भारताला दक्षिण आफ्रिकेविरोधात दुसऱ्या वनडेत विजयासाठी केवळ २ धावांची आवश्यकता होती. त्याचवेळी उपहारासाठी खेळ थांबवण्यात आला. हे फक्त आयसीसीच्या विचित्र नियमांमुळे झाल्यामुळे त्यांना मोठ्या टीकेला सामोरे जावे लागले. मैदानातील दोन्ही अनुभवी पंच अलीम दार आणि अॅड्रियन होल्डस्टॉक तसेच मॅच रेफ्री अँडी पायक्रॉफ्ट यांच्यावर क्रिकेट समालोचक आणि क्रिकेट तज्ज्ञांनी टीकेची झोड उठवली.

वेस्ट इंडिजचे माजी क्रिकेटपटू मायकल होल्डिंग यांनी हा हास्यास्पद निर्णय असल्याचे म्हटले. समालोचन करताना ते म्हणाले की, आयसीसीला क्रिकेट आकर्षक बनवायचे आहे. पण दुसरीकडे असा हास्यास्पद निर्णय घेण्यात आला. दोन्ही संघ या निर्णयावर खूश नसल्याचे दिसून आले. त्यावेळी फलंदाजीसाठी मैदानात असलेला भारतीय कर्णधार विराट कोहलीने पंचांसमोर याबाबत चर्चा केली. पण पंचांवर त्याचा कोणताच परिणाम झाल्या नसल्याचे दिसून आले.

भारताचा माजी कसोटीवीर वीरेंद्र सेहवागनेही पंचांच्या निर्णयाची हुर्रै उडवली. पंचांनी भारतीय फलंदाजांबरोबर अशी वर्तणूक केली, ज्यापद्धतीने सार्वजनिक बँका ग्राहकांना ‘लंच नंतर या’, म्हणतात, अगदी त्याप्रमाणे असे सेहवागने म्हटले. मुरली कार्तिकनेही हे हास्यास्पद असल्याचे म्हटले. जेव्हा सामना संपत आला होता, तेव्हा तो थांबवण्याचा काय अर्थ आहे. फक्त २ धावा हव्या होत्या.. हास्यास्पद आहे, असे तो म्हणाला.

जेव्हा भारतासमोर विजयासाठी २ धावांची आवश्यकता होती, तेव्हा पंचांनी आयसीसीच्या जटील नियमांतर्गत उपहाराचा निर्णय घेतला. भारताने नाणेफेक जिंकत दक्षिण आफ्रिकेला प्रथम फलंदाजी दिली होती. आफ्रिकेचा संघ ११८ धावांवर बाद झाला होता. त्यानंतर भारताचा डाव लवकर सुरू झाला. जेव्हा त्यांनी १९ षटकांत एका गड्याच्या बदल्यात ११७ धावा केल्या, तेव्हा पंचांनी नियमाचे कारण पुढे करत उपहाराची घोषणा करत खेळ थांबवला.