यजमान भारताने तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत आफ्रिकन संघाला पूर्णपणे नेस्तनाबूत करत ‘व्हाइटवॉश’ दिला. तिसऱ्या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना ४९७ धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना आफ्रिकेचा पहिला डाव १६२ धावांवर तर फॉलो-ऑन नंतरचा डाव १३३ धावांवर आटोपला. त्यामुळे एक डाव आणि २०२ धावांनी विजय मिळवत भारताने मालिका ३-० ने जिंकली.

सामन्यानंतर रवी शास्त्री यांनी छोटेखानी मुलाखत दिली. त्यात त्यांनी खेळपट्टी आणि खेळाडूंच्या मानसिकतेबाबत सांगितले. “गोलंदाजी करताना खड्ड्यात गेली खेळपट्टी आपल्याला २० बळी टिपायचे अशी आमच्या खेळाडूंची मानसिकता होती. खेळपट्टी मुंबई, ऑकलंड, मेलबर्न किंवा कुठलीही असो, प्रतिस्पर्धी संघाचे २० गडी टिपणे हा आमचा पहिला उद्देश होता. त्यानंतर फलंदाजी तर आमची उत्तम दर्जाची होणार याचा आम्हाला विश्वास होताच. आणि त्यात जेव्हा तुमच्याकडे २० गडी बाद करणारे पाच गोलंदाज असतात, तेव्हा काळजीचं काही कारण नसतं”, असे रवी शास्त्री म्हणाले.

“अजिंक्य रहाणे कायमच मधल्या फळीत असायचा. फक्त त्याला स्वत:च्या खेळावर लक्ष देण्याची गरज होती. या मालिकेत त्याने ते केले आणि त्याचा फायदा झालेला दिसला. रोहित हा एक वेगळ्याच दर्जाचा खेळाडू आहे. सलामीवीर म्हणून एक वेगळी विचारसरणी गरजेची असते. त्याने ती विचारसरणी आत्मसात केली. या खेळपट्टीवर सुरूवातीच्या काळात फलंदाजी करणे कठीण होते. पण रोहितने संयमीपणे खेळ केला आणि दमदार खेळी केली.

दरम्यान, भारताच्या ४९७ धावांना प्रत्युत्तर देताना आफ्रिकेचा पहिला डाव १६२ धावांत आटोपला. दुखापतग्रस्त एडन मार्क्रमच्या जागी खेळणारा झुबायर हामझा याने टेम्बा बावुमाच्या साथीने ९१ धावांची भागीदारी केली. हामझाने दमदार अर्धशतक ठोकले. तो ६२ धावांवर बाद झाला. इतर फलंदाजांची त्याला साथ मिळू शकली नाही.

पहिल्या डावातील अपयशामुळे आफ्रिकेवर फॉलो-ऑनची नामुष्की ओढवली. त्यानंतर दुसऱ्या डावातही आफ्रिकेने खराब कामगिरी केली. त्यांचा डाव १३३ धावांत संपुष्टात आला. डी कॉक, हामझा, बावुमा, हामझा आणि क्लासें या फलंदाजांना दोन अंकी धावसंख्याही गाठता आली नाही. सामन्याच्या चौथ्या दिवसाचा खेळ सुरू झाला अणि अवघ्या काही मिनिटात खेळ संपला.