|| जयेश शिरसाट

सामन्याआधीच कोटय़वधींची उलाढाल

लहरी पावसामुळे अस्वस्थ असलेल्या बुकींनी रविवारी भारत-पाक सामन्याचे भवितव्य अवलंबून असलेल्या पावसावरच सट्टा लावण्यास सुरुवात केली आहे. पावसाचा व्यत्यय न येता सामना पूर्ण खेळल्यास २० पैसे आणि पावसाचा व्यत्यय येऊन सामना रद्द झाल्यास पाच रुपये असा भाव शनिवारी सट्टाबाजारात खुला झाला. ब्रिटनमध्ये विश्वचषक सुरू असून पावसामुळे भारत-न्यूझीलंडसह अन्य सामनेही रद्द झाले. सट्टाबाजाराने हा सामना होईल, असा अंदाज वर्तवून बेटिंग घेण्यास सुरुवात केली आहे, हे अवैध ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपच्या माध्यमातून उघडकीस आले आहे.

सट्टा बाजारात बुकींनी भारतावर (भारत संघ जिंकल्यास) ४५ पैसे, तर पाकिस्तानवर ५ रुपये असा भाव लावला आहे. त्यावरून भारताचा संघ रविवारच्या संघात जिंकेल, फेव्हरिट असेल, असा अंदाज आहे. हवामान चांगले असल्यास, सामना सुरू झाल्यास नाणेफेकीनंतर भाव परिस्थितीनुसार सातत्याने वर खाली होत राहतील. ऑस्ट्रेलिया-इंग्लंड या हाडवैरींमधील संघर्षांपेक्षा भारत-पाक सामन्यावर तुलनेने जास्त सट्टा लागतो. त्यात अवैध ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपमुळे सट्टेबाजीची व्याप्ती शालेय विद्यार्थ्यांपासून महिला, बुजुर्गापर्यंत पोहोचल्याने रविवारच्या सामन्यावर बेहिशेबी सट्टा लागण्याची शक्यता आहे.