कोणत्याही विश्वचषक स्पर्धेत सर्वाचे लक्ष लागले असते ते भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणाऱ्या लढतीकडे. हा बहुचर्चित सामना म्हणजे खेळाडूंसाठीच नव्हे तर चाहत्यांसाठी अवर्णनीय आनंदाचा सोहळा असतो. विश्वचषकात २२ यार्डावर रविवारी होणाऱ्या या घमासान युद्धासाठी भारत आणि पाकिस्तानच्या खेळाडूंसह चाहते आणि वरुणराजाही सज्ज झाला आहे.

शेजारील राष्ट्रांमध्ये सध्या तणाव अधिकच वाढत चालला असल्यामुळे या सामन्याची उत्सुकता सर्वानाच लागून राहिली आहे. विश्वचषकात भारताने पाकिस्तानला अद्याप एकदाही विजयाची चव चाखायची संधी न दिल्यामुळे या सामन्यातही विराटसेना पाकिस्तानवर कुरघोडी करून विजयाची परंपरा अबाधित राखण्यासाठी उत्सुक आहे.

ओल्ड ट्रॅफर्डच्या खेळपट्टीवर गोलंदाजांचे वर्चस्व राहील, असा अंदाज असल्यामुळे मोहम्मद आमीरच्या वेगवान माऱ्याचा सामना करताना भारतीय फलंदाजांनी अधिक आक्रमकपणा दाखवण्याचा सल्ला भारताचा महान खेळाडू सचिन तेंडुलकरने दिला आहे. मात्र पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी आम्ही सकारात्मक दृष्टिकोन ठेवला आहे, असे कर्णधार विराट कोहलीने स्पष्ट केले आहे. भलेही आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानची कामगिरी खालावत चालली असली तरी भारताविरुद्धच्या सामन्यात ते पेटून उठून कामगिरी करतात, हा इतिहास आहे. मात्र विश्वचषकाच्या इतिहासात आतापर्यंत सहा सामन्यांत पाकिस्तानची मात्रा चाललेली नाही, हेही तितकेच खरे असल्यामुळे भारताच्या सातव्या विजयाची उत्सुकता सर्वाना लागून राहिली आहे.

रोहित, विराटवर मदार

सलामीवीर शिखर धवनच्या डाव्या हाताला दुखापत झाल्यामुळे तो किमान तीन आठवडे खेळू शकणार नाही. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात शतक झळकावून धवनने आपणही बहरात आल्याचे दाखवून दिले होते. मात्र पाकिस्तानविरुद्ध त्याची उणीव भारताला जाणवणार आहे. पाकिस्तानविरुद्ध कोहलीनेही जबरदस्त कामगिरी केली असून २०१५मध्ये त्याने शतकी खेळी केली होती. गेल्या दोन्ही सामन्यांत अनुक्रमे शतक आणि अर्धशतकी खेळी करणाऱ्या रोहित शर्माला तसेच जगातील सर्वोत्तम फलंदाज असलेल्या विराट कोहलीला रोखण्यासाठी पाकिस्तानचे गोलंदाज हसन अली, आमीर आणि शाहीन आफ्रिदी यांची कसोटी लागणार आहे.

भारताच्या मधल्या फळीकडून अपेक्षा

न्यूझीलंडविरुद्धचा पावसामुळे रद्द झालेला सामना वगळता दक्षिण आफ्रिकेविरुद्ध रोहितने तर ऑस्ट्रेलियाविरुद्ध धवनने शतक झळकावल्यामुळे मधल्या फळीला फलंदाजीची फारशी संधी मिळाली नव्हती. लोकेश राहुल आता सलामीला उतरणार असल्यामुळे चौथ्या क्रमांकावर विजय शंकरला संधी मिळू शकते. त्यामुळे केदार जाधव, शंकर, महेंद्रसिंग धोनी आणि हार्दिक पंडय़ा या मधल्या फळीकडून भारताला भरीव योगदानाची अपेक्षा असेल.

एका फिरकीपटूला विश्रांती

पाकिस्तानचे फलंदाज फिरकी मारा सहजपणे खेळून काढतात, हे लक्षात घेता येथील वेगवान गोलंदाजीला साथ मिळणाऱ्या खेळपट्टीवर यजुर्वेद्र चहल किंवा कुलदीप यादव यांच्यापैकी एकाला विश्रांती मिळू शकते. त्यांच्या जागी मोहम्मद शमी अधिक प्रभावी ठरण्याची चिन्हे आहेत. जसप्रीत बुमरा आणि भुवनेश्वर कुमार यांनी पाकिस्तानविरुद्ध नेहमीच चांगली कामगिरी केली असून त्यांच्याकडून तशाच कामगिरीची अपेक्षा भारताला असेल.

पाकिस्तानची भिस्त फलंदाजीवर

यंदाच्या विश्वचषकात पाकिस्तानची गोलंदाजी अपेक्षेप्रमाणे होत आहे. मात्र फलंदाजांच्या कामगिरीच्या जोरावर इंग्लंडविरुद्ध ८ बाद ३४८ धावा उभारत पाकिस्तानने एकमेव विजयाची नोंद केली आहे. फखर झमान, बाबर आझम, मोहम्मद हाफीझ आणि शोएब मलिक यांच्यावर पाकिस्तानच्या फलंदाजीची भिस्त असली तरी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात कर्णधार सर्फराज अहमद आणि वहाब रियाज यांनीही आक्रमक फलंदाजी केली होती.

खेळपट्टीचा अंदाज

ओल्ड ट्रॅफर्ड स्टेडियमच्या खेळपट्टीवर चेंडूला वळण देण्याची संधी फिरकीपटूंना मिळणार आहे. ही खेळपट्टी काहीशी कोरडी असल्यामुळे सामन्याच्या दुसऱ्या डावात रिव्हर्स-स्विंग मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे या सामन्यावर गोलंदाजांचेच वर्चस्व पाहायला मिळणार आहे.

सर्वाच्या नजरा पावसावर : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील महामुकाबल्यासाठी सर्वाच्या नजरा लागल्या आहेत, त्या मँचेस्टरमधील वातावरणावर. न्यूझीलंडविरुद्धचा भारताचा सामना पावसामुळे रद्द झाल्यानंतर आता रविवारच्या सामन्यावरही पावसाचे सावट आहे. मँचेस्टरमध्ये सकाळी हलक्या सरी बरसल्यानंतर सूर्याचे दर्शन होईल. मात्र दुसऱ्या टप्प्यात पुन्हा एकदा पावसाचे आगमन होणार आहे. त्यामुळे पूर्ण ५०-५० षटकांचा खेळ होईल, अशी शक्यता धूसर आहे.

पाकिस्तान संघात गुणवत्ता आहे, पण आमची कामगिरी सांघिक झाली तर जगातील कोणत्याही संघाला हरवू शकतो. पहिल्या दोन सामन्यांतही आमचा तोच दृष्टिकोन होता आणि नंतरही राहील. पाकिस्तानच्या क्षमतेचा आम्ही विचार करत नसून आम्ही आमच्या क्षमतेनुसार कामगिरी करणार आहोत.     – विराट कोहली, भारताचा कर्णधार

प्रसारमाध्यमांमध्ये या सामन्याविषयी जोरदार प्रचार झाला असला तरी प्रत्येक सामन्याप्रमाणेच या सामन्यातही आमच्यावर तसेच दडपण असेल. खेळपट्टीचे स्वरूप पाहूनच अंतिम संघात बदल करण्याचा निर्णय घेण्यात येईल. आम्ही क्षेत्ररक्षणात सुधारणा करण्याचा प्रयत्न केला आहे.     – मिकी आर्थर, पाकिस्तानचे प्रशिक्षक