पाकिस्तान विरुद्धच्या हाय व्होल्टेज सामन्यात सलामीवीर रोहित शर्माने शानदार खेळी साकारली. रोहित शर्माने ९१ धावा करत भारताला मोठ्या धावसंख्येच्या दिशेने नेले. मात्र रोहित शर्मा शतक झळकावण्यात अपयशी ठरला. शतकाला ९ धावा हव्या असताना रोहित शर्मा धावचीत झाला. मात्र जर हाच प्रकार जूनऐवजी ऑक्टोबरमध्ये घडला असता, तर रोहित शर्मा नाबाद ठरला असता. कारण १ ऑक्टोबर २०१७ पासून आयसीसी नवे नियम लागू करणार आहे.

सध्याच्या नियमानुसार, जेव्हा चेंडू स्टंपवर लागतो, तेव्हा फलंदाजाचे शरीर किंवा बॅट क्रिझमध्ये असावी लागते. म्हणजे जर एखाद्या फलंदाजाचे शरीर किंवा बॅट आधी क्रिझमध्ये असेल, मात्र ज्यावेळी चेंडू स्टंपला लागतो, त्यावेळी क्रिझमध्ये नसेल, तर त्याला बाद ठरवण्यात येते. थोडक्यात काय तर, चेंडू स्टंपला लागताना फलंदाजाचे शरीर किंवा बॅट हवेत असेल, तर खेळाडूला बाद ठरवले जाते. मग चेंडू लागण्याआधी जर त्याचे शरीर किंवा बॅट क्रिझमध्ये असेल, तरी त्याला बादच दिले जाते. चेंडू स्टंपला लागतेवेळी शरीर आणि बॅट कुठे होती, याचाच विचार सध्या केला जातो. त्यामुळेच पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात रोहित शर्मा क्रिझमध्ये आला असूनही त्याला बाद देण्यात आले. कारण यष्टिरक्षकाने चेंडू स्टंपला लावला, त्यावेळी रोहितची बॅट हवेत होती. त्यामुळेच तिसऱ्या पंचांनी रोहितला बाद ठरवले.

चार महिन्यानंतर जर हा प्रकार घडला असता, तर रोहित शर्मा नाबाद ठरला असता. कारण १ ऑक्टोबर २०१७ पासून आयसीसीच्या नियमांमध्ये बदल होणार आहेत. नव्या नियमानुसार, फलंदाजाची बॅट किंवा शरीर एकदा क्रिझमध्ये आले, की त्या फलंदाजाला बाद ठरवता येणार नाही. मग ज्यावेळी चेंडू स्टंपला लागेल, त्यावेळी जरी फलंदाजाचे शरीर किंवा बॅट हवेत असेल, तरी त्याला नाबादच ठरवले जाईल. त्यामुळे जर हा महिना ऑक्टोबर असता, किंवा रोहितसोबत जर अशाप्रकारे ऑक्टोबरमध्ये धावचीताचे अपील झाले असते, तर तो नाबाद ठरला असता.