|| प्रशांत केणी

‘डॉन’ या पाकिस्तानमधील अग्रगण्य वृत्तपत्राने १५ फेब्रुवारी २०१५ या दिवशी झालेल्या भारत-पाकिस्तान विश्वचषक क्रिकेट सामन्याचे दुसऱ्या दिवशी सडेतोडपणे विश्लेषण केले होते. यात म्हटले होते की, ‘‘पाकिस्तानने विश्वचषकात भारताविरुद्धच्या सुमार कामगिरीची पुनरावृत्ती केली. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात अपयशी ठरलेला भारतीय संघ पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध निग्रहाने खेळला आणि शानदार विजय मिळवला. भावनिक कणखरतेची परीक्षा पाहणाऱ्या या सामन्यात पाकिस्तानने पराजयाची परंपरा कायम राखली.’’

भारत-पाकिस्तान हे संघ रविवारी विश्वचषक स्पध्रेत सातव्यांदा भिडणार आहेत. आतापर्यंत झालेल्या सहा लढतींपैकी तीनदा सचिन तेंडुलकरने सामनावीर पुरस्कार पटकावला आहे. यापैकी पहिल्या चार सामन्यांमध्ये डेव्हिड शेफर्ड हे पंच होते. २००३चा सेंच्युरियनचा अपवाद वगळता अन्य पाचही सामन्यांत प्रथम फलंदाजी करून भारतीय संघ जिंकला आहे. यातूनच भारताचे वर्चस्व अधोरेखित होते.

१९९२मध्ये भारत-पाकिस्तान यांच्यात झालेली विश्वचषकातील पहिली लढत जावेद मियाँदादच्या मर्कटलीलांमुळे गाजली होती. यष्टीरक्षक किरण मोरेला वेडावून दाखवण्यासाठी त्याने बेडूकउडय़ा मारल्या होत्या. भारताचे २१६ धावांचे माफक आव्हान पेलताना पाकिस्तानचा डाव १७३ धावांत कोसळला. सचिनने नाबाद ५४ धावा आणि एक बळी घेत या विजयात महत्त्वाची कामगिरी बजावली. सामन्यानंतर सिडनी क्रिकेट ग्राउंडवर कर्णधार इम्रान खानने खेळाडूंना खडे बोल सुनावले. मग पराभव जिव्हारी लागलेल्या पाकिस्तानने चक्क जगज्जेतेपद काबीज केले होते.

मग १९९६मध्ये बेंगळूरुच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात पराभूत झाल्यामुळे पाकिस्तानला विश्वविजेतेपद राखता आले नाही. नवज्योतसिंग सिद्धू भारताच्या विजयाचा शिल्पकार ठरला. खेळाडूंधील मतभेदांचा फटका पाकिस्तानला या वेळी बसला. त्यामुळे आमिर सोहेलच्या नेतृत्वाखालील पाकिस्तानचा संघ आव्हान संपुष्टात आल्यानंतर थेट मायदेशी गेला नाही. देशात उसळलेली संतापाची लाट जिवावर बेतू शकेल, या भीतीमुळे हे खेळाडू काही दिवसांनी स्वगृही परतले.

१९९९मध्ये ओल्ड ट्रॅफर्डच्या लढतीप्रसंगी वातावरणात देशप्रेम संचारले होते. कारण भारत-पाकिस्तान सीमेवर कारगीलची धुमश्चक्री सुरू होती. भारताविरुद्धचा सामना म्हणजे आमच्यासाठी सराव सामना आहे, असे विधान वसिम अक्रमने नाणेफेकीआधी केले होते. अक्रम काहीतरी भयंकर बोलतोय, असा सावधतेचा इशारा समालोचक जेफ्री बॉयकॉट यांनी दिला. मोहम्मद अझरुद्दीन, राहुल द्रविड लयीत होते. पण व्यंकटेश प्रसादने कमाल करताना पाकिस्तानचा अर्धा संघ तंबूत धाडला आणि विजयाचा अध्याय लिहिला. त्यामुळे विश्वविजेतेपद काबीज केल्याप्रमाणे देशात जल्लोष झाला. सीमेवर जवानांनीही हा आनंद साजरा केला. पाकिस्तानमध्ये शोक पसरला. अनेक नागरिकांनी विविध मार्गानी आपला संताप प्रकट केला. काहींनी तर टीव्हीसुद्धा फोडले. सामन्यानंतर अक्रम टीकेच्या लक्ष्यस्थानी होता.

त्यानंतर २००३मध्ये सेंच्युरियनवर उभय संघ चौथ्यांदा आमनेसामने आले. तीन सामन्यांतून धडे घेत पाकिस्तानने नाणेफेक जिंकल्यावर प्रथम फलंदाजी केली आणि सईद अन्वरच्या शतकाच्या बळावर २७३ धावांचे आव्हान उभे केले. त्याच वेळी भारत हा सामना गमावणार असे सर्वाना वाटत होते. परंतु सचिनच्या झंझावातापुढे पाकिस्तानचे स्वप्न उद्ध्वस्त झाले. अक्रम, वकार युनूस, शोएब अख्तर, अब्दुल रझाक आणि शाहीद आफ्रिदी अशा जगातील सर्वोत्तम गोलंदाजीच्या माऱ्याचा सचिनच्या फटकेबाजीपुढे निभाव लागला नाही. दुर्दैवाने त्याचे शतक दोन धावांनी हुकले.

मग २०११च्या विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत भारताने पाकिस्तानला २९ धावांनी हरवून अंतिम फेरी गाठली. आदल्या दिवशी वादळी वाऱ्यासह पाऊस बरसला, तेव्हा सामन्यापुढे प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. परंतु मोहालीत सचिनने वादळी फलंदाजी करीत ८५ धावांची खेळी साकारली. त्यामुळे भारताने २६० धावा केल्या, तर पाकिस्तानचा संघ २३१ धावांपर्यंत मजल मारू शकला. या सामन्यानंतर भारतात उत्सवी वातावरण पसरले, तर पाकिस्तानात स्मशानशांतता होती. ‘त्या’ कटू स्मृती आजही पाकिस्तानी खेळाडूंच्या मनामध्ये घर करून आहेत. या सामन्याच्या पूर्वसंध्येला संघाचे मानसोपचारतज्ज्ञ पॅडी अपटन यांनी आपली खुर्ची खाली केली आणि म्हटले की, ‘‘आज मी नाही, तर तुमच्यातील एक सर्वात जास्त अनुभवी खेळाडू म्हणजे सचिन तेंडुलकर तुमच्यासमोर बोलेल!’’ सचिनने आपल्या अनुभवाचे बोल खेळाडूने ऐकवले. त्यामुळे एक आगळी ऊर्जा खेळाडूंमध्ये संचारली.

भारत-पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट मालिका थांबल्यामुळे २०१५ची विश्वचषक लढत म्हणजे चाहत्यांसाठी पर्वणीच ठरली. या दोन संघांचा हा विश्वचषकातील पहिलाच सामना होता, परंतु अंतिम लढतीचेच महत्त्व त्याला प्राप्त झाले होते. अ‍ॅडलेडवर नाणेफेक जिंकून भारताने प्रथम फलंदाजी स्वीकारली आणि ७ बाद ३०० धावा उभारल्या. यात विराट कोहलीचे शतक तसेच शिखर धवन आणि  सुरेश रैना यांच्या अर्धशतकांचे महत्त्वाचे योगदान होते. मग मोहम्मद शमी (३५ धावांत ४ बळी), मोहित शर्मा आणि उमेश यादव यांच्या गोलंदाजीपुढे पाकिस्तानचा संघ २२४ धावांत गारद झाला.

पाकिस्तानविरुद्धचा विश्वचषकातील इतिहास हा भारताचे वर्चस्वच दर्शवतो आहे. आता मँचेस्टरवर २० वर्षांनी पुन्हा भारत-पाकिस्तानचे संघ झुंजणार आहेत. त्यामुळे क्रिकेटरसिकांची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे.