भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील चॅम्पियन्स ट्रॉफीमधील सामना आज बर्मिंगहॅमला होणार आहे.मुहूर्ताची घटिका जशी समीप येऊन ठेपली आहे तशी दोन्ही देशातल्या क्रिकेट फॅन्सची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. टी.व्ही वर मॅच बघताना सगळे जय्यत तयारी करून बसणार हे नक्की.

दोन्ही संघात कोणता संघ जास्त तुल्यबळ दिसतो यापेक्षा कोणता संघ इंग्लंडच्या हवामानाशी सुसंगत तंत्राने क्रिकेट खेळणार तो जिंकणार असा मामला आहे. बर्मिंगहॅमला ज्याला टिपिकल इंग्लिश हवामान म्हणतात तसे असेल. १५ ते १६ अंश तापमान आणि त्यात ढगाळ वातावरण आणि वारा अशा हवामानात फलंदाज आणि गोलंदाज दोघांचाही कस लागतो.स्विंग होणारा चेंडू खेळणे जितके अवघड तितकेच स्विंग नियंत्रित करून अचूक गोलंदाजी करणे आव्हानात्मक असते.त्यामुळे भारत विरुद्ध पाकिस्तान या प्रतिष्ठा पणाला लागणाऱ्या सामन्यात हिरो बनण्याच्या नादात गोलंदाज स्वैर होऊ शकतात आणि मग बघता बघता सामना हातातून निसटतो. अशा खुन्नसने ओतप्रोत भरलेल्या सामन्यात शांत चित्ताने पाकिस्तान संघाला नामोहरम करण्याचे कौशल्य भारतीय संघाने गेली काही वर्षे सातत्याने दाखवले आहे.त्यामुळे या सामन्यात गुंतलेल्या राजकीय,ऐतिहासिक,युद्धसदृश वातावरण निर्मितीमुळे गळफटून जाऊन गुडघे टेकण्याची शक्यता भारतीय संघाची कमी वाटते.आयपीएलमुळे सामन्यातील तणाव यशस्वीरित्या हाताळणे भारतीय खेळाडूंना सरावाचे झाले आहे. या उलट मियादाद,इम्रान,अक्रम या दिग्गजांनंतर भारत पाकिस्तान सामन्यातिल तणावाचे नियोजन करणे पाकिस्तानी खेळाडूंना जमलेले नाही. सचिन,द्रविड,सेहवाग,गंभीर,युवराज,धोनी,श्रीनाथ,वेंकटेश प्रसाद,कुंबळे,हरभजन सिंग,झहीर खान,नेहरा,अश्विन,जडेजा वगैरे मंडळींनी आपल्या अनुभवसिद्ध खेळातून पाकिस्तानला सातत्याने मात दिली असल्याने भारतीय तंबूत या सामन्याला इतर कोणत्याही सामन्यासारखे बघण्याची तटस्थ आणि कणखर वृत्ती आली आहे.तसेच पाकिस्तान संघात पूर्वीसारखा प्रतिभेचा स्रोत आता दिसत नाही.मोहम्मद आमिर,वहाब रियाझ हे धोकादायक गोलंदाज असले तरी त्यांचा स्पेल कुठल्याही पडझडी शिवाय खेळून काढण्याची भारतीय फलंदाजांची रणनीती असेल.खेळपट्टीवर गवत ठेवले नाही म्हणजे मोठा स्कोर होणार हे गृहित इंग्लंड मध्ये खोटे ठरते.कारण तिथल्या हवामानामुळे गोलंदाज संपूर्ण सामनाभर धोकादायक असतात.त्यामुळे फलंदाजी करण्याऱ्या संघाला कोणतेहीे टार्गेट ठेऊन फलंदाजी करणे अवघड असते.लख्ख प्रकाशात सामना सुरू झालेला असला तर ३०० चा स्कोर आवश्यक वाटतो पण थोड्याच वेळात ढग आले आणि चेंडू स्विंग व्हायला लागला की २२० चा स्कोर पुष्कळ वाटतो. त्यामुळे प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाला ५० षटकं खेळून काढणं आवश्यक असतं.कोहली,धोनी ५० षटकांच्या व्यवस्थापनेत मुत्सद्दी असल्याने भारताचा डाव अचानक कोसळण्याची शक्यता कमी आहे.

इंग्लंडमधली परिस्थिती बघता भुवनेश कुमार,शमी,उमेश यादव ,बुमराह असे चार चांगले गोलंदाज संपूर्ण तंदुरुस्त असल्याने यातले कोणते दोन किंवा तीन खेळवायचे हा निर्णय आयत्या वेळेस घ्यावा लागेल.जडेजा,अश्विन नक्की वाटतात तर अष्टपैलूची जागा पंड्याने छान भरून काढली आहे.पंड्या सही सही इंग्लिश परिस्थितीतला गोलंदाज आहे. त्यामुळे खालच्या फळीतील धडाकेबाज फलंदाजी आणि गोलंदाजीत पाच सहा षटकात एक दोन बळी असे टार्गेट त्याला दिलेले असेल.अश्विन,जडेजा या पैकी कुणालातरी मार बसला तर पंड्या कडून दहा षटके सुद्धा टाकून घेता येतील.यावरून एक चांगला अष्टपैलू खेळाडू संघाला किती पर्याय देतो हे दिसून येते.
या सामन्यात गोलंदाजांकडून काही अविश्वसनीय चेंडू बघायला मिळण्याची शक्यता वाटते.म्हणजे भुवनेशचा,मोहम्मद अमिरचा एखादा ऑफ स्टंप च्या बाहेर एक फूट पडलेला चेंडू मधली यष्टी घेऊन गेला किंवा उमेशचा लेग स्टंप वर पडलेला चेंडू ऑफ स्टंप घेऊन गेला असे कमालीचे नेत्रसुखद क्षण बघायला मिळण्याची शक्यता आहे.अशा वातावरणात स्लिप मधिल क्षेत्ररक्षकांचा दर्जा सामन्याचा निर्णय लावू शकतो.

थोडक्यात तंत्र,क्षमता,कौशल्य आणि मानसिक कणखरपणा या सर्वांचा कस लावणारा एक उत्कंठावर्धक सामना बघायला तयार राहूया.हा मोह सुटणे खरचं अवघड आहे. भारतीय संघ आपल्याला जल्लोषाचे आणखी एक निमित्त नक्की देईल अशी आशा करूया.

रवी पत्की