चॅम्पियन्स करंडक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात रंगणाऱ्या सामन्यासाठी दोन्ही देशातील क्रिकेटप्रेमींची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. स्पर्धेतील सलामीचा सामना जिंकून विजयी सुरुवात करण्यासाठी दोन्ही संघ उत्सुक असतील. या स्पर्धेतील सामन्यासाठी दोन्ही संघानी आपापल्यापरिने पूर्ण तयारी देखील केली आहे. दरम्यान, पाकिस्तानच्या ताफ्यातील गोलंदाजीला सडेतोड उत्तर देण्यासाठी भारतीय फलंदाजी भक्कम आहे. मात्र, पाकिस्तानप्रमाणे गोलंदाजीमध्ये धार आणण्यासाठी कर्णधार विराट कोहली प्रयत्नशील दिसतोय. यासाठी त्याने खास योजनाही आखली आहे. पाकिस्तानविरुद्धच्या हायहोल्टेज सामन्यात संघात वेगवान गोलंदाजीची कमी भासू नये, यासाठी त्याने खास काळजी घेतली असून या सामन्यात रवींद्र जडेजाकडून कोहली जलदगती गोलंदाजी करवून घेऊ शकतो.

या सामन्यापूर्वी भारतीय संघाने नेटमध्ये कसून सराव केला. यावेळी विराट कोहलीने रवींद्र जाडेजाकडून जलदगती गोलंदाजीचा सराव करुन घेतला. त्यामुळे पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात जाडेजा डावखुऱ्या हाताने फिरकी गोलंदाजीशिवाय वेगवान गोलंदाजी करताना दिसू शकते. भारताची फलंदाजी भक्कम आहे. तर पाकिस्तानच्या ताफ्यात मोठी वेगवान गोलंदाजांची फौज आहे. त्यात मोहम्मद आमिर, जुनैद खान आणि वहाब रियाज असे आग ओकणारे गोलंदाज आहेत. हे लक्षात घेऊनच कोहलीने भारतीय गोलंदाजीत धार आणण्यासाठी खास तयारी केल्याचे दिसते. कोहली जाडेजाला जलदगती गोलंदाजी करुन घेणार का हे सामना सुरु झाल्यानंतरच समजेल. तो त्याचा वापर कशापद्धतीने करणार हे पाहणे निश्चितच उत्सुकतेचे असणार आहे.

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना हा नेहमीच चुरशीचा असतो. या सामन्यात चॅम्पियन्स करंडक स्पर्धेतील सराव सामन्यात दमदार कामगिरी केलेल्या शिखर धवनसह कोहली,  युवराज सिंग आणि महेंद्रसिंग धोनी यांच्यावर फलंदाजीची मदार असेल.