आज दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा दुसरा ट्वेन्टी-२० क्रिकेट सामना

एकदिवसीय क्रिकेट मालिकेत भारताने अधिराज्य गाजवले. आता ट्वेन्टी-२० मालिकेमध्येही वर्चस्व गाजवण्यासाठी विराट कोहलीची युवा सेना सज्ज झाली आहे. पहिल्या ट्वेन्टी-२० लढतीत भारताने दक्षिण आफ्रिकेवर विजय मिळवला होता. बुधवारी होणारी दुसरी एकदिवसीय लढत जिंकल्यास तीन सामन्यांची मालिका भारताला खिशात टाकता येणार आहे. दुसरीकडे यजमान दक्षिण आफ्रिकेला मालिका वाचवण्याची ही अखेरची संधी असेल. कारण हा सामना गमावल्यावर त्यांचे मालिकेतील आव्हान संपुष्टात येणार आहे.

कसोटी मालिका गमावल्यावर भारताने एकदिवसीय सामन्यांमध्ये जोरदार पुनरागमन केले. त्यांचा हाच फॉर्म ट्वेन्टी-२० मालिकेत पाहायला मिळाला. आतापर्यंत सातत्यपूर्ण धावा करणारा भारताचा सलामीवीर शिखर धवन ट्वेन्टी-२० सामन्यांमध्येही आपली छाप पाडत आहे. विराट कोहलीही चांगल्या फार्मात आहे, पण अन्य फलंदाजांना मात्र अजूनही छाप पाडता आलेली नाही.  गेल्या सामन्यात भुवनेश्वर कुमारने पाच बळी मिळवत दमदार कामगिरीचा नजराणा पेश केला होता. ही खेळपट्टी संथ होत जाणारी आहे. त्यामुळे या सामन्यात कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहल यांना अंतिम अकरा जणांच्या संघात स्थान मिळणार आहे. डावखुरा फिरकीपटू अक्षर पटेलला अजूनही खेळवण्यात आलेले नाही, त्यामुळे संघ निवडताना त्याच्या नावाचाही विचार करण्यात येणार आहे.

दक्षिण आफ्रिकेच्या संघाला मालिकेपूर्वीच एबी डी’व्हिलियर्सच्या रूपात मोठा धक्का बसला आहे. दुखापतीमुळे तो मालिकेत खेळू शकणार नसल्याने कर्णधार जेपी डय़ुमिनीची डोकेदुखी वाढली आहे. दक्षिण आफ्रिकेच्या या संघात युवा खेळाडूंचा भरणा आहे. गेल्या सामन्यात रीझा हेन्ड्रिक्सने धडाकेबाज फलंदाजी केली होती. अन्य युवा फलंदाजांकडून संघाला मोठय़ा खेळीची अपेक्षा असेल. डय़ुमिनीने कर्णधार या नात्याने त्यांच्यापुढे आदर्श निर्माण करणे गरजेचे आहे. दक्षिण आफ्रिकेची गोलंदाजी मर्यादित षटकांच्या सामन्यांमध्ये बोथट वाटत आहे. पहिल्या ट्वेन्टी-२० लढतीतही त्यांच्या गोलंदाजांकडून अपेक्षित कामगिरी पाहायला मिळाली नव्हती. त्यामुळे त्यांना जर हा सामना जिंकायचा असेल तर त्यांना गोलंदाजीमध्ये सुधारणा करणे गरजेचे असेल.

दुसऱ्या स्थानाची संधी

आयसीसी ट्वेन्टी-२० क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर जाण्याची भारताला या मालिकेत संधी असेल. भारताने ही मालिका ३-० अशा फरकाने जिंकली तर ते क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर पोहोचू शकतात.