24 January 2019

News Flash

मालिका विजयाचा भारताचा निर्धार

आता पाचवा सामना जिंकून मालिका खिशात टाकण्याचा निर्धार भारतीय संघाने केला आहे.

रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणे

दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा पाचवा एकदिवसीय सामना आज

ऐतिहासिक विजयाचे स्वप्न घेऊन भारतीय संघ चौथ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात उतरला होता. पण दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी त्यांचे हे स्वप्न बेचिराख केले. आता पाचवा सामना जिंकून मालिका खिशात टाकण्याचा निर्धार भारतीय संघाने केला आहे. दुसरीकडे दक्षिण आफ्रिकेचा संघ विजयाच्या वाटेवर परतला आहे. पहिले तिन्ही सामने त्यांनी गमावले. पण चौथा सामना जिंकून त्यांनी मालिकेतील आव्हान जिवंत ठेवले आहे. त्यामुळे हा सामना जिंकून भारतीय संघ मालिकेत विजयी आघाडी घेतो की दक्षिण आफ्रिकेचा संघ विजयी घोडदौड कायम राखतो, हा पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

गेल्या सामन्यात विराट कोहली आणि शिखर धवन यांनी आपण चांगल्या फॉर्मात आहोत, हे पुन्हा एकदा दाखवून दिले. आतापर्यंतच्या मालिकेचा विचार केला तर भारताच्या धावांमध्ये या दोघांचा सिंहाचा वाटा पाहायला मिळेल. सलामीवीर आणि उपकर्णधार रोहित शर्मा हा सलग चारही सामन्यांमध्ये मोठी खेळी साकारण्यात अपयशी ठरला आहे. त्याचबरोबर मधल्या फळीलाही आपली छाप पाडता आलेली नाही. गेल्या सामन्यात महेंद्रसिंग धोनीने अखेपर्यंत फलंदाजी करत डाव सावरला होता. त्याच्याकडून संघाला मोठय़ा खेळीची अपेक्षा असेल. गोलंदाजीमध्ये कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार आणि जसप्रीत बुमरा यांच्याकडून चांगला मारा पाहायला मिळाला आहे. गेल्या सामन्यात फक्त त्यांना आपली चमक दाखवता आली नाही. पण पाचव्या सामन्यात या चौघांकडून सातत्यपूर्ण कामगिरीची अपेक्षा संघाला असेल.

दक्षिण आफ्रिकेचा संघ हा फक्त अनुभवी फलंदाजांच्या जोरावरच जिंकू शकतो, असे वाटत होते. पण गेल्या सामन्यात या गोष्टीला तडा गेला. हेन्रिच क्लासीनने आपल्या दुसऱ्याच सामन्यात केलेल्या धडाकेबाज फलंदाजीमुळे त्यांच्याकडून अपेक्षा उंचावल्या आहेत. हशिम अमला आणि एबी डी’व्हिलियर्स यांना आतापर्यंत त्यांची छाप पाडता आलेली नाही. डी’व्हिलियर्सने गेल्या सामन्याद्वारे संघात पुनरागमन केले होते. पण त्या सामन्यातही त्याला संघाला विजय मिळवून देणारी खेळी

साकारता आली नव्हती. चौथ्या सामन्यात क्लासीनला डेव्हिड मिलरने चांगली साथ दिली होती, त्याबरोबर अँडीले फेहलुक्वायोने कमी चेंडूंमध्ये जास्त धावा कशा करता येतात, याचा उत्तम वस्तुपाठ दाखवला होता. त्यामुळे या तिघांच्या फलंदाजीवर साऱ्यांच्या नजरा असतील.

दक्षिण आफ्रिकेला गोलंदाजीमध्ये अजूनही लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळे त्यांना पाचवा सामना जिंकायचा असेल तर त्यांना गोलंदाजीच्या सरावासाठी अधिक घाम गाळावा लागेल.

दोन्ही संघ चांगलेच तुल्यबळ आहेत. पण भारताची फलंदाजी ही सातत्यपूर्ण होत आहे. पण त्यांनी जर कोहली आणि धवन यांना स्वस्तात बाद केले तर भारताचा डाव अडचणीत येऊ शकतो. भारताला जर हा सामना जिंकायचा असेल तर त्यांना चुका टाळाव्या लागतील. गेल्या सामन्यात मिलरला दिलेली जीवदाने भारताला महाग पडली होती. त्यामुळे भारताने चुका सुधारायला हव्यात.

चौथ्या सामन्यातील विजयानंतर संघाचे मनोबल उंचावले आहे. संघात सकारात्मक ऊर्जा आहे. आमचा सरावही चांगला होत आहे. त्यामुळे आगामी सामने भारतासाठी सोपे नसतील. त्यांना यापुढे प्रत्येक गोष्टीसाठी कडवी झुंज द्यावी लागेल. विराट कोहली आणि शिखर धवन यांना कसे रोखायचे, याची रणनिती आम्ही आखत आहोत.

अँडीले फेहलुक्वायो, दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू खेळाडू

संघ

  • भारत : विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, दिनेश कार्तिक, केदार जाधव, महेंद्रसिंग धोनी (यष्टिरक्षक), हार्दिक पंडय़ा, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमरा, मोहम्मद शमी, शार्दुल ठाकूर.
  • दक्षिण आफ्रिका : एडीन मार्कराम (कर्णधार), हशिम अमला, जेपी डय़ुमिनी, इम्रान ताहिर, डेव्हिड मिलर, मॉर्नी मॉर्केल, ख्रिस मॉरिस, लुंगीसानी एन्गिडी, अँडीले फेहलुक्वायो, कॅगिसो रबाडा, ताब्रेझे शाम्सी, खायेलिहले झोंडो, फरहान बेहरादीन, हेन्रिच क्लासीन (यष्टिरक्षक), एबी डी’व्हिलियर्स.
  • वेळ : सायंकाळी ४.३० वा. पासून
  • थेट प्रक्षेपण : सोनी टेन १, ३.

First Published on February 13, 2018 2:26 am

Web Title: india vs south africa 5th odi india south africa