टीम इंडियाने तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत आफ्रिकन संघाला पूर्णपणे नेस्तनाबूत करत ‘व्हाइटवॉश’ दिला. तिसऱ्या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना ४९७ धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना आफ्रिकेचा पहिला डाव १६२ धावांवर तर फॉलो-ऑन नंतरचा डाव १३३ धावांवर आटोपला. त्यामुळे एक डाव आणि २०२ धावांनी विजय मिळवत भारताने मालिका ३-० ने जिंकली.

तिसऱ्या सामन्यात रोहित शर्माने ठोकलेल्या द्विशतकामुळे भारताला पहिल्या डावात ४९७ धावांपर्यंत मजल मारता आली. रोहितला सामनावीर तर घोषित करण्यात आलेच, त्याचसोबत मालिकावीराचा किताबही रोहितलाच देण्यात आला. रोहितने ३ सामन्यांच्या कसोटी मालिकेत २ शतके आणि १ द्विशतक ठोकत ५२९ धावा केल्या. त्यामुळे ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेत ५०० हून अधिक धावा करणारा रोहित पाचवा फलंदाज ठरला.

भारताकडून ३ सामन्यांच्या कसोटी मालिकेत ५००+ धावा

  • व्ही व्ही एस लक्ष्मण – ५०३ वि. ऑस्ट्रेलिया (२००१)
  • विरेंद्र सेहवाग – ५४४ वि. पाकिस्तान (२००४-०५)
  • सौरव गांगुली – ५३४ वि. पाकिस्तान (२००७-०८)
  • विराट कोहली – ६१० वि. श्रीलंका (२०१७-१८)
  • रोहित शर्मा – ५२९ वि. दक्षिण आफ्रिका (२०१९)

दरम्यान, भारताच्या ४९७ धावांना प्रत्युत्तर देताना आफ्रिकेचा पहिला डाव १६२ धावांत आटोपला. दुखापतग्रस्त एडन मार्क्रमच्या जागी खेळणारा झुबायर हामझा याने टेम्बा बावुमाच्या साथीने ९१ धावांची भागीदारी केली. हामझाने दमदार अर्धशतक ठोकले. तो ६२ धावांवर बाद झाला. इतर फलंदाजांची त्याला साथ मिळू शकली नाही.

पहिल्या डावातील अपयशामुळे आफ्रिकेवर फॉलो-ऑनची नामुष्की ओढवली. त्यानंतर दुसऱ्या डावातही आफ्रिकेने खराब कामगिरी केली. डी कॉक, हामझा, बावुमा, हामझा आणि क्लासें या फलंदाजांना दोन अंकी धावसंख्याही गाठता आली नाही. सामन्याच्या चौथ्या दिवसाचा खेळ सुरू झाला अणि अवघ्या काही मिनिटात खेळ संपला.