कसोटी सामन्याचा उत्तरार्ध जवळ आला तेव्हा दक्षिण आफ्रिकेच्या संघाने विजयाच्या योजना गुंडाळल्या. याबाबत दक्षिण आफ्रिकेचा संघनायक ग्रॅमी स्मिथने स्पष्टीकरण देताना सांगितले की, पराभवाच्या भीतीपोटी आम्ही अखेरच्या क्षणी व्यूहरचनेत बदल केला असे मुळीच समजण्याची आवश्यकता नाही.
‘‘आमची लक्ष्याकडे वाटचाल सुरू होती. आम्ही विजयाच्या इतक्या समीप जाऊ अशी उपाहाराप्रसंगी आमची अपेक्षा नव्हती. आम्ही फक्त फलंदाजी करीत गेलो आणि भागीदारी वाढत गेली. सामना वाचवण्यासाठी संपूर्ण सत्र बळी न गमावता खेळून काढण्याची आवश्यकता होती आणि उपाहारानंतर ते आम्ही करून दाखवले,’’ असे स्मिथने सांगितले.
शतकवीर आणि मैदानावर स्थिरावलेला फॅफ डय़ू प्लेसिस बाद झाल्यामुळे सामन्याचे चित्र काहीसे पालटले, हे स्मिथने मान्य केले. स्मिथ म्हणाला, ‘‘ए बी डी व्हिलियर्स तंबूत परतल्यानंतर अखेरच्या सत्रात प्लेसिस धावचीत झाला. त्यानंतर मैदानावरील फलंदाजांनी असा विचार केला असावा की सामना अनिर्णीत राखण्यात संघाचे भले आहे.’’