दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या तिसऱ्या कसोटी मालिकेत भारताने तिसऱ्या दिवशी सामन्यावरील पकड अधिक मजबूत केली. २ बाद ९ या धावसंख्येवरून तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरू झाला आणि आफ्रिकेचा पहिला डाव १६२ धावांवर आटोपला. त्यामुळे ३३५ धावांची आघाडी घेणाऱ्या विराटच्या टीम इंडियाने आफ्रिकेला फॉलो-ऑन दिला.

पहिल्या डावात उमेश यादवची गोलंदाजी भेदक ठरली. आफ्रिकेचा फलंदाज क्विंटन डी कॉक याचा उमेशने उडवलेला त्रिफळा चर्चेचा विषय ठरला. डी क़़ॉक सलामीवीर म्हणून मैदानात उतरला. तो ५ चेंडूत ४ धावांवर असताना उमेशने एक स्विंग होणारा चेंडू टाकला आणि त्यावर डी कॉक बाद झाला. उमेशने टाकलेल्या चेंडू स्विंग होऊन स्टंपवर आदळला. त्यामुळे स्टंपनेही कोलांटीउडी मारली. ते पाहून डी कॉकही थक्क झाल्याचे दिसून आले.

दरम्यान, २ बाद ९ या धावसंख्येवरून खेळताना आफ्रिकेने पहिल्या सत्रात ४ तर दुसऱ्या सत्रात ४ गडी गमावले. आफ्रिकेचा कर्णधार पहिल्या डावात अपयशी ठरला. ९ चेंडूत १ धाव काढून तो बाद झाला. उमेश यादवने त्याचा त्रिफळा उडवला. त्यामुळे आफ्रिकेची अवस्था ३ बाद १६ अशी झाली होती. त्यानंतर मात्र भारताला गडी बाद करण्यासाठी काही काळ झगडावे लागले.

दुखापतग्रस्त एडन मार्क्रमच्या जागी खेळणारा झुबायर हामझा याने टेम्बा बावुमाच्या साथीने ९१ धावांची भागीदारी केली. हामझाने दमदार अर्धशतक ठोकले. पण ६२ धावांवर तो बाद झाला. त्याने १० चौकार आणि १ षटकार ठोकला. पाठोपाठ ३२ धावा काढून बावुमाही बाद झाला. कसोटी पदार्पण करणारा हेन्रीक क्लासें स्वस्तात माघारी परतला. त्यामुळे पहिल्या सत्राच्या शेवटी आफ्रिकेची अवस्था ६ बाद १२९ धावा केल्या. जॉर्ज लिंड (३७) याने काही काळ संघर्ष केला. पण त्याला तळाच्या फलंदाजांची साथ मिळाली नाही. त्यामुळे भारताला ३३५ धावांची आघाडी मिळाली. पहिल्या डावात उमेश यादवने ३ बळी तर मोहम्मद शमी, शाहबाज नदीम व रवींद्र जाडेजाने २-२ बळी टिपले.