान झालेल्या ट्वेन्टी-२० सामन्यात न्यूझीलंड संघाचे पारडे जड असल्याचे लक्षात येते. त्यामुळे ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या विजयासाठी भारत उत्सुक आहे.
दोन्ही संघांकडे तगडा फौजफाटा
भारताजवळ विराट कोहली, शिखर धवन, रोहित शर्मा, युवराज सिंग, सुरेश रैना यांच्यासारखे दमदार फलंदाज आहेत, तर जसप्रित बुमराह, आर. अश्विन, हार्दिक पंडय़ा, आशीष नेहरा, रवींद्र जडेजा यांच्यासारखे गोलंदाज ही बलस्थाने आहेत. तर न्यूझीलंड संघात मार्टनि गुप्तील, रॉस टेलर, केन विल्यमसन, कॉिलग मुन्रो यांच्यासारख्या उत्तम फलंदाजांचा भरणा आहे. याशिवाय न्यूझीलंड संघात मिचेल मॅकक्लेघन, अॅडम मिलने, ट्रेंट बोल्ट असा वेगवान गोलंदाजांचा मारा आहे. तेव्हा भारताप्रमाणेच दोन्ही संघांत फटकेबाजांचा व गोलंदाजांचा तगडा फौजफाटा आहे. त्यामुळे कोणता संघ विश्वचषकाच्या पहिल्या सामन्यात बाजी मारणाऱ, याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. भारत संघ तब्बल सहा वर्षांनंतर नागपुरात ट्वेन्टी-२० सामना खेळणार आहे. मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये दक्षिण आफ्रिका आणि भारतादरम्यान जामठाच्या मदानावर कसोटी सामना झाला होता. तेव्हा खेळपट्टीवरून चांगलाच वाद निर्माण झाला होता आणि आता परत त्याच खेळपट्टीवर विश्वचषकाचा सामना होत असल्याने सर्वाच्या नजरा निकालाकडे असणार आहेत. इतिहासाकडे पाहिल्यास जरी न्यूझीलंडचे भारताविरुद्ध पारडे जड असले तरी मात्र सध्याच्या कामगिरीनुसार भारताला किवी संघाला हरवणे कठीण जाणार नाही.

* स्थळ : विदर्भ क्रिकेट
असोसिएशन स्टेडियम, नागपूर
* वेळ : सायं. ७.३० वाजल्यापासून
* थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्टस्

संघ
भारत : महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), शिखर धवन, रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, विराट कोहली, सुरेश रैना, युवराज सिंग, जसप्रीत बुमराह, आशीष नेहरा, रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, हार्दिक पंडय़ा, हरभजन सिंग, पवन नेगी, मोहम्मद शमी.
न्यूझीलंड : केन विल्यमसन (कर्णधार), मार्टिन गप्तिल, हेन्री निकोल्स, ल्युक राँची, रॉस टेलर, कॉलीन मुन्रो, मिचल सँटेर, नॅथन मॅक्क्युलम, ग्रँट एलियट, मिचेल मॅक्क्लेघन, टिम साऊदी, ट्रेंट बोल्ट, अॅडम मिलने, इश सोधी, कोरे अँडरसन.

खेळपट्टीचा अंदाज
जामठात ट्वेन्टी-२० विश्वचषकासाठी चार खेळपट्टय़ा तयार करण्यात आल्या आहेत. आतापर्यंत प्रमुख खेळपट्टीवर फक्त एकच सामना झाला असून, त्याच खेळपट्टीवर भारत-न्यूझीलंडचा सामना होणार आहे. खेळपट्टीवर असलेले गवत कमी करण्यात आले असून, ट्वेन्टी-२० सामन्याकडे पाहता खेळपट्टी टणक बनवण्यास प्राधान्य दिले आहे. त्यामुळे ही खेळपट्टी फलंदाजांसाठी अनुकूल ठरणार आहे. १६०च्या वर धावसंख्या होईल, असा अंदाज आहे.
भारत वि. न्यूझीलंड सामन्याचे लाइव्ह अपडेट्स indianexpress-loksatta.go-vip.net वर पाहता येतील