मालिकेत विजयी आघाडी घेण्यासाठी भारत उत्सुक; न्यूझीलंडचे लक्ष्य बरोबरी साधण्याचे

भारतीय क्रिकेट संघ पाच वर्षांतील तिसऱ्या ट्वेन्टी-२० आंतरराष्ट्रीय मालिकेतील विजयाच्या उंबरठय़ावर आहे. दिल्लीतील पहिल्या सामन्यात ५३ धावांनी दणदणीत विजय मिळवल्यानंतर कांधेरीतील सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियमवरील दुसरा सामना जिंकून मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेण्यासाठी भारतीय संघ उत्सुक आहे. मात्र झुंजार वृत्तीसाठी ओळखल्या जाणाऱ्या न्यूझीलंडला तीन ट्वेन्टी-२० सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या लढतीत हरवणे सोपे नसेल.

पहिल्या सामन्यात भारताच्या आघाडीच्या फळीने, विशेषत: शिखर धवन आणि रोहित शर्माने धडाकेबाज आक्रमण केले. त्यामुळे ट्वेन्टी-२० क्रिकेटमधील किवींविरुद्धचा पहिलावहिला विजय साकारता आला. २००७मधील पहिल्या ट्वेन्टी-२० विश्वविजेत्या भारताच्या भुवनेश्वर कुमार आणि जसप्रीत बुमराह या वेगवान गोलंदाजांनी अखेरच्या षटकांमध्ये टिच्चून गोलंदाजी केली. मधल्या षटकांमध्ये फिरकी गोलंदाजांचीही छान साथ लाभली. त्यामुळेच केन विल्यमसनच्या न्यूझीलंड संघापुढे आव्हान कठीण असेल.

थिरुवनंतपूरमला ७ नोव्हेंबरला होणाऱ्या अखेरच्या सामन्यापर्यंत मालिकेतील उत्कंठा टिकवायची असेल, तर शनिवारच्या सामन्यात भारताच्या धवन, शर्मा आणि कोहलीच्या फलंदाजीला वेसण घालण्याचे आव्हान किवी गोलंदाजांवर असेल. दिल्लीच्या सामन्यात धवन आणि शर्मा जोडीने १६ षटकांत १५८ धावांची विक्रमी सलामी नोंदवत भारताची धावसंख्या दोनशेचा टप्पा ओलांडेल, याची खात्री दिली.

दिल्लीत ट्रेंट बोल्ट आणि टिम साऊदी हे न्यूझीलंडचे अनुभवी वेगवान गोलंदाज नवा चेंडू हाताळण्यात अपयशी ठरले. याशिवाय संघाचे क्षेत्ररक्षणही ढिसाळ झाले. त्यामुळे सामन्यानंतर विल्यमसन म्हणाला, ‘‘ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये न्यूझीलंडचा संघ भारतापेक्षा सरस होता आणि संघाला आपल्या क्षेत्ररक्षणाचाही गर्व होता. मात्र या सामन्यात भारताने सर्वच प्रांतात आमच्यावर कुरघोडी केली.’’

कोहली आघाडीवर राहून संघाचे नेतृत्व करीत आहे. त्याने ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्येही दोन हजार धावांचा टप्पा वेगाने ओलांडला आहे. भारताची आघाडीची फळी ढासळल्यास माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी संघाला सावरायला समर्थ असतो.

लेग-स्पिनर युजवेंद्र चहल किवी फलंदाजांना त्रस्त करीत आहे. अगदी विल्यमसन आणि अनुभवी रॉस टेलरलाही या मनगटी फिरकी गोलंदाजाचा सामना करणे आव्हानात्मक ठरत आहे. पाहुण्या संघाकडून फक्त डावखुरा फलंदाज टॉम लॅथमने धावांचे सातत्य राखले आहे.

राजकोटच्या स्टेडियमवरील हा दुसरा ट्वेन्टी-२० आंतरराष्ट्रीय सामना खेळवण्यात येत आहे. याआधी ऑक्टोबर २०१३मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेला पहिला सामना भारताने जिंकला होता. या मैदानावर गुजरात लायन्सचे आयपीएल सामनेसुद्धा झाले आहेत. याशिवाय येथे २०१३ आणि २०१५मध्ये अनुक्रमे इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दोन एकदिवसीय सामने झाले आहेत. हे दोन्ही सामने भारताने गमावले आहेत. मागील हंगामात इंग्लंडविरुद्धच्या सामन्यावेळी या स्टेडियमला कसोटीचा दर्जा मिळाला आहे.

संघ

  • भारत : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, जसप्रित बुमराह, युजवेंद्र चहल, शिखर धवन, महेंद्रसिंग धोनी, श्रेयस अय्यर, दिनेश कार्तिक, कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद सिराज, मनीष पांडे, हार्दिक पंडय़ा, अक्षर पटेल, लोकेश राहुल.
  • न्यूझीलंड : केन विल्यमसन (कर्णधार), टॉड अ‍ॅस्टल, ट्रेंट बोल्ट, टॉम ब्रूस, कॉलिन डी ग्रँडहोमी, मार्टिन गप्तील, मॅट हेन्री, टॉम लॅथम, हेन्री निकोलस, अ‍ॅडम मिल्ने, कॉलिन मुन्रो, ग्लेन फिलिप्स, मिचेल सँटनर, इश सोधी, टिम साऊदी.
  • सामन्याची वेळ : सायं. ७ वा.पासून.
  • प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स वाहिनीवर.