टीम इंडियाने तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत आफ्रिकन संघाला पूर्णपणे नेस्तनाबूत करत ‘व्हाइटवॉश’ दिला. तिसऱ्या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना ४९७ धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना आफ्रिकेचा पहिला डाव १६२ धावांवर तर फॉलो-ऑन नंतरचा डाव १३३ धावांवर आटोपला. त्यामुळे एक डाव आणि २०२ धावांनी विजय मिळवत भारताने मालिका ३-० ने जिंकली.

पहिल्या डावातील अपयशामुळे आफ्रिकेवर फॉलो-ऑनची नामुष्की ओढवली. त्यानंतर दुसऱ्या डावातही आफ्रिकेने खराब कामगिरी केली. डी कॉक, हामझा, बावुमा, हामझा आणि क्लासें या फलंदाजांना दोन अंकी धावसंख्याही गाठता आली नाही. सामन्याच्या चौथ्या दिवसाचा खेळ सुरू झाला अणि अवघ्या काही मिनिटात खेळ संपला. खेळपट्टीवर टिकाव धरलेला डे ब्रून ३० धावांवर बाद झाला. शाहबाज नदीमच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळताना तो झेलबाद झाला. महत्त्वाचे म्हणजे चेंडूला अपेक्षित उसळी न मिळाल्यामुळे चेंडू जमिनीच्या अगदी जवळ होता. त्याचवेळी साहाने तो कॅच पकडला. त्याच्या या कॅचमुळे त्याची सर्वत्र प्रशंसा करण्यात येत आहे.

दरम्यान, २ बाद ९ या धावसंख्येवरून खेळताना आफ्रिकेने पहिल्या सत्रात ४ तर दुसऱ्या सत्रात ४ गडी गमावले. आफ्रिकेचा कर्णधार पहिल्या डावात अपयशी ठरला. ९ चेंडूत १ धाव काढून तो बाद झाला. उमेश यादवने त्याचा त्रिफळा उडवला. त्यामुळे आफ्रिकेची अवस्था ३ बाद १६ अशी झाली होती. त्यानंतर मात्र भारताला गडी बाद करण्यासाठी काही काळ झगडावे लागले.

दुखापतग्रस्त एडन मार्क्रमच्या जागी खेळणारा झुबायर हामझा याने टेम्बा बावुमाच्या साथीने ९१ धावांची भागीदारी केली. हामझाने दमदार अर्धशतक ठोकले. पण ६२ धावांवर तो बाद झाला. त्याने १० चौकार आणि १ षटकार ठोकला. पाठोपाठ ३२ धावा काढून बावुमाही बाद झाला. कसोटी पदार्पण करणारा हेन्रीक क्लासें स्वस्तात माघारी परतला. त्यामुळे पहिल्या सत्राच्या शेवटी आफ्रिकेची अवस्था ६ बाद १२९ धावा केल्या. जॉर्ज लिंड (३७) याने काही काळ संघर्ष केला. पण त्याला तळाच्या फलंदाजांची साथ मिळाली नाही. त्यामुळे भारताला ३३५ धावांची आघाडी मिळाली. पहिल्या डावात उमेश यादवने ३ बळी तर मोहम्मद शमी, शाहबाज नदीम व रवींद्र जाडेजाने २-२ बळी टिपले.