27 February 2021

News Flash

परदेशातील अपयश पुसण्यासाठी भारत सज्ज

डेल स्टेनबाबत साशंकता

| January 5, 2018 02:39 am

कसोटी मालिकेच्या चषकासह विराट कोहली आणि फॅफ डयू प्लेसिस.

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिली कसोटी आजपासून; डेल स्टेनबाबत साशंकता

आशियाई खंडात वर्चस्व निर्माण करणाऱ्या भारताला क्रिकेटच्या नकाशावरील अन्य महत्त्वाच्या देशांतसुद्धा आपली विजयी घोडदौड राखायची आहे आणि परदेशातील अपयशाचा शिक्का पुसून टाकायचा आहे. परदेशातील १२ कसोटी सामन्यांच्या महत्त्वाकांक्षी आव्हानाला प्रारंभ शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीने होत आहे. त्यानंतर इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यासारख्या क्रिकेटमधील बलाढय़ संघांशी भारताला त्यांच्या देशात संघर्ष करायचा आहे.

विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेशी सामन्यात वेगवान माऱ्याची भूमिका महत्त्वाची मानली जात आहे. सध्या कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानावर विराजमान असलेला भारतीय संघ दुसऱ्या क्रमांकावरील दक्षिण आफ्रिकेपासून पुरेशा गुणांच्या अंतरावर आहे. त्यामुळे भारताने ही मालिका ०-३ अशा फरकाने गमावली, तरी अग्रस्थान मात्र अबाधित राहणार आहे.

दक्षिण आफ्रिकेची प्रमुख मदार असेल ती त्यांच्या वेगवान माऱ्यावर. भारताची भक्कम फलंदाजीची फळी भेदण्याची क्षमता त्यांच्या गोलंदाजांकडे आहे. सलग नऊ कसोटी मालिका जिंकल्यानंतर आता कोणत्याही परिस्थितीशी जुळवून प्रतिस्पध्र्याशी सामना करू शकतो, असा भारतीय संघाचा आत्मविश्वास उंचावला आहे. भारताच्या मालिका विजयांपैकी सहा भारतातील आहेत, तर दोन श्रीलंकेत आणि एक वेस्ट इंडिजमध्ये. विंडीज वगळता बाकी दोन्ही ठिकाणचे वातावरण आणि खेळपट्टय़ा या भारतासाठी अनुकूल होत्या.

न्यूलँडस येथील कामगिरीचा आढावा घेतल्यास भारताला येथील चार कसोटी सामन्यांमध्ये जिंकता आले नव्हते. यापैकी दोन सामने भारताने गमावले आहेत, तर दोन सामने अनिर्णीत राखले आहेत. त्यामुळे नववर्षांचा प्रारंभ या मैदानावरील ऐतिहासिक विजयाने करण्यासाठी भारतीय संघ उत्सुक आहे. न्यूलँडची हिरवीगार खेळपट्टी सर्वाचे लक्ष वेधत असून, भारताची भिस्त भुवनेश्वर कुमार, इशांत शर्मा आणि मोहम्मद शमी यांच्यावर असणार आहे. फिरकी गोलंदाज रवींद्र जडेजाला तापामुळे इस्पितळात दाखल करण्यात आले होते. त्यामुळे त्याच्या खेळण्याबाबत साशंकता व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे एकमेव फिरकी गोलंदाजाच्या स्थानासाठी आर. अश्विनला स्पर्धा नसेल.

भारतीय संघ सध्या फॉर्मात असलेल्या रोहित शर्मा या एका अतिरिक्त फलंदाजाला संघात स्थान देण्याची शक्यता आहे. याशिवाय हार्दिक पंडय़ाचा अष्टपैलू खेळाडू म्हणून संघात समावेश केला जाऊ शकतो. शिखर धवन दुखापतीतून सावरला असून, मुरली विजयसोबत सलामीच्या स्थानासाठी लोकेश राहुलच्या आधी त्याचा विचार केला जाईल.

कोलकाता येथे भारतीय संघ श्रीलंकेविरुद्ध हिरव्यागार खेळपट्टीवर खेळला होता. त्या सामन्यात रोहित खेळला नव्हता. मात्र त्यानंतर तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये शतके साकारून रोहितने आपणसुद्धा शर्यतीत असल्याचे सिद्ध केले आहे. भारताप्रमाणेच दक्षिण आफ्रिकेसाठीही संघनिवड ही चिंतेची असणार आहे. डेल स्टेन पहिल्या कसोटीसाठी तंदुरुस्त असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. मात्र त्याच्या खेळण्याबाबत अद्याप साशंकता आहे. दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजीच्या माऱ्यात तीन वेगवान आणि एका फिरकी गोलंदाजाचा समावेश असेल.

स्टेन न खेळल्यास कॅगिसो रबाडा, व्हर्नन फिलँडर आणि मॉर्नी मॉर्केल यांच्यावर वेगवान माऱ्याची धुरा असेल, तर डावखुरा केशव महाराज फिरकीची जबाबदारी सांभाळेल. क्विंटन डी’कॉक मांडीच्या स्नायूंच्या दुखापतीतून सावरला आहे. मात्र दक्षिण आफ्रिकेला महत्त्वाची चिंता आहे ती एबी डी’व्हिलियर्सच्या तंदुरुस्तीची. झिम्बाब्वेविरुद्धच्या कसोटी सामन्यात त्याने प्रभारी कर्णधारपद सांभाळले होते.

दक्षिण आफ्रिकेतील कामगिरी सुधारण्याचे आव्हान

२०१४-१५मध्ये भारताने अखेरची कसोटी मालिका गमावली होती. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरील चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारताने ०-२ अशी हार पत्करली होती. परंतु दक्षिण आफ्रिकेत भारताची आतापर्यंतची कामगिरी खराब राहिली आहे. भारताने सहापैकी पाच मालिका गमावल्या आहेत, तर एक मालिका बरोबरीत सोडवली आहे. १९९२पासून दक्षिण आफ्रिकेत भारतीय संघाने १७ पैकी फक्त दोन कसोटी सामने जिंकले आहेत. यापैकी पहिला २००६-०७मध्ये राहुल द्रविडच्या नेतृत्वाखाली आणि दुसरा २०१०-११मध्ये महेंद्रसिंग धोनी कर्णधार असताना. मागील काही वर्षांचा आढावा घेतल्यास भारताने यजमानांना चांगली लढत दिल्याचे स्पष्ट होते. २०१०-११मध्ये भारताने मालिका बरोबरीत सोडवली, तर २०१३-१४मध्ये मालिका थोडक्यात निसटली. याच संघातील १३ खेळाडूंचा सध्याच्या भारतीय संघात समावेश आहे.

संघ

  • भारत : विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, मुरली विजय, लोकेश राहुल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, वृद्धिमान साहा (यष्टीरक्षक), हार्दिक पंडय़ा, रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, इशांत शर्मा, उमेश यादव, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, पार्थिव पटेल.
  • दक्षिण आफ्रिका : फॅफ डय़ू प्लेसिस (कर्णधार), डील एल्गर, एडीन मार्कराम, हशिम अमला, टेंबा बव्हुमा, थीयूनिस डी ब्रूयने, क्विंटन डी’कॉक (यष्टीरक्षक), केशव महाराज, मॉर्नी मॉर्केल, डेल स्टेन, ख्रिस मॉरिस, व्हर्नन फिलँडर, कॅगिसो रबाडा, अँडिले फेहलुकवायो.
  • सामन्याची वेळ : दुपारी २ वा.
  • थेट प्रक्षेपण : सोनी टेन १ आणि ३.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 5, 2018 2:39 am

Web Title: india vs south africa 2
Next Stories
1 मल्ल की कळसूत्री बाहुल्या?
2 ‘महाराष्ट्र केसरी’ किताबाचा उरूस
3 बिहारला राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धांमध्ये खेळण्याची परवानगी
Just Now!
X