दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा तिसरा कसोटी सामना आजपासून रांचीमध्ये

भारत-द. आफ्रिका कसोटी मालिका

रांची : विशाखापट्टणम आणि पुणे येथील पहिल्या दोन कसोटी सामन्यांत निर्विवाद वर्चस्व गाजवल्यानंतर आता भारतीय संघ शनिवारपासून सुरू होणाऱ्या रांची कसोटीत पाहुण्या दक्षिण आफ्रिकेला मात देऊन विजयी हॅट्ट्रिक करण्यासाठी सज्ज झाला आहे. फॅफ डय़ू प्लेसिसच्या नेतृत्वाखालील आफ्रिकेचा संघ भारत दौऱ्याचा शेवट गोड करण्यासाठी उत्सुक असला तरी बहरात असलेल्या विराटसेनेसमोर विजय मिळवण्याचे खडतर आव्हान त्यांना पेलावे लागणार आहे.

मालिकेत ३-० असे निर्भेळ यश मिळवल्यास, भारताला जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेसाठी ४० गुण मिळणार आहेत, त्यामुळे मनोधैर्य खचलेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सलग तिसरा विजय मिळवून खात्यात सर्व गुणांची भर घालण्याचे उद्दिष्ट भारतीय संघाने ठेवले आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तिन्ही आघाडय़ांवर वर्चस्व गाजवत भारताने विशाखापट्टणम येथील पहिली कसोटी २०३ धावांनी जिंकली होती. त्यानंतर पुणे कसोटीत एक डाव आणि १३७ धावांनी विजय मिळवत भारताने ही मालिका २-० अशी खिशात घातली होती.

भारताने चार सामन्यांमध्ये २०० गुणांची कमाई केली असून न्यूझीलंड आणि श्रीलंकेला तब्बल १४० गुणांनी मागे टाकत भारताने कसोटी अजिंक्यपद शर्यतीत अग्रस्थान पटकावले आहे. मालिकेवर नाव कोरले असले तरी भारतीय संघ तिसऱ्या कसोटीतही पूर्ण जोशाने उतरेल, असे कर्णधार विराट कोहलीने आधीच स्पष्ट केले आहे.

आफ्रिकेची फलंदाजी पूर्णपणे अपयशी : पहिल्या कसोटीत दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी काहीसा प्रतिकार केला होता, पण पुणे कसोटीत त्यांनी नांगी टाकली होती. केशव महाराज, सेनूरॅन मुथूस्वामी, डेन पीट आणि व्हर्नन फिलँडर या तळाच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांना झुंजवले होते. मात्र डीन एल्गर, डीकॉक आणि टेम्बा बव्हूमा यांनी जबाबदारीने फलंदाजी करावी, असे आवाहन कर्णधार डय़ू प्लेसिसने केले आहे. एडीन मार्करमने दुखापतीमुळे माघार घेतली असल्यामुळे आफ्रिकेला सलामीवीराचा शोध घ्यावा लागणार आहे. फिरकीपटू केशव महाराज दुखापतीमुळे या सामन्यात खेळू शकणार नाही.

भारतीय फलंदाजी बहरात : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्या कामगिरीत फरक आहे तो फलंदाजीचा. मयांक अगरवाल आणि विराट कोहली यांनी द्विशतकी खेळी साकारल्या असून रोहित शर्माने द्विशतकाच्या दिशेने (१७६ धावा) झेप घेतली होती. त्याचबरोबर मयांक आणि रोहित यांनी या मालिकेत आतापर्यंत दोन शतके साकारली आहेत. चेतेश्वर पुजारा, रवींद्र जडेजा आणि अजिंक्य रहाणे यांनी अर्धशतकी खेळी करत भारताच्या विजयात योगदान दिले आहे. दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी चांगली सुरुवात केली असली तरी त्यांना त्याचे मोठय़ा खेळीत रूपांतर करण्यात अपयश आले आहे. डीन एल्गर आणि क्विंटन डीकॉक यांनी शतके झळकावत छाप पाडली असली तरी त्यांना कामगिरीत सातत्य राखता आले नाही.

रांची कसोटीवर फिरकीपटूंचे वर्चस्व? : रांचीतील जेएससीए आंतरराष्ट्रीय स्टेडियमची खेळपट्टी कोरडी वाटत असल्यामुळे तिसऱ्या कसोटीवरही फिरकीपटूंचे वर्चस्व राहण्याची शक्यता आहे. पाहुण्या दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांना पुन्हा एकदा भारतीय फिरकीपटूंच्या आव्हानाचा सामना करावा लागणार आहे. एका वेगवान गोलंदाजाच्या जागी कुलदीप यादवचा संघात समावेश करण्यात येणार असल्यामुळे आफ्रिकन फलंदाजांच्या चिंतेत आणखीन वाढ होणार आहे. या मालिकेत रविचंद्रन अश्विनने सर्वाधिक १४ बळी मिळवले असून रवींद्र जडेजाने १० फलंदाजांना माघारी पाठवले आहे.

भारतीय फलंदाज ज्या पद्धतीने मोठय़ा खेळी साकारतात, त्याचपद्धतीने दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनीही शतकी किंवा द्विशतकी खेळी करण्याची गरज आहे. ५० किंवा ६० धावा करून कसोटी सामना जिंकता येत नाही, हे दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी ध्यानात घ्यावे. सद्यस्थितीला भारत हा बलाढय़ संघ असला तरी त्यांच्याकडून दारुण पराभव पत्करणे अपेक्षित नाही. गोलंदाजांनीही २० बळी मिळवण्याची अपेक्षा आहे, मात्र या मालिकेत तसे अद्याप तरी घडले नाही. त्यामुळे फलंदाजांसोबत गोलंदाजांनीही कामगिरी उंचावण्याची आवश्यकता आहे.

– फॅफ डय़ू प्लेसिस, दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार

दक्षिण आफ्रिकेने आशिया खंडात खेळताना सलग नऊ सामन्यांत नाणेफेकीचा कौल गमावला आहे. त्यामुळे रांची कसोटीत तरी ही परंपरा मोडीत काढली जाणार का, याची उत्सुकता सर्वाना लागून राहिली आहे.

रविचंद्रन अश्विनने दक्षिण आफ्रिकेचा सलामीवीर डीन एल्गर याला कसोटीत सहा वेळा बाद केले आहे. त्याचबरोबर कर्णधार फॅफ डय़ू प्लेसिसलाही अश्विनने पाच वेळा माघारी पाठवले आहे.

संघ

भारत : विराट कोहली (कर्णधार), मयांक अगरवाल, रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), हनुमा विहारी, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), वृद्धिमान साहा (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, उमेश यादव, इशांत शर्मा, शुभमन गिल.

दक्षिण आफ्रिका : फॅफ डय़ू प्लेसिस (कर्णधार), टेंबा बव्हुमा, थ्युनिस डी ब्रून, क्विंटन डी कॉक, डीन एल्गर, झुबायर हम्झा, केशव महाराज, एडीन मार्करम, सेनूरॅन मुथूस्वामी, लुंगी एन्गिडी, आनरिख नॉर्कीआ, व्हर्नन फिलँडर, डेन पीट, कॅगिसो रबाडा, रुडी सेकंड.

* सामन्याची वेळ : सकाळी ९.३० वा.

* थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, स्टार स्पोर्ट्स हिंदी.