05 March 2021

News Flash

India vs Pakistan Match : टीम इंडियाच ‘बाहुबली’!; पाकिस्तानवर १२४ धावांनी दणदणीत विजय

भारतीय गोलंदाजांसमोर पाकिस्तानी फलंदाजांची सपशेल शरणागती

भारताचा पाकिस्तानवर दणदणीत विजय

डकवर्थ लुईसनुसार ४१ षटकांमध्ये २८९ धावांचे लक्ष्य घेऊन मैदानावर उतरलेल्या पाकिस्तानला ठराविक अंतराने धक्के देत सामना अगदी आरामात खिशात घातला. पाकिस्तानचा तेजतर्रार मारा इंग्लंडच्या अनुकूल वातावरणात कमाल करेल, अशी चर्चा होती. मात्र भारताच्या चार फलंदाजांनी अर्धशतकी खेळी साकारत पाकिस्तानी गोलंदाजांच्या मर्यादा स्पष्ट केल्या. गोलंदाजांपाठोपाठ पाकिस्तानी फलंदाजांनीदेखील नांगी टाकली. भारताच्या आक्रमणासमोर पाकिस्तानी फलंदाजांनी सपशेल शरणागती पत्करली. पाकिस्तानचा संघ भारताने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करेल, असे एकदाही या सामन्यात वाटले नाही. झंझावाती अर्धशतक झळकावत भारताला आव्हानात्मक धावसंख्या उभारुन देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या युवराजला सामनावीराचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

पाकिस्तानच्या फलंदाजीवेळी ढगाळ वातावरण नसल्याने फलंदाजी बऱ्यापैकी सोपी वाटत होती. मात्र भारतीय गोलंदाजांनी शिस्तबद्ध मारा करत पाकिस्तानी फलंदाजांसमोरील अडचणी वाढवल्या. डोंगराएवढ्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या पाकिस्तानी फलंदाजांना भारतीय गोलंदाजांनी संघर्ष करायला लावला. त्यामुळे पाकिस्तानी फलंदाज दडपणाखाली आले आणि भारतीय गोलंदाजांना विकेट्स मिळत गेल्या. सलामीवीर अझर अलीच्या पन्नास धावांचा अपवाद वगळता एकाही पाकिस्तानी फलंदाजाला चमक दाखवता आली नाही.

भुवनेश्वर कुमारने अहमद शहझादला बाद करत पाकिस्तानची सलामीची जोडी फोडली. यानंतर उमेश यादवने फॉर्मात असलेल्या बाबर आझमला स्वस्तात माघारी धाडले. अर्धशतकवीर अझर अलीचा अडसर रवींद्र जाडेजाने दूर केला आणि भारताला मोठे यश मिळवून दिले. यानंतरच पाकिस्तानी फलंदाज केवळ ‘हजेरीवीर’ ठरले. मोहम्मद हफिजने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. मात्र तो तोकडाच ठरला. अनुभवी फलंदाज शोएब मलिक, कर्णधार सरफराज अहमद अपयशी ठरल्याने भारताचा विजय निश्चित झाला. भारताकडून उमेश यादवने ३० धावांत ३ विकेट्स घेतल्या. तर हार्दिक पांड्या आणि रवींद्र जाडेजा यांनी प्रत्येकी २ फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. भुवनेश्वर कुमारने एका फलंदाजाला बाद करण्यात यश मिळवले.

तत्पूर्वी दोनवेळा वरुणराज बरसल्यावर भारतीय फलंदाज पाकिस्तानवर बसरले आणि तब्बल ३१९ धावांचा पाऊस पाडला. शिखर आणि रोहितने सुरुवातीला धावांचा शिडकावा केल्यावर विराट कोहली, युवराज सिंग मुसळधारपणे कोसळले. त्यामुळे पाकिस्तानी गोलंदाजांची जबरदस्त धुलाई झाली. शिखर, रोहित, विराट, युवराज यांनी पाडलेला पाऊस कमी म्हणून शेवटच्या षटकांत हार्दिक पांड्याने जाता जाता तीन षटकारांची आतषबाजी करत पाकिस्तानसमोरील आव्हान आणखी अवघड कसे होईल, याची काळजी घेतली.

भारतीय डावात दोनवेळा पावसाने अडथळा आणला. त्यामुळे सूर गवसलेल्या भारतीय फलंदाजीला ब्रेक लागला. मात्र तरीही भारतीय फलंदाजांनी कोणतीही हाराकिरी न करता संयमाने फलंदाजी केली. भारताच्या पाच फलंदाजांना आज फलंदाजीची संधी मिळाली. यातील चार फलंदाजांनी अर्धशतक झळकावले. रोहित शर्मा (९१) आणि शिखर धवन (६८) यांनी मोठ्या धावसंख्येचा पाया रचला. रोहित आणि धवनने पाया रचल्यावर ‘शिखर’ सर करण्याची जबाबदारी विराट कोहली आणि युवराज सिंगने पार पाडली. विराट कोहलीने नाबाद ८१ धावांची खेळी साकारली, तर युवराजने ५३ धावांची झंझावाती खेळी केली.

वेगवान गोलंदाजांना पोषक वातावरणात रोहित शर्मा आणि शिखर धवनने पाकिस्तानी आक्रमणाचा न डगमगता सामना केला. या दोघांनी संघाला शतकी दिली. आक्रमकपणे खेळणारा शिखर धवन बाद झाल्यावर भारतीय डावाचा वेग मंदावला. यानंतर कोहली आणि रोहितने अर्धशतकी भागिदारी रचली. रोहित शर्मा ९१ धावांवर धावबाद झाला. यानंतर कोहली आणि युवराजने चौकार आणि षटकारांची बरसात करत फलंदाजीचा गियर बदलला. त्यामुळे एकावेळी ३०० धावसंख्याही अवघड वाटत असताना, भारताने सहज ३०० धावांचा टप्पा सहज पार केला.

 

India vs Pakistan Champions Trophy 2017 live updates :

 • पाकिस्तानने टॉस जिंकला; प्रथम गोलंदाजीचा निर्णय
 • भारतीय संघ- रोहित शर्मा, शिखर धवन, विराट कोहली, युवराज सिंग, एम. एस. धोनी, केदार जाधव, हार्दिक पांड्या, रवींद्र जाडेजा, भुवनेश्वर कुमार, उमेश यादव, जसप्रीत बुमराह
 • पाकिस्तानी संघ- अझर अली, अहमद शेहझाद, बाबर आझम, मोहम्मद हफिझ, शोएब मलिक, सरफराझ अहमद, इमाद वासिम, मोहम्मद आमीर, शादाब खान, वहाब रिआझ, हसन अली
 • सामन्यावर पावसाचे सावट; ४५ मिनिटांनंतर पावसाचा अंदाज
 • मोहम्मद शमी, रवीचंद्रन अश्विनला विश्रांती
 • भारताच्या फलंदाजीला सुरुवात
 • मोहम्मद आमीरकडून पहिले षटक निर्धाव
 • इमाद वासीमच्या दुसऱ्या षटकात तीन धावा, २ षटकांनंतर भारत बिनबाद ३
 • भारताची सावध सुरुवात; ४ षटकांनंतर बिनबाद ९
 • पाच षटकांनंतर भारत बिनबाद १५
 • सहा षटकांनंतर भारताच्या बिनबाद २१ धावा
 • ७ षटकांनंतर भारत बिनबाद २७; शिखर धवन ७, रोहित शर्मा १९ वर नाबाद
 • ९ षटकांनंतर भारत बिनबाद ३७; शिखर धवन १२, रोहित शर्मा २४ धावांवर नाबाद
 • ९.५ षटकांनंतर भारताच्या बिनबाद ४६ धावा; पावसामुळे खेळ थांबला
 • पाऊस थांबल्याने खेळाला सुरुवात
 • भारतीय संघाचे अर्धशतक; सलामीची जोडी मैदानात
 • १४ षटकांनंतर भारताच्या बिनबाद ६२ धावा; रोहित शर्मा ३३, तर शिखर धवन २६ धावांवर नाबाद
 • १६ षटकांनंतर भारत बिनबाद ७९; रोहित शर्मा ४२, शिखर धवन ३३ धावांवर नाबाद
 • रोहित शर्माचे शानदार अर्धशतक
 • भारताच्या शंभर धावा पूर्ण
 • रोहितपाठोपाठ शिखर धवनचे अर्धशतक
 • शिखर धवन ६८ धावा काढून बाद; भारताला पहिला धक्का
 • भारताच्या १५० धावा पूर्ण
 • पावसामुळे पुन्हा खेळ थांबला; भारत १ बाद १७३
 • पाऊस थांबल्यामुळे खेळ सुरू
 • ३६ षटकांनंतर भारताच्या १ बाद १८९ धावा
 • दुसऱ्या विकेटसाठी विराट कोहली आणि रोहित शर्माची अर्धशतकी भागिदारी
 • रोहित शर्मा ९१ धावांवर बाद; भारताला दुसरा धक्का
 • भारताने ओलांडला २०० धावांचा टप्पा
 • ४० षटकांनंतर भारत २ बाद २१३; कोहली ३५, युवराज १५ धावांवर नाबाद
 • ४२ षटकांनंतर भारत २ बाद २३०
 • विराट कोहलीचे शानदार अर्धशतक
 • भारताने ओलांडला २५० धावांचा टप्पा
 • युवराज आणि कोहलीची घणाघाती फलंदाजी; ४५.५ षटकांनंतर भारत २ बाद २८५ धावा
 • भारताला तिसरा धक्का; युवराज ५३ धावांवर बाद
 • पांड्याकडून शेवटच्या षटकांत षटकारांची बरसात; पहिल्या तीन चेंडूंवर उत्तुंग षटकार
 • पाकिस्तानसमोर डरवर्थ लुईस नियमानुसार ३२४ धावांचे आव्हान
 • चार षटकांनंतर पाकिस्तानच्या बिनबाद २१ धावा; अझर अली १२, तर अहमद शेहझाद ७ धावांवर नाबाद
 • पावसामुळे खेळ थांबला; पाकिस्तानच्या ४.५ षटकांत बिनबाद २२ धावा
 • पाऊस थांबल्यावर पुन्हा खेळ सुरू; पाकिस्तानसमोर ४१ षटकांत २८९ धावांचे सुधारित लक्ष्य
 • पाकिस्तानला पहिला धक्का; अहमद शहझाद १२ धावांवर बाद
 • भारताला दुसरे यश; बाबर आझम ८ धावांवर बाद
 • १९ षटकांनंतर पाकिस्तान २ बाद ८७; अझर अली ४९, मोहम्मद हफिझ १३ धावांवर नाबाद
 • अझर अलीचे अर्धशतक
 • अर्धशतकवीर अली बाद; जाडेजाच्या गोलंदाजीवर झेलबाद
 • २२ षटकांनंतर पाकिस्तान ३ बाद १०२
 • पाकिस्तानला चौथा धक्का; मलिक १५ धावांवर बाद
 • पाकिस्तानचा निम्मा संघ तंबूत; हफिज ३३ धावा काढून बाद
 • पाकिस्तानचा सहावा फलंदाज माघारी; इमाद वसिम शून्यावर बाद
 • पाकिस्तानला सातवा दणका; सरफराज अहमद १५ धावांवर बाद
 • भारताला आठवं यश; आमीर ९ धावांवर बाद
 • पाकिस्तानला नववा झटका; हसन अली शून्यावर बाद
 • पाकिस्तानला वहाब रियाझ दुखापतग्रस्त असल्याने फलंदाजी करणार नाही
 • भारताचा पाकिस्तानवर १२४ धावांनी दणदणीत विजय

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 4, 2017 2:37 pm

Web Title: india vs pakistan champions trophy 2017 live updates virat kohli ms dhoni yuvraj singh sarfraz ahmed mohammad amir
Next Stories
1 india vs pakistan champions trophy 2017: पाकिस्तानी फलंदाजांना रोखण्यासाठी असे आहे कोहलीचे खास प्लॅनिंग
2 लंडनमधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत- पाक सामन्यातील सुरक्षा व्यवस्थेत वाढ
3 Blog: अंतिम सामन्याच्या आधीचा अंतिम सामना
Just Now!
X