दुसऱ्या टी-२० सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा सात गड्यांनी पराभव करत मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे. विराट कोहली आणि शिखर धवन यांच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर भारताने १४९ धावांचे आव्हान पार केलं. या सामन्यात बेजबाबदार फटका मारून बाद होत ऋषभ पंतने पुन्हा एकदा चाहत्यांना निराश केलं आहे. सोशल मीडियावर ऋषभ पंतच्या फलंदाजीवर नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

दुसऱ्या सामन्यात चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेला ऋषभ पंत अवघ्या चार धावा करून माघारी परतला. भारतीय संघ विजयाच्या जवळ असताना चुकीचा फटका मारून पंतने आपली विकेट दिल्यामुळे नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

पंत ज्या पद्धतीने बाद झाला त्यावर फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड यांची नाराजीही दिसून आली. नेटकऱ्यांनी तर धोनीला पुन्हा बोलवण्याची मागणी केली आहे. तर काही जणांनी पंतला आणखी किती संधी द्यायची? असा प्रश्न उपस्थित केला. इशान किशन आणि संजू सॅमसन यांनाही संधी द्यायला हवी असे काहींनी सुचवलं आहे.

गेल्या १० टी-२० सामन्यांमध्ये ऋषभ पंतची फलंदाजीतली कामगिरी फारशी वाखणण्याजोगी नाहीये. विंडीज दौऱ्यात अखेरच्या टी-२० सामन्यात केलेल्या नाबाद ६५ धावा ही त्याची सर्वोत्तम खेळी आहे.