|| संतोष सावंत

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून लंडनला जाणारे ते विशेष विमान आपल्या खास प्रवाशांची आतुरतेने वाट पाहात उभे होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमिताभ बच्चन, शाहरूख खान, लालूप्रसाद यादव, सलमान खान अशा सुप्रसिद्ध असामी या विमानाने एकत्र प्रवास करणार असल्याने कडेकोट सुरक्षा व्यवस्था होती. मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर रंगणाऱ्या भारत आणि पाकिस्तान यांच्यातील महालढतीला हजेरी लावण्यासाठी ही मंडळी चालली होती.

सर्वप्रथम विमानतळावर ‘बिग बी’ पोहोचले. ‘‘अपून जिधर खडा होता है, लाइन वहींसे शुरू होती है..’’ असे म्हणत ते विमानात चढण्यासाठी जाणार तेवढय़ात त्यांची वाट लालूजींनी अडवली. ‘‘अरे वा, तुम्हालाही क्रिकेट आवडते का?’’ या अमिताभजींच्या प्रश्नावर चारा चघळत असल्यासारखे ते उद्गारले, ‘‘अच्छे में रहो, या बुरे में, लेकीन रहो हमेशा चर्चे में, यही अपना मूलमंत्र है!’’

‘मूल’ हा शब्द ऐकून ‘बिग बीं’ना लालूजींच्या नऊ  मुलांची आठवण झाली आणि ते हसू लागले. लालूजींच्या सोबत अवाढव्य अशी बोचकी होती. त्यातून चाऱ्याचा वास येत असल्याचे सुरक्षारक्षकांचे म्हणणे होते. पण तेवढय़ात शाहरुख आणि सलमान आले आणि या गडबडीत लालूजींनी आपले सामान भराभर विमानात चढवून घेतले.

लालूजी विमानात चढले आणि त्यांच्या पाठोपाठ ‘बिग बी’. शाहरुख आणि सलमान विमानतळावर भेटल्यापासूनच ‘‘भाईजान, तुसी ग्रेट हो! किंग खान, तुसी ग्रेट हो!’’ अशी एकमेकांची स्तुती करत होते. विमानात न चढता शिडीजवळ उभे राहून त्यांचे तेच सुरू होते. शेवटी ‘बिग बीं’नी दरवाजातून सांगितले की विमानात बोलायला काही तरी शिल्लक ठेवा. तेव्हा कुठे ते ओशाळून विमानात चढले. प्रत्येक प्रवाशाला ‘विंडो सीट’ हे त्या विमानातील बैठक व्यवस्थेचे वैशिष्टय़ होते. ‘‘सर्वजण आपापल्या जागेवर बसा, खुर्चीच्या पेटय़ा बांधून घ्या, विमान उड्डाणासाठी तयार आहे,’’ अशी घोषणा कानी पडली. जेवणासाठी थांबलेली एसटी आपल्याच सीटवर बसलेल्या सहप्रवाशाला मागे सोडून पुढील प्रवासाला निघाल्यानंतर आपल्या मनात जी भावना निर्माण होते, त्याच भावनेने सर्वजण एका स्वरात ओरडले की, ‘‘विमान थांबवा.. विमान थांबवा.. मोदीजी अजून आलेले नाहीत!’’ विमानाने जेव्हा हालचाल करण्यास सुरुवात केली, तेव्हा सर्वानी विमान थांबवण्यासाठी एकच गोंधळ घातला. तितक्यात कॉकपिटचे दार उघडून स्वत: मोदीजीच आत आले आणि त्यांनी हाक मारली.. ‘‘मित्रों..’’ त्यांना पाहून सर्वजण थक्क झाले. आजकाल मोदीजी या विमानातच राहायला असतात, विमान दुसऱ्या देशात पोहोचल्याची खात्री झाल्यानंतरच खाली उतरतात. अशी गोपनीय माहिती यासंदर्भात विमान कर्मचाऱ्यांनी पुरवली.

मोदीजी आपल्या सीटवर येऊन बसले आणि विमान धावपट्टीवरून पुढे सरकू लागले. तेवढय़ात करकचून ब्रेक लागले. विमान झेलपाटले आणि त्यासोबत सहप्रवासीही. ‘बिग बीं’चे डोके ताळ्यावर असल्याने ते बचावले. लालूजींचे टाळके मात्र सणकून निघाले होते. चिडलेला सलमान हिंदीत आणि शाहरुख इंग्रजीत शिव्या घालत होता. मोदीजी मात्र शांत दिसत होते. एक पांढऱ्या साडीतील मध्यमवयीन महिला अचानक विमानासमोर आली होती. ‘‘जो मोदी कर सकते है, वो मैं भी कर सकती हूं!’’ असे म्हणत या दीदी सुरक्षारक्षकांशी हुज्जत घालत होत्या. मोदी चालले आहेत म्हणून त्यांनाही लंडनला जायचे होते. त्यांच्या उच्चारांवर असलेली बंगाली भाषेची छाप स्पष्ट जाणवत होती. मोदीजींनी हिरवा सिग्नल दिला, तेव्हा त्यांनाही विमानात घेण्यात आले आणि शेवटी एकदाचे विमान आकाशात झेपावले.

..भारत-पाकिस्तान सामना पाहत असताना स्टॅण्ड्समध्ये मोदीजींच्या आजूबाजूलाच अनेक तारांकित मंडळींसोबत दीदीही दिसण्याची शक्यता आहे. तेव्हा तुम्ही प्रत्यक्षच पाहा ना!