इस्लामाबाद येथे भारताविरुद्ध होणारी डेव्हिस चषकातील आशिया/ओशियाना गट-१ मधील लढत त्रयस्थ ठिकाणी खेळवण्यास पाकिस्तान टेनिस महासंघाने (पीटीएफ) नकार दिला आहे. इस्लमाबाद क्रीडा संकुलात होणारी ही लढत आयोजित करण्यासाठी पाकिस्तान टेनिस महासंघ सर्व तयारी करत आहे, असे पीटीएफचे अध्यक्ष सलीम सैफुल्ला यांनी सांगितले. ‘‘१४-१५ सप्टेंबर रोजी होणारी ही लढत पूर्वनियोजित वेळेनुसार खेळवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. इस्लामाबाद येथे येण्यासाठी भारतीय संघाला असुरक्षित वाटावे, असे कोणतेही कारण मला दिसत नाही,’’ असेही त्यांनी सांगितले.

काही दिवसांपूर्वीच जम्मू आणि काश्मीरमधील ३७० कलम केंद्र सरकारने रद्द केल्यानंतर दोन्ही देशांमधील संबंध पुन्हा एकदा ताणले गेले आहेत. त्यामुळे ही लढत त्रयस्थ ठिकाणी खेळवण्यात यावी, अशी मागणी भारतीय टेनिस महासंघाने आंतरराष्ट्रीय टेनिस महासंघाकडे केली होती.

याविषयी सैफुल्ला म्हणाले, ‘‘भारतीय संघ पाकिस्तानात पूर्णपणे सुरक्षित आहे. इस्लामाबाद हे शहर सुरक्षित असून चार दिवस भारतीय संघाचे येथे वास्तव्य असणार आहे. त्यांच्यासाठी हॉटेलमध्ये आणि स्पर्धेच्या ठिकाणी उच्च दर्जाची सुरक्षाव्यवस्था ठेवण्यात आली आहे. त्यामुळे त्यांना इस्लामाबादमध्ये खेळण्यास कोणतीच हरकत नसावी. महसूल आणि पाकिस्तानमध्ये टेनिस खेळाचा प्रसार करण्यासाठी ही लढत होणे महत्त्वाचे आहे. भारताने आक्षेप घेतला तर आम्ही चाहत्यांनाही ही लढत पाहण्याची परवानगी देणार नाही.’’

‘‘प्रदीर्घ कालावधीनंतर पाकिस्तानमध्ये डेव्हिस चषकाची लढत होत आहे. त्यामुळे कोणताही अडथळा येऊ नये, यासाठी आम्ही क्रीडा मंत्रालयाच्या संपर्कात आहोत,’’ असेही सैफुल्ला म्हणाले.