News Flash

थरार!

अनिर्णित झालेल्या कसोटीचा थरार किती रोमांचकारी असू शकतो याचा प्रत्यय जोहान्सबर्ग कसोटीने दिला. जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी

| December 23, 2013 02:47 am

अनिर्णित झालेल्या कसोटीचा थरार किती रोमांचकारी असू शकतो याचा प्रत्यय जोहान्सबर्ग कसोटीने दिला. जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या दक्षिण आफ्रिकेसमोर भारतीय संघाने ४५८ धावांचे विक्रमी लक्ष्य ठेवले होते. मात्र हे लक्ष्य पार करण्याची जिद्द आफ्रिकेच्या फलंदाजांनी दाखवली. सुरुवातीला हा सामना अनिर्णीतावस्थेत सुटेल, असे वाटत होते. मात्र एबी डी व्हिलियर्स आणि फॅफ डू प्लेसिस यांच्या दमदार शतकी खेळीमुळे हा सामना दक्षिण आफ्रिकेच्या बाजूने झुकला. प्लेसिस आणि डीव्हिलियर्स यांनी शतकी खेळी साकारत विजयासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. जिंकण्यासाठी एकदिवसीय किंवा ट्वेन्टी-२० सामन्याप्रमाणे समीकरण असताना अजिंक्य रहाणेच्या थेट धावफेकीवर डू प्लेसिस धावचीत झाला. अंधुक प्रकाशात विजयासाठी आवश्यक १६ धावांसाठी भारतीय गोलंदाजीवर आक्रमण करण्याच्या नादात पराभव पदरी पडण्याची भीती असलेल्या दक्षिण आफ्रिकेने तीन षटके खेळून काढत सामना अनिर्णित राखला. विजयासाठी अशक्यप्राय वाटणाऱ्या आव्हानाच्या इतक्या समीप येऊनही आफ्रिकेला अनिर्णितवर समाधान मानावे लागले तर ४५८ धावा पाठीशी असतानाही पराभव समोर दिसत असताना सामना अनिर्णित झाल्याने भारतीय संघाचा जीव भांडय़ात पडला. पहिल्या डावात निर्णायक शतक तर दुसऱ्या डावात ९६ धावांची खेळी करणाऱ्या विराट कोहलीला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. दुसरा सामना २६ डिसेंबरपासून दरबान येथे होणार आहे.
पाचव्या दिवशी खेळायला सुरुवात केल्यानंतर दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी ३२० धावांची आवश्यकता होती तर भारतीय संघाला ८ बळींची गरज होती. पाचव्या दिवसाची खेळपट्टी, प्रचंड वाटणारे लक्ष्य हे पाहता भारतीय संघाला दक्षिण आफ्रिकेत दुर्मिळ विजयाची संधी होती. मात्र डी व्हिलियर्स आणि प्लेलिस यांना हे मंजूर नव्हते. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी २०५ धावांची मॅरेथॉन भागीदारी साकारत दक्षिण आफ्रिकेला पराभवाच्या खाईतून बाहेर काढले. त्यांच्या शतकी खेळीमुळे दक्षिण आफ्रिका ऐतिहासिक विजय साकारणार, असे चित्र होते. मात्र अखेर दोन्ही संघांचे प्रयत्न अपुरे पडले.
दिवसाचा खेळ सुरू झाल्यानंतर लगेचच अल्विरो पीटरसन तंबूत परतला. ७६ धावांची खेळीसह शनिवारी खेळपट्टीवर ठाण मांडून बसलेला पीटरसनला मोहम्मद शामीने माघारी धाडले. त्यानंतर प्लेसिस आणि अनुभवी जॅक कॅलिस यांनी डावाची सूत्रे हाती घातली. मात्र झहीर खानच्या गोलंदाजीवर कॅलिस  (३४) वादग्रस्तरित्या पायचीत झाला. कॅलिस परतल्याने अडचणीत सापडलेल्या आफ्रिकेच्या संघाला आधार दिला तो लेसिस आणि डी व्हिलियर्स जोडीने. दोघांचीही शतके झाल्यानंतर इशांत शर्माने डीव्हिलियर्सला बाद करत ही जोडी फोडली. त्याने १२ चौकारांसह १०३ धावा केल्या. जेपी डय़ुमिनी केवळ ५ धावा काढून बाद झाला. त्यावेळी दक्षिण आफ्रिकेला ५० धावांची आवश्यकता होती. फिलँडरने डू प्लेसिसच्या साथीने सातव्या विकेटसाठी ३५ धावांची भागीदारी रचल्यानंतर चोरटी धाव घेण्याचा प्लेसिसचा प्रयत्न रहाणेच्या धावफेकीमुळे फसला आणि सामन्याचे पारडे फिरले. डू प्लेसिसने १५ चौकारांसह ३९५ चेंडूत १३४ धावांची खेळी केली. फिलँडर आणि स्टेन यांनी बचावात्मक धोरण स्वीकारले आणि एक ऐतिहासिक कसोटी अनिर्णित निर्णयासह क्रिकेटच्या इतिहासात नोंदली गेली.
धावफलक
भारत (पहिला डाव) : २८०,
दक्षिण आफ्रिका (पहिला डाव) : २४४,
भारत (दुसरा डाव) : ४२१,
दक्षिण आफ्रिका (दुसरा डाव) : ग्रॅमी स्मिथ धावचीत रहाणे ४४, अल्विरो पीटरसन त्रि. गो. शामी ७६, हशीम अमला त्रि. गो. शामी ४, फॅफ डू प्लेसिस धावचीत रहाणे १३४, जॅक कॅलिस पायचीत गो. झहीर ३४, एबी डी व्हिलियर्स त्रि. गो. इशांत १०३, जेपी डय़ुमिनी त्रि. गो. शामी ५, व्हरनॉन फिलँडर नाबाद २५, डेल स्टेन नाबाद ६, अवांतर : (बाइज २, लेगबाइज ७, वाइड ८, नोबॉल २) १९, एकूण : १३६ षटकांत ७ बाद ४५०
बादक्रम :  १-१०८, २-११८, ३-१४३, ४-१९७, ५-४०२, ६-४०७, ७-४४२
गोलंदाजी : झहीर खान ३४-१-१३५-१, इशांत शर्मा २९-४-९१-१, मोहम्मद शामी २८-५-१०७-३, रवीचंद्रन अश्विन ३६-५-८३-०, मुरली विजय १-०-३-०, महेंद्रसिंग धोनी २-०-४-०, विराट कोहली ६-०-१८-०
सामनावीर : विराट कोहली
झहीर खानचे ३०० बळी
जोहान्सबर्ग : अनुभवी गोलंदाज झहीर खानने जॅक कॅलिसला पायचीत करत कसोटीतील ३००व्या बळीची नोंद केली. ८९व्या कसोटीत झहीरने ही किमया साधली. कसोटी क्रिकेटमध्ये ३०० बळी टिपणारा तो चौथा भारतीय गोलंदाज ठरला आहे. कपिल देव, अनिल कुंबळे आणि हरभजन सिंग यांनी याआधी ३०० विकेट्चा जादुई आकडा गाठला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 23, 2013 2:47 am

Web Title: india vs south africa twin tons in vain as first test ends in exciting draw at the wanderers
टॅग : India Vs South Africa
Next Stories
1 २०२२ फिफा विश्वचषकासाठी भारत पात्र ठरेल
2 जलतरणपटूंचे जिवाचे मालवण
3 आकांक्षांपुढती गगन ठेंगणे..
Just Now!
X