भारतीय सलामीवीरांनी पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात इतिहास रचला आहे. शिखर धवन आणि रोहित शर्माने शानदार शतकी भागिदारी रचत संघाला चांगली सुरुवात करुन दिली. या शतकी भागिदारीसोबतच चॅम्पियन करंडक स्पर्धेत तीन शतकी भागिदाऱ्यांची नोंद करणारी पहिली जोडी होण्याचा मान शिखर आणि रोहितने पटकावला आहे. याआधी कोणत्याही जोडीला चॅम्पियन करंडक स्पर्धेत तीनवेळा शतकी भागिदारी रचता आलेली नाही.

रोहित शर्मा आणि शिखर धवनने सुरुवातीच्या सावध पवित्र्यानंतर आक्रमक खेळ केला. दोघांनी अर्धशतके झळकावत भारताला सुस्थितीत नेले. रोहित शर्मा आणि शिखर धवनने १४७ चेंडूंमध्ये १३६ धावांची भागिदारी रचत संघाला मोठ्या धावसंख्येचा पाया रचून दिला. शिखरने ६५ चेंडूंमध्ये ६८ धावा केल्या. यामध्ये ६ चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. रोहितच्या साथीने शिखरने भारताला शानदार सुरुवात करुन दिली. चॅम्पियन्स करंडक स्पर्धेच्या इतिहासात कोणत्याही जोडीला अद्याप तीनवेळा शतकी भागिदारी रचता आलेली नाही. ही ऐतिहासिक कामगिरी रोहित आणि शिखरने करुन दाखवली.

रोहित शर्माने पाकिस्तानविरुद्ध आपली सर्वाधिक धावसंख्या नोंदवली. याआधी रोहित शर्माने २०१२च्या आशिया चषक स्पर्धेत पाकिस्तानविरुद्ध ६८ धावा केल्या होत्या. रोहितने आज पाकिस्तानविरुद्धची आपली कामगिरी सुधारली आहे. या सामन्यात भारताने संथ सुरुवात केली. २०१५ नंतर पहिल्यांदाच पॉवरप्लेमध्ये भारतीय संघाने अतिशय संथ सुरुवात केली. मात्र पाऊस थांबताच रोहित आणि धवनने धावांचा पाऊस पाडला आणि शतकी सलामी दिली.