संपूर्ण जग सध्या करोना विषाणूशी लढत आहे. भारतासह बहुतांश देशात लॉकडाउन जाहीर करण्यात आलं आहे. जिवनावश्यक गोष्टी वगळता सर्व गोष्टी या काळात बंद असणार आहेत. या परिस्थितीचा क्रीडा विश्वालाही मोठा धक्का बसला आहे. आयसीसीनेही आपल्या सर्व स्पर्धा रद्द केल्या आहेत. यामुळे सर्व क्रिकेट बोर्डाचं मोठं आर्थिक नुकसान होणार आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी फिरकीपटू ब्रॅड हॉगने क्रिकेटला पुन्हा एकदा जुने दिवस यावेत यासाठी एक उपाय सांगितला आहे. तो स्थानिक प्रसारमाध्यमांशी बोलत होता.

“प्रेक्षकांना सध्या स्पर्धात्मक क्रिकेट पहायचं आहे. त्यामुळे माझ्या मते कसोटी अजिंक्यपद स्पर्धा काहीकाळासाठी रद्द करुन त्याजागेवर प्रेक्षकांचा पाठींबा मिळेल अशा मालिका खेळवल्या पाहिजे. वर्षाअखेरीस भारतीय संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाणार आहे, हा दौरा रद्द करुन ऑस्ट्रेलिया-इंग्लंड यांच्यात अ‍ॅशेस मालिका खेळवाली असाही पर्याय हॉगने सुचवला. याचसोबत ब्रॅडने भारत-पाकिस्तान यांच्यात ४ सामन्यांची मालिका खेळवली जावी हा पर्यायही सुचवला. खूप वेळ झाला भारत-पाकिस्तान यांच्यात मालिका खेळवली गेली नाहीये. त्यामुळे क्रिकेट चाहते ही मालिका पाहण्यासाठी उत्सुक असतील असंही ब्रॅड म्हणाला.

देशभरात करोना विषाणूमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे सध्या सर्व महत्वाच्या क्रिकेट स्पर्धा बंद आहेत. बीसीसीआयनेही आयपीएलचा तेरावा हंगाम पुढील सूचना मिळेपर्यंत स्थगित केला आहे. आयपीएल रद्द झाल्यास बीसीसीआयला होणारं आर्थिक नुकसान हे मोठं असणार आहे, त्यामुळे वर्षाअखेरीस स्पर्धेचं आयोजन करता येईल का याबद्दल बीसीसीआय चाचपणी करत आहे.