भारत-द. आफ्रिका तिसरा एकदिवसीय सामना

इंदूरला महेंद्रसिंग धोनीला सूर गवसला आणि भारताने दक्षिण आफ्रिकेचा विजयी अश्वमेध रोखला. ग्रीन पार्कवरील पहिल्या एकदिवसीय सामन्यात धोनी आपल्या ‘फिनिशर’ या भूमिकेला न्याय न देऊ शकल्यामुळे त्याच्यावर जोरदार टीका झाली होती. परंतु दुसऱ्या लढतीत दमदार फलंदाजीचे दर्शन घडवत धोनीने भारताला २२ धावांनी विजय मिळवून दिला. एकदिवसीय मालिकेत १-१ अशी बरोबरी साधल्यामुळे आत्मविश्वास दुणावलेला भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्धची तिसरी लढत जिंकण्यासाठी उत्सुक आहे.

ट्वेन्टी-२० मालिकेनंतर भारताने पहिला एकदिवसीय सामना गमावला आणि धोनीवर चहुबाजूने टीका झाली. माजी क्रिकेटपटूंनी संघातील त्याच्या स्थानापुढेही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. परंतु दुसऱ्या लढतीत धोनीने सामना जिंकून देणारी नाबाद ९२ धावांची खेळी साकारली. धोनीने दमदार फलंदाजी प्रमाणेच आपल्या गोलंदाजांचाही योग्य वापर केला.

फॉर्मात असलेल्या रोहित शर्माला दुसऱ्या लढतीत लवकर बाद करण्यात दक्षिण आफ्रिकेने यश मिळवले होते. अजिंक्य रहाणेने सलग दोन अर्धशतके झळकावली आहेत. मात्र कसोटी कर्णधार विराट कोहली, सुरेश रैना आणि शिखर धवन हे धावांसाठी झगडत आहेत. ही भारताच्या दृष्टीने चिंतेची बाब आहे.

दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजीची धुरा कर्णधार ए बी डी’व्हिलियर्स आणि फॅफ डू प्लेसिस जबाबदारीने सांभाळत आहेत. मात्र हशिम अमला आणि डेव्हिड मिलर अपयशी ठरत आहेत.

कडेकोट बंदोबस्त

भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसऱ्या एकदिवसीय सामन्यावर पटेल समाजाच्या आंदोलनाचे सावट असल्याने स्टेडियमवर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. त्यामुळे स्टेडियमला छावणीचे स्वरूप आले आहे तर शहरातही मोठय़ा प्रमाणावर सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. ‘‘आम्हाला स्टेडियममध्ये जाण्यापासून मज्जाव करण्यात आल्यास दोन्ही संघांचा मार्ग रोखण्यात येईल व त्यांना मैदानावर जाऊ दिले जाणार नाही,’’ असा इशारा हार्दिक पटेल यांनी दिला होता. आमच्याकडे या सामन्याची तिकिटे आहेत आणि आम्ही स्टेडियमवर जाणारच, असा निर्धारही पटेल यांनी व्यक्त केला आहे.

 सामन्याची वेळ : दुपारी १.३० वाजल्यापासून.

थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स आणि एचडी १ आणि ३.

भारत : महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), रविचंद्रन अश्विन, स्टुअर्ट बिन्नी, शिखर धवन, विराट कोहली, भुवनेश्वर कुमार, अक्षर पटेल, अजिंक्य रहाणे, सुरेश रैना, अंबाती रायुडू, मोहित शर्मा, रोहित शर्मा, उमेश यादव, गुरकिराट सिंग, अमित मिश्रा, हरभजन सिंग.

दक्षिण आफ्रिका : ए बी डी’व्हिलियर्स (कर्णधार), हशिम अमला, क्विंटन डी कॉक, फॅफ डू प्लेसिस, जीन-पॉल डय़ुमिनी, डेव्हिड मिलर, फरहान बेहरादिन, ख्रिस मॉरिस, खाया झोंडो, आरोन फंगिसो, इम्रान ताहीर, डेल स्टेन, मॉर्नी मॉर्केल, कायले अ‍ॅबॉट, कॅगिसो रबाडा.