विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानने अद्याप भारताविरुद्ध खाते खोलले नसले तरी यंदा मात्र इतिहास बदलण्यासाठी पाकिस्तानचा संघ उत्सुक आहे. त्यामुळेच विश्वचषकातील भारताविरुद्धच्या महत्त्वपूर्ण सामन्याआधी क्षेत्ररक्षणात सुधारणा करा, असा इशारा पाकिस्तानचा कर्णधार सर्फराज अहमदने आपल्या खेळाडूंना दिला आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात पाकिस्तानला गचाळ क्षेत्ररक्षणाचा फटका बसला. डेव्हिड वॉर्नर (१०७) आणि आरोन फिंच (८२) यांच्या १४६ धावांच्या सलामीनंतर ऑस्ट्रेलियाने ३०७ धावा उभारल्या. हे आव्हान पार करताना पाकिस्तानला २६६ धावांपर्यंतच मजल मारता आली. ‘‘तिन्ही आघाडय़ांवर आम्ही बऱ्याच चुका केल्या. आमच्या क्षेत्ररक्षणावर मी निराश आहे. क्षेत्ररक्षणाचा जो दर्जा अपेक्षित आहे, त्यानुसार आम्हाला कामगिरी करता आली नाही. मात्र भारताविरुद्धच्या सामन्यासाठी मैदानात उतरण्याआधी आम्हाला अधिक मेहनत घ्यावी लागणार आहे,’’ असे सर्फराज म्हणाला.

आसिफ अलीने आरोन फिंचला ३३ धावांवर जीवदान दिल्यानंतर वॉर्नरचा झेल सोडला होता. क्षेत्ररक्षणातही पाकिस्तानच्या खेळाडूंनी गलथानपणा केल्यामुळे ऑस्ट्रेलियाला सहजपणे धावा काढता येत होत्या. मात्र मोहम्मद आमीरचे पाच बळी ही पाकिस्तानसाठी समाधानकारक कामगिरी ठरली. ‘‘आमीर जागतिक दर्जाचा गोलंदाज आहे. चेंडू जेव्हा स्विंग होऊ लागतो, त्या वेळी आमीरला थोपवणे कोणत्याही फलंदाजाला शक्य होत नाही,’’ अशा शब्दांत सर्फराजने आमीरची स्तुती केली.

पाकिस्तानच्या पराभवाबद्दल सर्फराज म्हणाला की, ‘‘सामना जिंकण्याच्या स्थितीत असताना आम्ही १५ चेंडूंत तीन फलंदाज गमावल्यामुळे आम्हाला पराभवाला सामोरे जावे लागले. आमच्या फलंदाजांनी काही चांगल्या खेळी केल्या, मात्र त्याचे रूपांतर अधिक मोठय़ा खेळीत व्हायला हवे होते. सामना जिंकायचा असेल तर अव्वल चार फलंदाजांनी चमक दाखवायला हवी.’’