30 October 2020

News Flash

भारत-पाकिस्तान ‘हॉकी’युद्धाचा आज थरार

पाकिस्तानविरुद्ध कोणताही सामना भारताला एखाद्या युद्धासारखाच खेळावा लागतो.

पाकिस्तानविरुद्ध कोणताही सामना भारताला एखाद्या युद्धासारखाच खेळावा लागतो. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय पुरुष हॉकी संघाला पहिल्याच लढतीत पाकिस्तानच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे.

भारताने या स्पर्धेत यापूर्वी दोन वेळा रौप्यपदक मिळवले आहे. भारताला २००६ मध्ये मेलबर्न येथे झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत पाकिस्तानकडून पराभव स्वीकारावा लागला होता. २०१० मध्ये नवी दिल्ली येथे झालेल्या लढतीत भारताने त्यांचा दणदणीत पराभव केला होता. गतवर्षी आशिया चषक स्पर्धेत भारताने विजेतेपद मिळवताना पाकिस्तानला हरवले होते.

यंदा विजेतेपद मिळवण्यासाठी शोर्ड मरीन यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघाने भरपूर मेहनत केली आहे. मरीन म्हणाले, ‘‘या लढतीत आमची बाजू बळकट आहे. कडक उन्हात आम्हाला हा सामना खेळावा लागणार आहे. स्थानिक वेळेनुसार आमचा सामना दुपारी २.३० वाजता होणार आहे. हे लक्षात घेतल्यास खेळाडूंच्या शारीरिक क्षमतेची कसोटीच ठरणार आहे. पाकिस्तानविरुद्धचे सामने नेहमीच तणावपूर्ण वातावरणात खेळले जातात, याची मला कल्पना आहे. त्यामुळेच मी खेळाडूंना शेवटपर्यंत संयम ठेवण्यास सांगितले आहे. जरी सामन्याच्या सुरुवातीला आमच्यावर गोल झाला तरी शांत चित्ताने खेळ करीत विजयश्री खेचून आणण्यावर आमचा भर राहील.’’

भारतीय हॉकी संघाचे उच्च कामगिरी संचालक म्हणून काम केलेले रोलँट ओल्टमन्स हे सध्या पाकिस्तानचे मुख्य प्रशिक्षक म्हणून काम करत आहेत. साहजिकच आजची लढत मरीन विरुद्ध ओल्टमन्स अशीही राहणार आहे. भारतीय संघाची मुख्य मदार रुपिंदरपाल सिंग, हरमानप्रीत सिंग, वरुण कुमार व अमित रोहिदास या ड्रॅगफ्लिकरवर अवलंबून आहे. पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रूपांतर करण्यात किती प्रगती केली आहे, यावरच भारताचे भवितव्य अवलंबून आहे. कर्णधार मनप्रीत सिंगवर मोठी जबाबदारी असणार आहे. त्याचप्रमाणे गोलरक्षक पी. आर. श्रीजेश याच्यावरही संघाची भिस्त आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 7, 2018 3:10 am

Web Title: india vs pakistan in commonwealth games 2018
Next Stories
1 भारतीय महिलांकडून मलेशियाचा धुव्वा
2 ‘आयपीएल’साठी पाणी विकत घेणार का?
3 कटू भूतकाळ विसरून भविष्याचा विचार करावा
Just Now!
X