भारतीय फलंदाजांची तडफदार फलंदाजी, गोलंदाजांचा भेदक मारा आणि त्याला उत्कृष्ट क्षेत्ररक्षणाची जोड अशा सांघिक कामगिरीच्या जोरावर भारताने पाकिस्तानविरूध्दच्या दुस-या ट्वेन्टी-२० सामन्यामध्ये शानदार विजय मिळवला. अहमदाबादच्या मोटेरा मैदानावर आज पुन्हा एकदा नेहमीप्रमाणे भारत-पाकिस्तानच्या सामन्यादरम्यान असणारी आक्रमक वृत्ती दोन्ही संघामध्ये पहायला मिळाली. शेवटच्या षटकापर्यंत उत्सुकता ताणून धरायला लावणारा हा सामना भारतीय गोलंदाजांनी भेदक मारा करत आपल्या खिशात घातला आणि मैदानावर एकच जल्लोष पहायला मिळाला. दोन सांमन्यांच्या ट्वेन्टी-२० मालिकेत प्रत्येक संघाने एक-एक सामना जिंकल्याने ही मालिका बरोबरीत सुटली.   
पाकिस्तान संघाने नाणेफेक जिकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतल्यानंतर भारताने त्यांच्यासमोर १९३ धावांचे तगडे आव्हान ठेवले होते. युवराज सिंगची ७ षटकार आणि ४ चौकारांसह ३६ चेंडुंमध्‍ये ७२ धावांची खेळी हा सामना अधिक रंगतदार करण्यासाठी अत्यंत महत्वपूर्ण ठरली. त्याला सामनावीराचा किताब बहाल करण्यात आला.
गौतम गंभीर आणि अजिंक्‍य रहाणे या सलामीच्या जोडीने भारताला चांगली सुरूवात करून दिली. गंभीर ११ चेंडुंमध्‍ये २१ धावा आणि अजिंक्य रहाणे २८ धावांवर बाद झाला.
पाकिस्तानचे सलामीवीर नसिर जमशेद आणि एहमद शेहझाद यांनी डावाची सुरूवात चांगली केली. त्यांनी पहिल्या विकेटसाठी ७४ धावांची भागीदारी केली. त्यानंतर आलेल्या उमर अकमन (२४), महम्मद हफीझ (५५) आणि शाहिद अफ्रिदी (११) धावांची भर धावसंख्येत घालून तंबूत परतले. भारतातर्फे भुनेश्वरुमार (१), इशांत शर्मा (१), अशोक दिंडा (३), रविचंद्र अश्विन(१) आणि युवराजसिंगने १ बळी घेतला.