|| गौरव जोशी

भारत-पाकिस्तान सामन्याची उत्कंठा रविवारी सकाळपासून अनुभवायला मिळाली. पहाटे उठल्यापासूनच ज्यांच्याकडे या सामन्याचे तिकीट होते, त्या सर्वाना फक्त एकच संदेश येत होता, तो म्हणजे ‘‘पाऊस असणार का?’’ सामन्यापेक्षा चाहत्यांना पावसाचीच चिंता होती.

सकाळी काळे ढग नक्कीच जमा झाले होते. मात्र जमिनीवरील निळे सागर त्यावर भारी पडणार, असेच वाटत होते. त्याशिवाय पाकिस्तानचे चाहतेही मोठय़ा प्रमाणात हिरव्या रंगाचे कपडे घालून आले होते. आजूबाजूचे कॉफीचे स्टॉल्स, मॅक्डोनल्ड येथेही चाहत्यांचीच गर्दी दिसत होती.

मँचेस्टरचे ओल्ड ट्रॅफर्ड मैदान हे तीन किलोमीटर दूर आहे आणि तिथे जाण्यासाठी ट्राम हा सर्वात सोपा उपाय आहे. स्टेडियमच्या बाहेर जर तुम्ही उभे राहिले असता, तर मुंबईची लोकल रेल्वे भरून येते आहे की काय, असा प्रश्न तुम्हाला पडला असता. स्टेडियमबाहेरील काही स्टॉल्समध्ये पगडी, फेटे, मोदींचे मुखवटे आणि नेहरूंची टोपी यांचीही विक्री सुरू होती. यांच्यामध्येच एका कोपऱ्यात तिकिटांसाठी इतरांना विचारपूस करणाऱ्यांचे घोळकेही दिसत होते. काही चाहते पाचशे पाऊंड्सलाही तिकीट खरेदी करण्यास तयार होते. ‘आयसीसी’च्या अधिकृत संकेतस्थळावर कमीतकमी चार कोटी चाहत्यांनी तिकिटासाठी अर्ज केला होता. मात्र स्टेडियमच्या प्रेक्षकक्षमतेनुसार त्यांच्यातील फक्त २२ ते २४ हजार चाहत्यांना तिकीट मिळाले.

सकाळी नऊ वाजता स्टेडियममध्ये प्रवेशास सुरुवात झाली, तसा चाहत्यांचा उत्साह अधिक वाढत गेला. सामन्यापूर्वी बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंगच्या नावानेही काही चाहते ओरडत होते. त्याचप्रमाणे सचिन तेंडुलकर, सुनील गावस्कर यांचाही जयघोष चालू होता. पाऊस नसल्यामुळे सामन्यालाही वेळेवर सुरुवात झाली. भारताचे सलामीवीर फलंदाजीला आल्यावर चाहत्यांचा आवाज शिगेला पोहोचला. सचिनचा चाहता सुधीर गौतम, पाकिस्तानचा चाचा यांसारखे चाहते तर होतेच. त्याशिवाय अनेक जणांनी डोळ्यांतील बुबुळांना भारतीय झेंडय़ाच्या रंगात रंगवले होते.

दुसरीकडे पाकिस्तान चाहतेही खुल्या बसमधून सामना पाहण्यासाठी आले होते. हिरवे झेंडे आणि प्रत्येक खेळाडूच्या पोस्टर्सने ती बस भरली होती. संपूर्ण सामन्यादरम्यान दोन्ही देशांतील चाहत्यांमध्ये विविध घोषणाबाजींची जुगलबंदी सुरूच होती. मात्र भारताची फलंदाजी जोरदार सुरू असल्यामुळे त्यांचाच आवाज जास्त होता. दोन हजारांच्या आसपास प्रेक्षक इंग्लंडच्या बाहेरून आले होते. यामध्ये ऑस्ट्रेलिया, मॉरिशस यांसारख्या देशांतील चाहत्यांचाही समावेश होता. भारत-पाकिस्तानच्या बहुतांश चाहत्यांमध्ये एरव्ही संघर्ष पाहायला मिळतो. परंतु येथील अनेक भारत-पाकिस्तानचे स्थायिक एकाच कंपनीत काम करत असल्याने त्यांच्यात मैत्रीही पाहायला मिळत होती. भारताची फलंदाजी बहरत गेल्यावर पावसाकडे कोणाचे लक्षच राहिले नाही. त्याशिवाय पाकिस्तानी चाहत्यांचा आवाजही हळूहळू कमी झाला.

मँचेस्टरच्या शहरात एका पार्कमध्ये चाहत्यांना सामन्याचा आनंद लुटता यावा, यासाठीही मोठी स्क्रीन लावली होती. जवळपास चार हजार प्रेक्षकांची येथे गर्दी होती. क्रिकेटची खरी मजा काय असते, भारत-पाकिस्तान सामन्याला का इतके महत्त्व आहे, हे मैदानातच नव्हे, तर मैदानाबाहेरही पाहायला मिळत होते. त्यामुळे या सामन्याचा प्रत्येक क्षण चाहत्यांना नेहमीच स्मरणात राहील.