भारत-पाकिस्तान हे पारंपारिक प्रतिस्पर्धी जेव्हा आमनेसामने असतात तेव्हा प्रत्येकाची उत्सुकता जबरदस्त ताणलेली असते. हा सामना पाहण्यासाठी प्रत्येकाची धडपड असते. कुठुनही कसेही करून घरी पोहोचणे किंवा ज्यांना शक्य असेल ते प्रत्यक्ष सामना पाहण्यासाठी स्टेडिअममध्ये गाठतात. मग तो कोणीही असो. याला कोणताच क्रिकेटप्रेमी अपवाद नाही. आताही एजबस्टन येथे सुरू असलेल्या सामन्यावेळीही हेच दिसून आले. भारतातील बँकांचे ९ हजार कोटी बुडवून लंडन गाठलेल्या विजय मल्ल्यालाही भारत आणि पाकिस्तान यांच्यात सुरू असलेल्या सामन्याबाबतची उत्सुकता लपवता आली नाही. भारतातून पसार झालेला हा उद्योगपती इंग्लंडमध्येही कोणाला सहजासहजी उपलब्ध होत नाही. पण त्याने चॅम्पियन्स ट्रॉफीतील सामन्यास आवर्जून उपस्थिती लावल्याचे दिसून आले.

एजबस्टनच्या मैदानात विजय मल्ल्या सामना पाहत असल्याचे छायाचित्र सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहे. यावरूनही नेटिझन्स विजय मल्ल्याचा समाचार घेताना दिसत आहेत. स्टेडिअममध्ये उपस्थित असलेल्यांनी लगेचच विजय मल्ल्याचे सामना पाहतानाचे छायाचित्र काढून ते व्हायरल केले. भारतातील सार्वजनिक बँकांची ९ हजार कोटींची देणी बुडवल्याचा मल्ल्यावर आरोप आहे. मल्ल्या हे आरोप नेहमी फेटाळत आले आहेत. काही दिवसांपूर्वी लंडन पोलिसांनी ताब्यात घेतले होते. परंतु, काही काळानंतर त्यांना पुन्हा सोडून दिले होते.

दरम्यान, यंदाच्या आयपीएलमध्ये विजय मल्ल्या यांच्या मालकीच्या बेंगळुरू रॉयल चॅलेंजर्स संघाची कामगिरी अत्यंत खराब झाली. हा संघ तळाला राहिला होता. यावरूनही विजय मल्ल्याला नेटिझन्सनी टीकेचे धनी केले होते.