इमाम-उल-हकचे मत

रविवारी भारताविरुद्ध होणारा सामना हा नेहमीप्रमाणेच तणावपूर्ण असला तरी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवानंतर या सामन्यात विजय मिळवणे पाकिस्तानसाठी अत्यावश्यक बनले आहे, असे मत पाकिस्तानचा सलामीवीर इमाम-उल-हक याने व्यक्त केले.

भारताविरुद्धच्या सामन्यात तुमच्यावर किती दडपण असेल, असे विचारले असता इमाम म्हणाला, ‘‘आमचा श्रीलंकेविरुद्धचा सामना पावसामुळे रद्द झाला होता. हा सामना आमच्यासाठी महत्त्वपूर्ण होता. आता दोन पराभवांमुळे आमच्यावरील दडपणात वाढ झाली आहे. यापुढील प्रत्येक सामना आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याची उत्सुकता सर्वानाच लागून राहिली असली तरी आम्ही आमच्या क्षमतेनुसार कामगिरी करण्यावर भर देणार आहोत.’’

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात वाइड चेंडूवर बाद झाल्यानंतर इमाम नाखूश आहे. तो म्हणतो, ‘‘पाकिस्तानचा संघ बाबर आझम आणि माझ्या फलंदाजीवर अवलंबून आहे. बाबर (३०) बाद झाल्यानंतर माझ्यावरील जबाबदारी अधिक वाढली होती. अर्धशतक झळकावल्यानंतर मी अधिक काळ फलंदाजी करणे अपेक्षित होते. पण लेगस्टम्पच्या बाहेर जाणाऱ्या चेंडूवर खेळण्याच्या नादात मी बाद झालो आणि पाकिस्तानला पराभूत व्हावे लागले.’’