आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताचा खेळ आत्तापर्यंत खूप छान झाला आहे. भारताने फायनलमध्ये धडक मारली आहे. तर भारताचा कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्ताननेही फायनलमध्ये प्रवेश केला आहे. या दोन संघांची मॅच बघताना, प्रत्येक बॉल, प्रत्येक शॉट पाहताना प्रेक्षकांच्या काळजाचा ठोका चुकणार आहे. दोन्ही देशांमध्ये असलेल्या तणावाच्या संबंधांची कल्पना सगळ्या जगाला आहे. त्याचमुळे या दोन देशांमधला क्रिकेटचा सामना ही एक लढाईच असते, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. उद्याही भारत आणि पाकिस्तान यांच्यात एक रोमहर्षक सामना बघायला मिळेल यात काहीही शंका नाहीये. या सामन्याची धावपट्टी फलंदाजांना साजेशी असल्याचे वृत्त समोर आले आहे.

साखळी सामन्यांच्या सुरूवातीच्याच मॅचमध्ये पाकिस्तानला भारताने चारी मुंड्या चीत केले होते. याच विजयाची उद्या मैदानात पुनरावृत्ती होणार आहे हे टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने म्हटले आहे. भारताकडून पराभव स्वीकारल्यानंतर पाकिस्तानने आपला खेळ जोमाने सुधारत फायनलमध्ये धडक मारली आहे. त्यामुळे उद्याच्या सामन्यात पाकिस्तानही पूर्ण तयारीनिशी उतरणार यात शंकाच नाहीये. टीम इंडियावर सामना जिंकण्याचे प्रेशर आहे. या प्रेशरचा फायदा पाकिस्तान घेण्याची संधी पाकिस्तान सोडणार नाही. त्यामुळे टीम इंडियाच्या खेळाडूंना उद्या मैदानात संयमाने फटकेबाजी करावी लागणार आहे.

उद्या जो संघ फायनल जिंकेल त्या संघावर पुरस्कारांची बरसात होणार आहे. तर जो संघ हारेल त्याला सगळ्या जगातल्या क्रिकेट रसिकांकडून टीका सहन करावी लागणार आहे. त्यामुळे सामना जिंकण्याचे टेन्शन दोन्ही संघांवर आहे. आजवरच्या सामन्यांचा विचार केला तर भारतासमोर पाकिस्तानचा पाडावच झाला आहे. पाकिस्तानी टीमच्या खेळाचा आलेख दिवसेंदिवस घसरतोय त्यामुळे भारत पाकिस्तान सामन्यामध्ये आता पूर्वीसारखी मजा उरली नाहीये असे टीम इंडियाचा कप्तान विराट कोहलीने म्हटले आहे. असे सगळे असले तरीही उद्या मैदानात काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

कुठे असणार फायनल मॅच?
ओव्हल मैदान, लंडन
काय आहे मॅचची वेळ?
भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी ३ वाजता
भारत पाकिस्तान मॅच दरम्यान जाहिरातींचे दर किती?
भारत पाकिस्तान दरम्यान टीव्हीवर दाखवण्यात येणाऱ्या जाहिरातींचा दरांनी आभाळ गाठलं, ३० सेकंदासाठी मोजले गेले १ कोटी रूपये
पिचची अवस्था नेमकी कशी?– भारत पाकिस्तान सामन्यासाठी नव्या पीचचा वापर होणार आहे. हा पीच कोरडा असू शकतो. हा पीच बॅटिंग पीच आहे. त्यामुळे फायनल सामन्याचा विचार करता, या मैदानात धावांचा डोंगर उभा राहू शकतो अशी स्थिती
वातावरणकसे असेल?-ओव्हल मैदानावर काहीसे ढग दाटून येऊ शकतात
अंपायर कोण असणार?
मैदानात – एम. इरासमस आणि आर केटलबोरो
थर्ड अंपायर-आर. टकर
फोर्थ अंपायर– कुमार धर्मसेना

भारतीय संघ-विराट कोहली(कर्णधार), शिखर धवन, रोहित शर्मा, युवराज सिंह, एम.एस. धोनी, केदार जाधव, हार्दिक पंड्या, आर. अश्विन, रविंद्र जडेजा, जसप्रीत बुमरा, भुवनेश्वर कुमार, दिनेश कार्तिक, मोहम्मद शमी, अजिंक्य रहाणे, उमेश यादव

पाकिस्तानी संघ-सरफराज अहमद(कर्णधार), अहमद शहजाद, अजहर अली, बाबर आजम, मोहम्मद हफीज, शोएब मलिक, हसन अली, मोहम्मद आमिर, रूम्मान रईस, जुनैद खान, इमाद वसीम, फहीम अशरफ, शादाब खान, फखर जमान, हारिस सोहेल