05 March 2021

News Flash

लंडनमधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत- पाक सामन्यातील सुरक्षा व्यवस्थेत वाढ

बीसीसीआय आणी पीसीबीसोबत गुप्तचर यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनी केली चर्चा

संग्रहित छायाचित्र

लंडनमध्ये शनिवारी रात्री झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर बर्मिंगहॅममध्ये होणाऱ्या भारत- पाकिस्तान सामन्याच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. सामन्यादरम्यान दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता असल्याचा इशारा युरोपमधील गुप्तचर यंत्रणांनी दिल्याचे वृत्त असून या पार्श्वभूमीवर सुरक्षेत वाढ केल्याचे समजते.

चॅम्पियन्स ट्रॉफीत आज (रविवारी) भारत आणि पाकिस्तान हे परंपरागत प्रतिस्पर्धी बर्मिंगहॅमच्या मैदानात भिडणार आहे. या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले असतानाच लंडनमध्ये शनिवारी रात्री पुन्हा एकदा दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात सहा जणांचा मृत्यू झाला असून तिन्ही हल्लेखोरांना कंठस्नान घालण्यात यश आले आहे. या हल्ल्याचे पडसाद भारत – पाक सामन्यावरही उमटले आहेत. मध्य लंडनमध्ये ज्या ठिकाणी हा हल्ला झाला तिथून स्टेडियम २०८ किलोमीटर अंतरावर आहे. पण लंडनमध्ये महिनाभरात दुसऱ्यांदा हल्ला झाल्यावर बीसीसीआय आणि पीसीबीच्या पदाधिकाऱ्यांशी गुप्तचर यंत्रणेने संपर्क साधला. खेळाडूंच्या सुरक्षेकडे लक्ष दिले जात असल्याची ग्वाही अधिकाऱ्यांनी दोन्ही बोर्डांना दिली आहे.

बोर्डाचे पदाधिकारी किंवा खेळाडूंनी सुरक्षेसंदर्भात प्रसारमाध्यमांशी बोलणे टाळावे असे आवाहनही अधिकाऱ्यांनी केले आहे. प्रसारमाध्यमांना सांगितल्यास नाहक भीतीचे वातावरण निर्माण होईल असे गुप्तचर यंत्रणेचे मत आहे. गेल्या महिन्यात मँचेस्टरमध्ये हल्ला झाल्यानंतर सुरक्षा व्यवस्थेत आधीपासूनच वाढ करण्यात आली आहे असे अधिकाऱ्यांनी निदर्शनास आणून दिले. आयसीसीनेही हल्ल्यानंतर प्रसिद्धी पत्रक काढून चिंता करण्याची गरज नाही असे म्हटले आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीत सुरक्षेवर भर दिला जात असून संभाव्य धोका पाहता वेळोवेळी सुरक्षा दलातील अधिकाऱ्यांशी चर्चा सुरु असल्याचे आयसीसीने म्हटले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 4, 2017 11:38 am

Web Title: india vs pakistan champions trophy 2017 security beefed up for match bcci pcb uk intelligence
Next Stories
1 Blog: अंतिम सामन्याच्या आधीचा अंतिम सामना
2 पाकिस्तानला हरवणे : अ बिलियन ड्रीम्स!
3 भारताची जर्मनीशी बरोबरी
Just Now!
X