20 February 2019

News Flash

भारताचे लक्ष्य.. ऐतिहासिक विजय आणि अग्रस्थान!

एबी डी’व्हिलियर्सचे दक्षिण आफ्रिकेच्या संघात पुनरागमन

आज चौथ्या एकदिवसीय लढतीत एबी डी’व्हिलियर्सचे दक्षिण आफ्रिकेच्या संघात पुनरागमन

दक्षिण आफ्रिकेच्या भूमीवर चौथ्या लढतीसह प्रथमच एकदिवसीय मालिका जिंकण्याच्या ईष्रेने भारतीय संघ आता सज्ज झाला आहे. याशिवाय आयसीसी एकदिवसीय क्रमवारीतील अग्रस्थानही त्यांना खुणावते आहे. मात्र धडाकेबाज फलंदाज एबी डी’व्हिलियर्स परतल्यामुळे शनिवारी होणाऱ्या एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा संघ भारताचे वर्चस्व झुगारण्यासाठी उत्सुक आहे.

भारताने एकदिवसीय मालिकेत ३-० अशी आघाडी मिळवली असल्यामुळे मालिका जिंकण्यासाठी त्यांना एकमेव विजयाची आवश्यकता आहे. २०१०-११ मध्ये महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत आधी २-१ अशी आघाडी घेतली होती. मात्र नंतर ती मालिका २-३ अशा फरकाने गमावली होती.

तिसऱ्या कसोटीपासून भारतीय संघाची विजयी घोडदौड सुरू आहे. तिसऱ्या सामन्याआधी शिखर धवनने आम्ही आता प्रत्येक सामना जिंकण्याच्या दृष्टीने खेळणार आहोत, असे स्पष्ट केले होते. तिसऱ्या लढतीत विराट कोहलीने ३४वे एकदिवसीय शतक झळकावून संघाला विजय मिळवून दिला होता. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत भारताने मिळवलेल्या ३० बळींपैकी २१ बळी हे कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहल यांनी मिळवले आहेत. त्यामुळे भारताच्या यशात कुलदीप-युजवेंद्र यांचा महत्त्वाचा वाटा आहे, याकडे दुर्लक्ष करता येणार नाही.

भारताच्या मनगटी फिरकी गोलंदाजांना सामोरे जाण्याच्या दृष्टीने दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांना न्यूलँडस येथे पाच स्थानिक गोलंदाजांचा पुरेसा सराव देण्यात आला. उर्वरित तीन सामन्यांसाठी डी’व्हिलियर्स उपलब्ध असल्यामुळे आफ्रिकेचा संघ बळकट झाला आहे. डी’व्हिलियर्स तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला उतरेल, तर जेपी डय़ुमिनीला चौथ्या क्रमांकावर खेळावे लागेल. त्यामुळे डेव्हिड मिलर किंवा खायेलिहले झोंडो यापैकी एकालाच अंतिम ११ खेळाडूंमध्ये स्थान मिळेल. मात्र नेतृत्वाची धुरा एडीन मार्करामकडेच राहणार आहे.

दक्षिण आफ्रिकेच्या दृष्टीने मायदेशातील हा सामना महत्त्वाचा असणार आहे. कारण स्तनांच्या कर्करोगासंदर्भातील जागृतीकरिता गुलाबी एकदिवसीय सामना म्हणून त्याचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले आहे. २०११ पासून हा सहावा सामना होत आहे. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेचा संघ गुलाबी जर्सी परिधान करणार आहेत. डी’व्हिलियर्सने या गुलाबी दिवसांवर चांगले वर्चस्व राखल्याचे आकडेवारी सांगते. २०१५ मध्ये त्याने वेस्ट इंडिजविरुद्ध ४४ चेंडूंत १४९ धावा केल्या होत्या. त्याआधी २०१३ मध्ये त्याने ४७ चेंडूंत ७७ धावा काढल्या होत्या.

रोहित शर्मा दक्षिण आफ्रिकेत ११ एकदिवसीय सामने खेळला आहे. मात्र तीन वेळा द्विशतके झळकावणाऱ्या रोहितला १२.१०च्या सरासरीनेच येथे धावा काढता आल्या आहेत. त्यामुळे भारताच्या दृष्टीने ही चिंतेची बाब ठरेल. मात्र रोहितला संघातील स्थान गमवावे लागणार नाही. मालिका जिंकण्यासाठी कोहली संघात कोणताही बदल करण्याची सुतराम शक्यता नाही.

या मैदानावर भारताने सात सामन्यांपैकी तीन सामने जिंकले आहेत, तर चार गमावले आहेत. याच ठिकाणी २००३ च्या विश्वचषक क्रिकेट स्पध्रेतील अंतिम सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करला होता. जानेवारी २०११ मध्ये येथे भारताने दक्षिण आफ्रिकेवर एका धावेने रोमहर्षक विजय मिळवला होता. त्या सामन्यात मुनाफ पटेलने २९ धावांत ४ बळी मिळवले होते.

First Published on February 10, 2018 1:50 am

Web Title: india vs south africa 3