News Flash

विजयी पंचकाचा भारताचा निर्धार

आज दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा सहावा एकदिवसीय क्रिकेट सामना

| February 16, 2018 02:46 am

विजयी पंचकाचा भारताचा निर्धार

आज दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा सहावा एकदिवसीय क्रिकेट सामना

दरबान, सेंच्युरियन, केप टाऊन आणि पोर्ट एलिझाबेथ येथील सामने जिंकून भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्धची एकदिवसीय क्रिकेट सामना खिशात टाकली आहे. भारतासाठी हा ऐतिहासिक विजय ठरला, त्याचबरोबर त्यांनी आयसीसीच्या क्रमवारीतही अव्वल स्थान पटकावले आहे. पण त्यांची विजयाची भूक मात्र कायम आहे, त्यामुळे या मालिकेत विजयाचा पंचक पूर्ण करण्याचा निर्धार भारतीय संघाने केला आहे. मालिकेत विजयी आघाडी मिळवल्यामुळे सहाव्या आणि अखेरच्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारताकडून राखीव खेळाडूंना संधी मिळण्याची शक्यता आहे. दक्षिण आफ्रिकेने मालिका गमावलेली आहे, पण तरीही हा सामना जिंकून मालिकेचा शेवट गोड करण्यासाठी यजमान प्रयत्नशील असतील.

भुवनेश्वर कुमार आणि जसप्रीत बुमरा हे दोन्ही गोलंदाज दीर्घ कालावधीपासून मर्यादित षटकांचे क्रिकेट सामने खेळत आहेत. यापुढे त्यांना दक्षिण आफ्रिकेत ट्वेन्टी-२० सामने खेळायचे आहेत, त्यानंतर श्रीलंकेचा दौराही आहे. त्यामुळे या सामन्यात या दोघांनी विश्रांती देण्याचा निर्णय संघ व्यवस्थापन घेऊ शकेल. या दोघांऐवजी मोहम्मद शमी आणि शार्दूल ठाकूर या वेगवान गोलंदाजांना या लढतीत संधी मिळू शकेल. शमीने २०१५च्या विश्वचषकानंतर फक्त तीन एकदिवसीय सामने खेळले आहेत. त्याचबरोबर शार्दूलच्या नावावर दोन एकदिवसीय सामने आहेत, त्यामुळे आगामी विश्वचषकाचा विचार करता या दोघांना या सामन्यात संधी मिळण्याची दाट शक्यता आहे.

चौथ्या क्रमांकावरील अजिंक्य रहाणेच्या नावावर पाच सामन्यांमध्ये फक्त एक अर्धशतक आहे, त्याचबरोबर हार्दिक पंडय़ाला चार डावांमध्ये मिळून फक्त २६ धावाच करता आल्या आहेत. त्यामुळे या दोघांना वगळून अन्य दोन खेळाडूंना संधी मिळू शकते. दिनेश कार्तिक, मनीष पांडे किंवा केदार जाधव या तिघांचा विचार या दोन जागांसाठी केला जाऊ शकतो. आतापर्यंत मालिकेत कर्णधार विराट कोहली आणि सलामीवीर शिखर धवन यांनी चांगल्या धावा केल्या आहेत. गेल्या सामन्यात शतक झळकावत आपण फॉर्मात आलो असल्याचे रोहित शर्मानेही दाखवून दिले आहे. गोलंदाजीमध्ये कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहल ही फिरकी जोडी कमाल कामगिरी करीत आहे.

दक्षिण आफ्रिकेच्या संघावर नजर फिरवली तर त्यांच्या एकाही फलंदाजाला सातत्यपूर्ण धावा करता आलेल्या नाहीत. गेल्या सामन्यात हशिम अमलाने अर्धशतक झळकावले असले तरी त्याच्यासारख्या अनुभवी खेळाडूने धावचीत होत आत्मघात केला होता.

एबी डी’व्हिलियर्सला अजूनही सूर गवसलेला नाही. डेव्हिड मिलर, जेपी डय़ुमिनी यांनाही लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. हेन्रिच क्लासीन हा नवा नायक त्यांना या मालिकेत सापडला असला तरी त्याच्याकडे अनुभव आणि संयमाची कमतरता जाणवले. कर्णधार एडिन मार्करामलाही अजून फलंदाजीत छाप पाडता आलेली नाही. दक्षिण आफ्रिकेची गोलंदाजी चांगली होत असली तरी त्यांना भारताच्या फलंदाजांवर वर्चस्व राखता आलेले नाही.

फिरकीपटूंविरुद्धच्या अपयशाचे कॅलिसने रहस्य उकलले

दक्षिण आफ्रिकेचे फलंदाज भारताच्या फिरकीपटूंसमोर अपयशी का ठरतात, याचे रहस्य माजी महान अष्टपैलू जॅक कॅलिसने उकलले आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये निष्णात फिरकीपटूंचा अभाव असल्यामुळे यजमान संघावर ही वेळ आल्याचे त्याचे म्हणणे आहे.

‘‘आपल्याकडे जागतिक दर्जाचे फिरकीपटू नाहीत, हे मान्य करून दक्षिण आफ्रिका मंडळाने आता चांगले लेगस्पिनर संघात घ्यावेत. देशांतर्गत स्तरावर अव्वल फिरकीपटू निर्माण केल्यास युवा क्रिकेटपटूंना फिरकी समजून घेता येईल. आम्हालाही याच कालखंडातून जावे लागले. आम्ही अनुभवातून शिकलो,’’ असे कॅलिसने एका मुलाखतीत सांगितले.

फिरकीपटूंचा सक्षमपणे मुकाबला करण्यासाठी अचूक तंत्र नसल्याचेही कॅलिसने या वेळी सांगितले. भारताच्या प्रभावी फिरकी माऱ्यासमोर दक्षिण आफ्रिकेचे फलंदाज सपशेल अपयशी ठरलेत. एकदिवसीय मालिकेतील पाहुण्यांची ४-१ अशी विजयी आघाडी सर्व काही सांगून जाते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 16, 2018 2:46 am

Web Title: india vs south africa 6th odi
Next Stories
1 दक्षिण आफ्रिकेवर वर्चस्व राखण्यासाठी भारतीय महिला सज्ज
2 अंध मुलींचा क्रिकेट ध्यास!
3 आयपीएलमधे बोली न लागल्याने इशांत शर्मा ‘या’ संघाकडून खेळणार क्रिकेट
Just Now!
X