भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान झालेल्या दुसऱ्या टी-२० समान्यामध्ये यजमान संघाने पाहुण्या संघावर सहा गडी राखून विजय मिळवला. नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेणाऱ्या जे.पी. ड्युमिनीच्या संघासमोर भारतीय संघाने २० षटकांमध्ये १८९ धावांचे आवाहन ठेवले. यजमानांनी हे आवाहन सहजपणे पूर्ण करत तीन सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबर केली आहे. त्यामुळे या मालिकेतील अंतीम टी-२० समाना निर्णायक ठरणार आहे.

नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजी करु देण्याचा ड्युमिनीचा निर्णय पहिल्या षटकातच योग्य असल्याचे दिसले. शिखर धवनने अगदीच सावध सरुवात करत पहिल्या काही चेंडूवर एकही धाव घेतली नाही. दुसऱ्याच षटकात रोहित शर्मा तंबूत परतला. त्यानंतर मात्र धवनने एकाच षटकात २० धावा काढत धावगती वाढवण्याचा प्रयत्न केला मात्र पुढच्याच षटकात तो झेलबाद झाला. विराट कोहलीलाही या समान्यात मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आले आणि अवघी एक धाव करुन तो झेलबाद झाला. त्यानंतर मात्र मनिष पांडे आणि महेंद्र सिंग धोनीने डावाला आकार दिला. शेवटच्या दहा षटकांमध्ये चांगली फटकेबाजी करत या दोघांनी २० षटकात भारताचा धावफलक १८८वर नेऊन ठेवला. या डावात दोघांनीही आपली अर्धशतके साजरी केली.

१८८ धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेकडून सलामीवीर हेड्रिंक्स (२६), कर्णधार जे.पी ड्युमिनी (५२) आणि कालसेन (६९) यांनी चांगली फलंदाजी करत निर्धारित १८९ची धावसंख्या आठ चेंडू शिल्लक असतानाच आरामात गाठली. या सामन्यावर सुरुवातीपासूनच पावसाचे सावट होते. त्यामुळे दोन्ही संघ डकवर्थ लुईसची शक्यता लक्षात घेऊनच डावाची आखणी करताना दिसले. म्हणूनच दोन्ही संघांनी धडाकेबाज फलंदाजी करत जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न केला. मात्र आफ्रिकेपेक्षा भारताची गोलंदाजी साजेशी कामगिरी करु शकली नाही. महत्वाच्या पार्टनरशिप मोडण्यात अपयश आले आणि त्यामुळेच भारताचा या सामन्यात पराभव झाला.