मँचेस्टरमध्ये रविवारी होणाऱ्या भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्याच्या तिकिटांना प्रचंड मागणी आहे. या पार्श्वभूमीवर स्कॉटलंड यार्डने दोन्ही देशांच्या क्रिकेट चाहत्यांना ब्लॅकने तिकीटं विकत न घेण्याचा सल्ला दिला आहे. तुम्हाला तिकिटांच्या झेरॉक्स प्रती किंवा बनावट तिकिटांची विक्री होऊ शकते असे स्कॉटलंड यार्डने म्हटले आहे. भारत-पाक सामन्यांचा थरार अनुभवण्यासाठी भारतातून मोठया संख्येने क्रिकेटप्रेमी इंग्लंडमध्ये दाखल झाले आहेत.

उद्या होणाऱ्या या हाय-व्होलटेज सामन्याची तिकिटे काही महिने आधीच विकली गेली आहेत. ब्रिटनमध्ये रहाणाऱ्या भारतीय आणि पाकिस्तानी वंशाच्या नागरीकांनी ही तिकिटे विकत घेतली आहेत. ओल्ड ट्रॅफोर्ड मैदानावरील २५ हजार तिकिटांसाठी ६ लाख लोकांनी अर्ज केले होते. या सामन्याची बनावट तिकिट विकणारे कोण आहेत ते स्कॉटलंड यार्डने सांगितलेले नाही. पण स्टेडियम बाहेरुन तिकीटं विकत घेऊ नका असे सांगितले आहे.

प्रेक्षक, खेळाडू आणि कर्मचाऱ्यांना सुरक्षित आनंददायी सामना पाहता यावा यासाठी स्कॉटलंड यार्ड पोलीस आयसीसी, इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्डासोबत मिळून सर्व आवश्यक काळजी घेत आहेत असे पोलीस अधीक्षक ट्रीना फ्लेमिंग यांनी सांगितले. क्रिकेट स्टेडियम बाहेरुन तिकिट विकत घेण्याचा विचार करणाऱ्यांनी सावध व्हावे.

तुम्ही विकत घेतलेली तिकिटं झेरॉक्स प्रती किंवा बनावट असू शकतात. अशा पद्धतीने तुम्ही तुमचे पैसे गुन्हेगाराच्या हाती द्याल. ज्यामुळे तुम्हाला स्टेडियममध्ये प्रवेश मिळणार नाही. काही जण अशी खोटी तिकीटे विकण्याचा प्रयत्न करत आहेत असे ट्रीना यांनी सांगितले. उद्या टीव्हीवर अब्जावधी लोक भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्याचा आनंद लुटतील.