गाडीने २३ हजार किमीचा प्रवास करत ते भारतीय कुटुंब पोहचले मॅचेस्टरच्या मैदानात!

क्रिकेट विश्वचषक स्पर्धा सध्या अंतिम टप्यात पोहोचली आहे. अखेरचे काही सामने पाहण्यासाठी चाहते क्रिकेट स्टेडिअममध्ये गर्दी करत आहेत. ९ तारखेला भारत विरुद्ध न्यूझीलंड पहिला उपांत्यफेरीचा सामना खेळला गेला. परंतु पावसाने खेळात व्यत्यय आणल्यामुळे हा सामना आता राखीव दिवशी होणार आहे. सामन्यात पावसाने खोडा घातल्यामुळे चाहत्यांमध्ये प्रचंड नाराजी होती. दरम्यान या शेकडो नाराज चाहत्यांमध्ये मात्र एक कुटुंब प्रचंड आनंदात होते. त्याला कारणही तसेच होते. भारतीय संघाला पाठिंबा देण्यासाठी हे कुटुंब तब्बल २३ हजार किमीचा प्रवास करून मैदानावर पोहचले होते. आपल्या आवडत्या खेळाडूंना पाहून त्यांच्या आनंदाला पारावार उरला नव्हता.

विशेष म्हणजे, या कुटुंबातील तीन पिढ्या तब्बल ३२ हजार किमी गाडीमध्ये प्रवास करत मँचेस्टरमध्ये भारतीय संघाला पाठिंबा देण्यासाठी पोहचले होते. या प्रदीर्घ प्रवासादरम्यान त्यांनी १८ देश आणि दोन खंडातून प्रवास केला होता. त्यांचा प्रवास सिंगापूरमधून सुरू झाला आणि मँचेस्टरमध्ये संपला. आयसीसीने या क्रिकेटवेड्या कुटुंबाची मुलाखत घेत त्यांचा हुरूप वाढवला आहे. आयसीसीने या मुलाखतीचा एक व्हिडीओ ट्विट केला आहे. या मुलाखतीत त्यांनी प्रवासादरम्यान आलेले विविध मजेशीर अनुभव सांगितले आहेत.

या व्हिडीओला सोशल मीडियावर चांगलीच प्रसिद्धी मिळत आहे. क्रिकेटवेड्या कुटुंबावर कौतुकांचा वर्षाव होत आहे. ९ जुलै रोजी पावासामुळे भारत आणि न्यूझीलंड सामना थांबवण्यात आला. आज बुधवारी राखीव दिवशी हा सामना होणार आहे. खेळ थांबेपर्यंत न्यूझीलंड संघाने ४६.१ षटकांत पाच बाद २११ धावा केल्या आहेत. आज राखीव दिवशी खेळाला तेथूनच सुरूवात होण्याची शक्यता आहे. २३ किमीचा प्रवास करून मँचेस्टरमध्ये पोहचलेले हे कुटुंब आज आपल्या आवडत्या संघाल पाठिंबा देतील.