21 September 2020

News Flash

विश्वचषकाचा अंतिम सामना भारत-द. आफ्रिकामध्ये रंगेल!

भारताने २०११च्या विश्वचषक क्रिकेट स्पध्रेत भारतीय उपखंडातील मैदानांचा फायदा घेऊन जगज्जेतेपदाला गवसणी घातली. अनुकूल वातावरणाचा लाभ घेत उपांत्य फेरी गाठायची तशी संधी आगामी विश्वचषक स्पध्रेत

| October 13, 2014 02:48 am

भारताने २०११च्या विश्वचषक क्रिकेट स्पध्रेत भारतीय उपखंडातील मैदानांचा फायदा घेऊन जगज्जेतेपदाला गवसणी घातली. अनुकूल वातावरणाचा लाभ घेत उपांत्य फेरी गाठायची तशी संधी आगामी विश्वचषक स्पध्रेत ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडला असेल. भारत आणि दक्षिण आफ्रिकेलासुद्धा उपांत्य फेरीत स्थान मिळवता येईल. वेस्ट इंडिज आणि पाकिस्तान हे दोन संघ नेहमीच अनपेक्षित कामगिरीने चकित करतात. श्रीलंकेच्या संघाला गेल्या दोन विश्वचषकांमध्ये अंतिम फेरी गाठूनही विश्वविजेतेपदाने हुलकावणी दिली आहे. परंतु माझ्या मते भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आगामी विश्वचषकाची अंतिम फेरी होईल, असे भाकीत दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू जॉन्टी ऱ्होड्सने वर्तवले आहे.
‘बॅकवर्ड पॉइंट’वर उभा राहून चित्त्याच्या वेगाने क्षेत्ररक्षण करणारा जॉन्टी मुंबई इंडियन्स संघाचा क्षेत्ररक्षणाचा प्रशिक्षक आहे. क्रिकेटव्यतिरिक्त पर्यटनाचा छंद जोपासणारा जॉन्टी दक्षिण आफ्रिका पर्यटन मंडळाचा भारतातील सदिच्छादूतही आहे. ‘चला दक्षिण आफ्रिकेकडे’ या मोहिमेच्या यंदाच्या दुसऱ्या हंगामात दक्षिण आफ्रिका पर्यटन मंडळ यंदा बीना जॉर्ज (मुंबई), अमिया शर्मा (नवी दिल्ली), गोविंद मेहरोत्रा (गुडगाँव) व ओजस ठेक्केकारा (हरयाणा) या चौघांना जॉन्टीसोबत दक्षिण आफ्रिकेचे दोन आठवडे पर्यटन घडवणार आहे. या निमित्ताने जॉन्टीने क्रिकेट आणि पर्यटन याबाबत खास बातचीत केली आणि आगामी विश्वचषकाबाबत आपला अंदाज व्यक्त केला.
*क्रिकेटव्यतिरिक्त भारतातील कोणती गोष्ट तुला आवडते?
मला भारत खूप आवडतो. आयपीएलच्या प्रत्येक हंगामात संपूर्ण भारतदर्शन घडते. भारतातील माणसे, त्यांची संस्कृती आणि इथले खाद्यपदार्थ यामुळे मला या देशाची ओढ निर्माण झाली. भारत हे मी माझे दुसरे घरच समजतो. इथल्या माणसांच्या आदरातिथ्याने माझ्या हृदयात स्थान निर्माण केले आहे. काही महिन्यांपूर्वी मी काश्मीरमधील बर्फाळ भागाचे पर्यटन केले आणि यथेच्छ आनंद लुटला. भारतात जाणाऱ्या माझ्या मित्रांना किंवा नातेवाईकांनाही मी आता कुठे जावे आणि काय पाहावे याचे चांगले मार्गदर्शन करतो. राज्यांनुसार भाषा आणि खाद्यसंस्कृतीचे विविध कंगोरे भारतात पाहायला मिळतात. मुंबईसह सर्वच भागांमधील मसालेदार पदार्थ मला अतिशय आवडतात. गुलाब जाम हा गोड पदार्थ माझ्या खास आवडीचा आहे. केप टाऊनमधील माझ्या सर्वात आवडत्या रेस्टॉरंटचे नाव ‘बुखारा’ असे भारतीय आहे.
*भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात कोणते साम्य आहे?
भारतीय संस्कृती ही दक्षिण आफ्रिकेसारखीच आहे. भौगोलिकदृष्टय़ा प्रदेशांनुसारची विविधता दोन्ही देशांमध्ये जाणवते. दक्षिण आफ्रिकेतील दरबान शहरात मोठय़ा संख्येने भारतीय लोक राहतात. त्यामुळेच या शहराची ‘मिनी भारत’ अशीही ओळख आहे.
*क्रिकेट पर्यटनासाठी दक्षिण आफ्रिकेकडे कसे पाहिले जाते आणि पर्यटनासाठी तुला कोणती ठिकाणे आवडतात?
युवा क्रिकेटपटूंना घडवण्यासाठी दक्षिण आफ्रिकेत अनेक क्रिकेट अकादम्या कार्यरत आहेत. दक्षिण आफ्रिकेत क्रिकेट हा खेळ अतिशय लोकप्रिय आहे. २००९मध्ये आयपीएलचा दुसरा हंगाम दक्षिण आफ्रिकेत झाला होता. त्यामुळे येथील क्रिकेट पर्यटकांच्या संख्येने मोठी वाढ झाली. व्हुव्हुझेला या संगीतवाद्याच्या साथीने हे पर्यटक क्रिकेटचा आनंद लुटतात. मला केप टाऊनच्या पश्चिमेकडील भागांमध्ये फिरायला व ट्रेकिंग करायला आवडते. माऊंटन बाइकिंगसारखे साहसी खेळ मी नेहमीच पसंत करतो.
*भारतासंदर्भातील एखादी संस्मरणीय आठवण कोणती?
काश्मीरमध्ये मी पहिल्यांदा जेव्हा स्नो बोर्ड शिकायला गेलो होतो, तेव्हा सरकारने शोध आणि बचावकार्य पथक माझ्या दिमतीला ठेवले होते. परंतु आता वादळीवाऱ्यांच्या वातावरणातसुद्धा नियंत्रणरेषेनजीकच्या परिसरात निर्धास्तपणे स्नो बोर्डचा आनंद लुटता येईल, इतका आत्मविश्वास माझ्यात आला आहे!
*क्रिकेट व पर्यटनचा आयुष्यातील परस्पर संबंध तू कसा मांडशील?
माझे क्रिकेटवरील प्रेम आणि पर्यटनाची आवड सर्वानाच माहीत आहे. पर्यटन हे क्रिकेटसारखेच आनंददायी आणि आव्हानात्मक असते. जितके अधिक तुम्ही फिरता, तितक्या अधिक ठिकाणांची तुम्हाला माहिती होते. जगभरातील विविध संस्कृती समजून घेता येतात. विविध ठिकाणे आणि तेथील माणसांचे आदरातिथ्य पर्यटनातूनच उलगडते. नव्या माणसांना भेटल्यामुळे नवा दृष्टिकोन आणि नवा मार्ग समजून घेता येतो. क्रिकेट कारकीर्द बहरात असताना दौऱ्यांच्या व्यस्त कार्यक्रमांमुळे पर्यटनाचा यथेच्छ आस्वाद घेण्याची संधी मिळाली नव्हती. गेल्या वर्षीपासून पर्यटनाची खऱ्या अर्थाने महती कळत आहे. क्रिकेटनंतर माझ्यासाठी आयुष्य म्हणजे फक्त पर्यटन आहे.
*दक्षिण आफ्रिकेतील कोणत्या मैदानाशी तुझे भावनिक नाते आहे आणि का?
स्वाभाविकपणे दरबान या माझ्या मायभूमीच्या मैदानाशी माझे भावनिक नाते आहे. या ठिकाणी प्रेक्षकांचा मला छान प्रतिसाद मिळतो. केप टाऊन हे जगातील हे एक प्रेक्षणीय स्टेडियम म्हणून मी नमूद करीन. परंतु पोर्ट एलिझाबेथला खेळण्याचा अनुभव अधिक चांगला असतो. सामन्यादरम्यान तेथे क्रिकेटरसिकांचा बँड खेळातील मजा वाढवतो.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 13, 2014 2:48 am

Web Title: india vs south africa will play world cup final jonty rhodes
Next Stories
1 महाराष्ट्राला दुहेरी मुकुट
2 पीटरसनचा आत्मचरित्रामध्ये ‘गुरू’ द्रविडला कुर्निसात
3 मेस्सी, रोनाल्डो खेळूनही अर्जेटिना, पोर्तुगाल पराभूत
Just Now!
X