भारत-द. आफ्रिका एकदिवसीय क्रिकेट

मातब्बर फलंदाजांच्या दुखापती आणि आयसीसी क्रमवारीतील अव्वल स्थान टिकवण्याचे आव्हान दक्षिण आफ्रिकेच्या संघापुढे असेल. एबी डी’व्हिलियर्सनंतर आता कर्णधार फॅफ डय़ू प्लेसिसने एकदिवसीय मालिकेतून माघार घेतल्यामुळे दक्षिण आफ्रिकेला आणखी एक धक्का बसला आहे. मात्र दरबानला पहिल्या एकदिवसीय सामन्यात विजयी सलामी नोंदवणाऱ्या भारताचा दुसऱ्या एकदिवसीय सामन्याला सामोरे जाताना आत्मविश्वास वधारला आहे.

फेब्रुवारी २०१६ पासून एकदिवसीय क्रिकेटमध्ये अपराजित राहण्याची दक्षिण आफ्रिकेची मालिका भारताने गुरुवारी खंडित केली. या पराभवानंतर डय़ू प्लेसिसच्या बोटाला दुखापत झाल्यामुळे आणखी एक धक्का आफ्रिकेला बसला. डय़ू प्लेसिसला पहिल्याच सामन्यात दुखापत झाली. मात्र सामन्यानंतर झालेल्या तपासणीत बोटाला फ्रॅक्चर झाल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे एकदिवसीय मालिकेसहित ट्वेन्टी-२० मालिकेतही तो खेळू शकणार नाही. वाँडर्सच्या तिसऱ्या कसोटीत बोटाला झालेल्या दुखापतीमुळे डी’व्हिलियर्स पहिल्या तीन एकदिवसीय सामन्यांत खेळणार नाही.

या परिस्थितीत फलंदाज फरहान बेहरादीनला एकदिवसीय संघात पाचारण करण्यात आले आहे. स्थानिक क्रिकेटमध्ये तिसऱ्या क्रमांकावरील सर्वाधिक धावा काढणारा यष्टीरक्षक-फलंदाज हेन्रिच क्लासीनलासुद्धा क्विंटन डी’कॉकसाठी पर्याय म्हणून संघात बोलावण्यात आले आहे. सेंच्युरियनच्या एकदिवसीय सामन्यासाठी एडीन मार्करामकडे नेतृत्वाची धुरा सोपवण्यात आली आहे. भारताने मालिकेत २-० अशी आघाडी घेतल्यास आयसीसी क्रमवारीतील अग्रस्थान दक्षिण आफ्रिकेला गमवावे लागेल. याचप्रमाणे किमान ४-२ अशा फरकाने मालिका जिंकल्यास ते भारताकडे जाऊ शकेल.

सेंच्युरियन येथे भारताची एकदिवसीय कामगिरी समाधानकारक झाली आहे. या ठिकाणी झालेल्या ११ सामन्यापैकी भारताने चार सामने जिंकले आहेत, तर पाच गमावले आहेत. २००३च्या विश्वचषकात भारताने या मैदानावर पाकिस्तानला नमवण्याची किमया साधली होती.

भारताच्या फलंदाजीच्या फळीत चौथे स्थानच फक्त प्रयोगासाठी शिल्लक होते. मात्र अजिंक्य रहाणेने गुरुवारी ८६ चेंडूंत ७९ धावांची महत्त्वपूर्ण खेळी साकारून या स्थानावर आपला भक्कम दावा केला आहे. याशिवाय विराट कोहलीचा फॉर्म आणि कुलदीप यादव, युजवेंद्र चहल यांची फिरकी भारतासाठी तारक ठरू शकेल.

संघ

भारत : विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, दिनेश कार्तिक, केदार जाधव, महेंद्रसिंग धोनी (यष्टीरक्षक), हार्दिक पंडय़ा, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमरा, मोहम्मद शमी, शार्दुल ठाकूर.

दक्षिण आफ्रिका : एडीन मार्कराम (कर्णधार), हशिम अमला, क्विंटन डी’कॉक (यष्टीरक्षक), जे पी डय़ुमिनी, इम्रान ताहीर, डेव्हिड मिलर, मॉर्नी मॉर्केल, ख्रिस मॉरिस, लुंगिसानी एन्गिडी, अँडिले फेहलुकवायो, कॅगिसो रबाडा, ताब्रेझ शाम्सी, खायेलिहले झोंडो, फरहान बेहरादीन, हेन्रिच क्लासीन.

सामन्याची वेळ : दुपारी १.३० वा.

थेट प्रक्षेपण : सोनी टेन १, ३.